पिंपरी (पुणे) येथील ‘संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुला’तील कृत्रिम धावमार्ग उखडला !
धावमार्गाची त्रयस्थ संस्थेकडून पडताळणी करणार !
पिंपरी (पुणे) – भोसरीतील इंद्रायणीनगर येथील ‘संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुला’तील नव्याने सिद्ध केलेला ‘कृत्रिम धावमार्ग’ (सिंथेटिक ट्रॅक) पुन्हा उखडला आहे. याच धावमार्गावर पोलीस भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी झाली होती. धावमार्ग खराब झाल्याने ४ कोटी रुपये वाया गेले का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. (याविषयी महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे ! – संपादक)
इंद्रायणीनगरमध्ये ‘संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल’ एकमेव क्रीडा संकुल आहे. तेथील धावमार्ग खराब झाल्याने महापालिकेने ४ कोटी रुपये व्यय करून नवीन धावमार्ग १५ मार्च २०२४ या दिवशी एका वर्षासाठी खुला केला होता. या धावमार्गावर खेळाडू सराव करत असतांना केवळ ५ दिवसांमध्ये हा मार्ग उखडला होता. त्यामुळे पुन्हा दुरुस्तीसाठी हा धावमार्ग बंद करण्यात आला होता. त्याच धावमार्गावर पोलीस भरतीची प्रक्रिया केल्याने तो धावमार्ग अधिक खराब झाल्याचे निदर्शनास येत आहे. ‘धावमार्गाची त्रयस्थ संस्थेकडून पडताळणी करणार, पडताळणीमध्ये त्रुटी, कामाचा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधित ठेकेदारांकडून पैसे वसूल केले जातील’, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.