उत्सवांना विधायक स्वरूप द्या…!
काही दिवसांपूर्वी दूरचित्रवाणी कलाकार, अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी ‘गणेशोत्सव बंद करावा’, असे विधान केले आणि त्यांच्या विधानावर जनतेतून असंख्य प्रतिक्रिया उमटल्या. अर्थातच त्यांचे हे विधान योग्य नाही; पण हे त्यांचे वैयक्तिक मत होऊ शकते. १०० वर्षांपूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या हेतूने गणेशोत्सव आणि शिवजयंती असे उत्सव चालू केले, त्यामागे फार मोठी भूमिका होती आणि विचार होता. अशा कुणा एकाच्या वैयक्तिक मतानुसार असे उत्सव काही बंद होऊ शकणार नाहीत. मग पुढे तर ‘दहीहंडी बंद करा’, ‘दुर्गा उत्सव बंद करा’, अशा मागण्या येतील. त्याला काही अर्थ नाही. काळानुसार उत्सवाचे स्वरूप पालटले हे मात्र नक्की !
१. गणेशोत्सवाचे सध्याचे स्वरूप
अनेक ठिकाणी रस्त्यामधून मंडप घातले जातात. त्यामुळे ते वाहतुकीला अडथळ्याचे ठरतात. उत्सवाची वर्गणी मागण्यासाठी बर्याच वेळा बळजोरी केली जाते. मिरवणुकीमध्ये ‘डीजे’सह ‘लेझर लाईट’चा वापर केला जातो की, जो आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. यामुळे आंधळेपणा, बहिरेपणा येतो, तसेच उच्चदाब असणार्यांना बर्याच वेळा यामुळे धोका निर्माण झालेला आहे. काही प्रकरणांत तर मृत्यू ओढवलेला आहे. मिरवणुकीमध्ये बर्याच ठिकाणी मद्यपान करून दिवसभर अर्थहीन गाण्यावर नाच केला जातो, तर काही मंडळांमध्ये अतिशय शिस्तबद्धपणे आरती करण्यासह कार्यक्रमाची आखणी केली जात असते.
गेल्या काही वर्षांमध्ये अशा उत्सवांत राजकारणी नेत्यांचा प्रवेश झाल्यामुळे उत्सवाचे स्वरूपच पालटले आहे. त्यांच्याकडून मंडळांना मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात. त्यामुळे वेगळ्या प्रकाराने कार्यक्रमाचे आयोजन होते आणि त्यात अशा नेत्यांचाही सहभाग असतो. परिणामी होणार्या त्रासामुळे मात्र बर्याच वेळा जनता अप्रसन्न असते. त्यामुळेच मग उद्विग्न अवस्थेतून संतापाने ‘हा गणेशोत्सव बंद करा’, अशा प्रतिक्रिया काही जणांकडून उमटतात. अर्थातच असे आपले धार्मिक उत्सव बंद होणे शक्य नाहीच; पण त्यात काही सुधारणा आणि विधायक कार्य होणे अपेक्षित आहे. गणेशोत्सव मंडळात असणारी बहुसंख्य मंडळी ही तरुणच असतात आणि अशा वेळी त्या मंडळाकडून होणार्या कार्यक्रमाला विधायक स्वरूप कसे प्राप्त होईल, सामाजिक ऐक्य कसे टिकून राहील, पर्यावरणाचा विचार कसा केला जाईल किंवा प्रदूषण निर्माण होणार नाही, याची नोंद घ्यायला हवी.
२. श्री गणेशमूर्ती मातीची असणे महत्त्वाचे !
उत्सवात ‘पूजेसाठी मातीची मूर्ती असावी’, असे उल्लेख शास्त्रात आहेत आणि संकल्पात सुद्धा ‘पार्थिव महागणपतिपूजनं करिष्ये’, असे म्हणण्याचा प्रघात आहे; कारण कर्मकांडातील बहुतेक पूजा या ठराविक कालावधीनंतर विसिर्जत केल्या जात असतात. म्हणूनच घरात आणली जाणारी गणपतीची मूर्ती ही आपल्याला स्वतःला आणता येईल एवढीच असावी. अनेक लोक चांदीच्या मूर्तीची स्थापना करतात; परंतु ते शास्त्रसंमत नाही, असेही म्हटले जाते. ‘भक्तीभावाने केलेली उपासना देवाला मान्य असते’, असे आपण वाचतो, मानतो; परंतु याचा अर्थ नवनवीन पर्याय शोधून काढणे, असा नाही. ज्या मूर्तीचे विसर्जन करता येईल, तीच मूर्ती पूजेला घ्यावी, हे महत्त्वाचे आहे .
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आदी अनेक ठिकाणी महापालिकांनी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तीवर बंदी आणलेली आहे. प्रदूषण महामंडळाकडून त्याविषयी तसे आदेशही काढले जातात.
