Saudi China Stopped Pakistani Investment : आर्थिक दिवाळखोर पाकिस्‍तानमधील गुंतवणूक सौदी अरेबिया आणि चीन यांनी रोखली !

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – चीन आणि सौदी अरेबिया यांनी पाकिस्‍तानमध्‍ये गुंतवणूक करण्‍याचे मान्‍य केले होते; मात्र पाकिस्‍तानचे आर्थिक दिवाळे वाजल्‍यामुळे त्‍यांनी गुंतवणूक रोखून धरली आहे.

१. गेल्‍या वर्षी चीनने पाकिस्‍तानमध्‍ये १ लाख ४२ सहस्र कोटी रुपयांच्‍या अतिरिक्‍त गुंतवणूक करण्‍याविषयी चर्चा केली होती; पण त्‍यानंतर चीनने ‘आधी सुरक्षा आणि पाकिस्‍तानमध्‍ये राजकीय स्‍थैर्य हवे’, असे सांगत थंड प्रतिसाद दिला.

२. दुसरीकडे सौदी अरेबियाने पाकिस्‍तानमध्‍ये यापूर्वी २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्‍याचे घोषित केले होते. त्‍यानंतर गुंतवणुकीचे प्रमाण घटवून ती ४० सहस्र कोटी रुपयांवर आणली. आता तीही रखडली आहे.

३. संयुक्‍त अरब अमिरातने पाकमध्‍ये ८३ सहस्र कोटी रुपयांच्‍या गुंतवणुकीची घोषणा केली होती; मात्र ‘सद्य:स्‍थिती लक्षात घेता गुंतवणूक करू शकणार नाही’, असे सांगितले.

४. तज्ञांचे मत आहे की, देशातील बंडखोरीची पाकिस्‍तानला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. संयुक्‍त अरब अमिरातने पाकमध्‍ये गुंतवणूक करण्‍याचे दिलेले आश्‍वासन हे आश्‍वासनच रहाणार आहे. ते प्रत्‍यक्षात येणे फार कठीण आहे.

५. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार सौदी अरेबिया भारतात ८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्‍याचा विचार करत आहे. त्‍यासाठी तो संधी शोधत आहे. ही गुंतवणूक येत्‍या काही वर्षांत भारतात करण्‍यात येईल.

६. बलुचिस्‍तान आणि खैबर पख्‍तुनख्‍वा या प्रांतांमधील सुरक्षाव्‍यवस्‍था दिवसेंदिवस खालावत चालली आहे, ज्‍यामुळे चीन-पाकिस्‍तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (महामार्ग) प्रकल्‍पावर काम करणे कठीण होत आहे. तसेच पाकिस्‍तानातील सध्‍याची परिस्‍थिती लक्षात घेता चीनला पाकिस्‍तानमध्‍ये पैसे गुंतवणे धोक्‍याचे असल्‍याचे वाटते.