माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा नोंद !
नागपूर – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नवीन गुन्हा नोंद केला आहे. यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. ‘सीबीआय’ने गुन्हा नोंद करताच देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ‘धमक्या आणि दबाव याला आपण भीक घालणार नाही’, असे स्पष्ट केले.
अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाच्या काळात भाजपचे नेते गिरीश महाजन यांना अटक करण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. ‘सीबीआय’ने याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या चौकशीचा ससेमिराही त्यांच्यामागे आहे. या प्रकरणी त्यांनी कारावासही भोगला आहे.