उंचगाव येथील राज्य महामार्गाच्या पुलाखाली पडलेल्या खड्ड्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध !
कोल्हापूर, ४ सप्टेंबर (वार्ता.) – सातारा ते कागल हे सहापदरीकरण करण्याचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे. या मार्गावर मोठे खड्डे पडले असून येथे अनेकांचे अपघात झाले आहेत. ७ सप्टेंबर श्री गणेशचतुर्थी असून गणेशोत्सव मंडळांना श्री गणेशमूर्तीची वाहतूक करतांना त्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उंचगाव येथील राज्य महामार्गाच्या पुलाखाली पडलेल्या खड्ड्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध करण्यात आला. या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी प्राधिकरणाचे अभियंता महेश पाटोळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीकांत सुतार यांना आंदोलनस्थळी बोलावून त्यांना खडसावले अन् साचलेल्या पाण्याचा निचरा करून रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली. (रस्ते दुरुस्तीसारख्या नागरी प्रश्नांसाठी आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे ! आतातरी याची नोंद घेऊन प्रशासनाने काम जलद गतीने करावे, तसेच गणेशोत्सवाच्या पूर्वी खड्डे लवकर बुजवावेत ! – संपादक)
या प्रसंगी श्री. अवधूत साळोखे यांसह अन्य उपस्थित होते.