३. देश-विदेशात साजरा होणारा उत्सव
गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्याच्या श्री गणेशमूर्ती पहाण्यासाठी भाविक येत असतात. जळगाव जिल्ह्यात पद्मालय आणि तरसोद गणपति, विदर्भातील कळंबचा गणपति, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील राजूरचा गणपति, ही सर्व प्रसिद्ध गणपति ठिकाणे आहेत. याखेरीज अष्टविनायक गणपतींची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. भारताप्रमाणे ज्या ठिकाणी परदेशात भारतीय लोक गेले आहेत, त्या त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. नेपाळ, ब्रह्मदेश, म्यानमार, श्रीलंका, व्हिएतनाम, कंबोडिया, अमेरिकेत न्यू जर्सी, बोस्टन येथे उत्सव साजरा केला जातो.
४. सध्याच्या उत्सवात धार्मिकतेपेक्षा इतर गोष्टींना महत्त्व
एकूणच विचार केला, तर सध्याच्या परिस्थितीत या उत्सवाचे स्वरूप पुष्कळ पालटले आहे. धार्मिकतेपेक्षा इतर गोष्टींना महत्त्व दिले जाते. मोठ्या मूर्ती, देखावे, झगमगाट, रोषणाई, ‘डीजे’वर लावण्यात येणारी कर्णकर्कश गाणी हे प्रमाण वाढले आहे. बाजारात एकदाच वापरण्यात येणार्या प्लास्टिकच्या फुलांचा सजावटीमध्ये समावेश करण्यात येतो. ‘डीजे’ ध्वनीक्षेपकाच्या विरोधात न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेली याचिकाही फेटाळली गेली आहे. त्यामुळे आता ‘डीजे डॉल्बी’चा आणि लेझर किरणांचा वापर होणार हे नक्की !
५. ‘हिंदु संस्कृतीला शोभेल, असा उत्सव साजरा करणे’, हे गणेशोत्सव मंडळांचे प्राधान्य !
लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाच्या सार्वजनिकतेत सांस्कृतिक वैभवाचा जो ठेवा दिला आहे, त्या निमित्ताने ‘या उत्सवात सर्व जातीधर्मांच्या लोकांनी एकत्र यावे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे व्हावेत, स्पर्धा व्हाव्यात; एकमेकांत बंधूभाव, देशप्रेम निर्माण व्हावे आणि गणेशोत्सवाचे पावित्र्य कायम ठेवून लोकसंस्कार व्हावे’, तरच गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतू साध्य होईल. सात्त्विकपणे हिंदु संस्कृतीला शोभेल, असेच धार्मिक आणि विधायक कार्यक्रम आखून उत्सव साजरे व्हावेत. या गोष्टींना सर्वत्रच्या गणेशोत्सव मंडळांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे.
– श्री. दिलीप देशपांडे, जामनेर, जिल्हा जळगाव.
उत्सव साजरा करतांना लक्षात घ्यावयाची प्रमुख सूत्रेलोकमान्य टिळक यांनी ज्या विचारांनी घरातील गणपतीसह सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ केला, त्याचा जवळपास विसर पडल्यासारखा झाला आहे. उत्सवामागचे खरे धार्मिक, सांस्कृतिक, प्रबोधन यांसह महत्त्वाच्या विषयांचा, उद्देशाचाही विसर पडायला नको. उत्सव साजरा करतांना जर आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या, तर त्या उत्सवाचा हेतू आणि पावित्र्य कायम राहील. अ. श्री गणेशमूर्ती निवडतांना ती शाडूच्या मातीची किंवा ‘इको फ्रेंडली’ (पर्यावरणपूरक) असावी. कागदी लगद्याची किंवा थर्माकोलची नसावी. मूर्तीची उंची प्रमाणात असावी. पुष्कळ मोठ्या मूर्ती असल्यास त्या विघटनाला वेळ लागतो आणि बर्याच वेळा मग विसर्जन करतांना पावित्र्य रहात नाही. आ. उत्सवात योग्य वेळातच विजेचा वापर केल्यास आणि आकर्षक; पण अल्प वीज लागणारी रोषणाई केली, तर विजेची बचतही होते. इ. आरास करतांनाही ती पर्यावरणपूरक असल्यास फारच चांगले, तसेच रंग वापर करतांनाही ते आरोग्यासाठी हानीकारक ठरणार नाही, असेच वापरावेत. ई. उत्सव काळात आपल्या उत्साहामुळे, म्हणजेच ‘डीजे’ ध्वनीक्षेपकाच्या वापरामुळे परिसरातील चिकित्सालये आणि शाळा, यांना त्रास होणार नाही, हे बघायला हवे. उ. मूर्ती विसर्जनाच्या वेळी ठिकठिकाणी तळे किंवा तलाव संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी उपलब्ध करून द्यावे. उत्सवाच्या काळात मूर्तीला अर्पण केली जाणारी फुले, दुर्वा, माळ आणि अन्य तत्सम वस्तू यांचे योग्य पद्धतीने विसर्जन करावे, जेणेकरून ते इतस्तत पसरून प्रदूषण होणार नाही. – श्री. दिलीप देशपांडे |