हिरण्यकेशी (जिल्हा कोल्हापूर) नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने १३ आंदोलकांच्या नदीत उड्या !

आंदोलन करूनही पाणी प्रदूषित करणार्‍यांवर कारवाई होत नसल्याने १३ तरुण कार्यकर्त्यांनी हिरण्यकेशी नदीत उड्या मारल्या

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – संकेश्वर शहराचे सांडपाणी आणि कारखान्याची मळी थेट हिरण्यकेशी नदीत मिसळत असल्याने हिरण्यकेशी प्रदूषित झाली आहे. याचा नांगनूरसह अनेक गावकर्‍यांना त्रास होतो. या संदर्भात वारंवार निवेदन देऊन, आंदोलन करूनही पाणी प्रदूषित करणार्‍यांवर कारवाई होत नसल्याने १३ तरुण कार्यकर्त्यांनी हिरण्यकेशी नदीत उड्या मारल्या. पोलीस आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी आंदोलकांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. (नदी प्रदूषण रोखण्यासाठी नदीत उड्या मारण्याचे आंदोलन करावे लागत असेल, तर संबंधित प्रशासकीय अधिकारी नेमके काय करत आहेत ? ज्यांच्यामुळे नदी प्रदूषित होते, त्यांच्यावर काही कारवाई न करून प्रदूषण मंडळ आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी नेमके कुणासाठी काम करतात ? असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे ! – संपादक) 

या संदर्भात ८ दिवसांत जिल्हाधिकार्‍यांच्या समवेत बैठक घेऊन महिनाअखेरपर्यंत बेळगाव आणि कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी, प्रदूषण मंडळ आणि आंदोलन यांची संयुक्त बैठक घेऊ, असे लेखी आश्वासन नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांनी आंदोलकांना दिले. या आंदोलनाची कल्पना ८ दिवसांपूर्वी प्रांताधिकारी यांना दिली होती. तरीही संकेश्वर कारखाना अथवा पालिकेचे कुणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते.