Israel Hamas War : इस्रायली सैन्याने केलेल्या आक्रमणात हमासचे ८ आतंकवादी ठार !
एकूण ३५ लोकांचा मृत्यू
तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध चालू होऊन तब्बल ११ महिने पूर्ण होत आले आहेत. तरी ते थांबण्याऐवजी त्याचा कालावधी वाढतच चालला आहे. इस्रायली सैन्याने ४ सप्टेंबर या दिवशी गाझामधील विविध भागांवर आक्रमण केले. यात हमासच्या ८ आतंकवाद्यांसह ३५ पॅलेस्टिनी लोक ठार झाल्याचे वृत्त आहे.
१. ‘पॅलेस्टिनी नागरी आपत्कालीन सेवा’ या संस्थेने सांगितले की, इस्रायली हवाई आक्रमणांमध्ये दक्षिणेकडील राफा शहरातील ४ महिला, उत्तरेकडील गाझा शहरातील ८, तर मध्य भागातील ९ पॅलेस्टिनी यांचा समावेश आहे.
२. दुसरीकडे इस्रायली सैन्याने सांगितले की, ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी इस्रायलवर आक्रमण केलेल्या एका कमांडरसह ८ आतंकवादी यांना आम्ही ठार मारले आहे. हमासकडून मात्र यास दुजोरा देण्यात आलेला नाही.
३. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ३ सप्टेंबरला स्पष्ट केले होते की, गाझाच्या दक्षिणेकडील ‘फिलाडेल्फिया कॉरिडॉर’मधून इस्रायली सैन्याला आम्ही कदापि हटवणार नाही. हमासचे समूळ उच्चाटन करण्याच्या कटीबद्धतेवर आम्ही ठाम आहोत. हमासचा नाश होताच युद्ध संपेल.