एस्.टी.च्या संपामुळे सुमारे १५ कोटी रुपयांचा महसूल बुडला !
ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल, तर खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट !
मुंबई – राज्य परिवहन महामंडळातील (एस्.टी.) कर्मचार्यांनी प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्याने कामगार संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सव जवळ आलेला असतांना ३ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन चालू केले. ४ सप्टेंबरलाही राज्यभर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोकणातील बसगाड्यांची वाहतूक रखडल्याने प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करीत आहेत. संपामुळे एस्.टी.चा १५ कोटी रुपयांचा महसूल बुडला आहे.
मुख्यमंत्र्यांनी कर्मचार्यांना संपात सहभागी न होण्याचे आवाहन केले होते. औद्योगिक न्यायालयाने कर्मचार्यांचा हा अघोषित संप बेकायदेशीर ठरवला आहे आणि संपात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. कोकणात जाणार्या सहस्रो प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याने राज्य परिवहन महामंडळ वारंवार संपकरी कर्मचार्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहे.
एस्.टी. कामगार संघटनांच्या संपामुळे एस्.टी.च्या २५१ पैकी ५९ आगार पूर्णत: बंद होती, तर ११५ आगारांमध्ये वाहतूक सुरळीत चालू आहे. या आंदोलनामुळे ११ सहस्र ९४३ फेर्या रहित कराव्या लागल्याने एस्.टी.ला प्रतिदिन सुमारे १५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
गेले दोन दिवस चालू असलेल्या या संपामुळे ऐन गणेशोत्सवासाठी घरी जाणार्या प्रवाशांचे हाल होत आहेत. या संपामुळे खासगी वाहतूकदारांनी त्यांचे दर दुप्पट-तिप्पट वाढवले आहेत.
घरी जाण्यासाठी अन्य कोणताही पर्याय नसल्याने प्रवाशांना खासगी बसगाड्यांचाच आधार घ्यावा लागत आहे. कोरोना संसर्ग आणि गतवेळेचा संप यांमुळे आता कुठे एस्.टी.ची स्थिती पूर्वपदावर येत असतांना झालेल्या संपामुळे एस्.टी.ला तोटा सहन करावा लागत आहे.
मुंबई-पुणे मार्गावरील ‘ई-शिवनेरी’ सेवा व्यवस्थित चालू आहे. प्रवाशांकडून अधिक दराने तिकीट दर आकारला जात असतांना राज्य प्रादेशिक परिहवन विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग मात्र बघ्याचीच भूमिका घेतांना दिसत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणात जाणार्यांचे हाल !
कोल्हापूर – विभागात ३ सप्टेंबरला ४५३ फेर्या रहित कराव्या लागल्याने एस्.टी.ला ११ लाख २३ सहस्र रुपयांचा तोटा सहन करावा लागला. अन्य शहरांसमवेत प्रामुख्याने कोल्हापूर येथे कोकणात जाणार्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेकांनी आगाऊ आरक्षण केलेले असतांनाही गाड्या नसल्याने ते त्यांना रहित करावे लागले. अनेकांना कोकणात जाण्यासाठी दिवसा अन्य कोणताच पर्याय नसल्याने रात्रीपर्यंत थांबावे लागले.