पडघा (ठाणे) येथून मुंबईत पोपट आणि घारी यांची तस्करी करणारी बस पकडली !
ठाणे – काही दिवसांपूर्वी भिवंडीतील पडघा येथे मालेगावमधून क्रॉफर्ड मार्केटमध्ये नेण्यात येणारे ३० पोपट आणि ३ कापशी घारींची तस्करी करणारी पर्यटक बस ठाणे वन विभागाने पकडली. आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये एक चालक आणि एक साहाय्यक यांचा समावेश आहे.
‘वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन’ (डब्ल्यूडब्ल्यूए), पडघा रेंज वन अधिकार्यांना पक्ष्यांची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी भिवंडीतील पडघा येथे ही कारवाई केली.
स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने बस थांबवण्यात आली आणि वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच डब्ल्यूडब्ल्यूएच्या सदस्यांना ठाणे शहरात सोडण्याची विनंती करण्यात आली. बस मुंब्रा टोल नाक्यावर येताच बसची पडताळणी करण्यात आली. त्या वेळी बसचालकाच्या केबिनमध्ये ३० पोपट आणि ३ कापशी घारी आढळल्या. यानंतर तीन हात नाक्याजवळ बसमधील अन्य प्रवाशांना सोडून बस कह्यात घेण्यात आली.
यापूर्वीही मालेगावमधून मोठ्या प्रमाणात वन्यजिवांची तस्करी करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी ४८ करण पोपट (अलेक्झांड्रिन पॅराकीट्स) आणि ७ कासवांची तस्करी करणारे २ ट्रक पकडले होते.