CM Yogi On Bulldozer Action : बुलडोझर चालवण्यासाठी कणखर मन आणि बुद्धी हवी ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
‘पुढील निवडणुकीनंतर राज्यातील सर्व बुलडोझर गोरखपूरच्या (मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाच्या) दिशेने फिरतील’ या अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – बुलडोझर चालवण्यासाठी कणखर मन आणि बुद्धी, या दोन्हींची आवश्यकता असते. बुलडोझर चालवण्याची क्षमता आणि जिद्द असणाराच तो चालवू शकतो. दंगलखोरांसमोर नाक घासणार्यांचा बुलडोझरसमोर असाच पराभव होईल, असा घणाघात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर केला. ते एका सरकारी कार्यक्रमात बोलत होते.
योगी पुढे म्हणाले की, टिपूही सुलतान बनण्याचे स्वप्न पहात होता. त्याला जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने राज्यात जात आणि धर्म यांच्याशी लढा दिला. प्रत्येक जण बुलडोझर चालवू शकत नाही. त्यासाठी कणखर मन लागते.
याआधी अखिलेश यादव म्हणाले होते की, वर्ष २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल. निवडणुकीच्या निकालाचा परिणाम देशाच्या राजकारणावर होईल. भाजप सरकारमध्ये निरपराध लोकांवर अत्याचार होत आहेत. (समाजवादी पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षांच्या सत्ताकाळात हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले आहेत. त्याविषयी यादव गप्प का ? – संपादक) शेतकरी चिंतेत आहे. तरुणांचे भविष्य अंध:कारमय आहे. समाजातील प्रत्येक घटक त्रस्त आहे. वर्ष २०२७ मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन होताच राज्यातील सर्व बुलडोझर गोरखपूरच्या (मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघाच्या) दिशेने फिरतील.