केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून ‘अहिल्यानगर’ नामांतरास हिरवा कंदील !
महापालिकेनंतर आता रेल्वे मंत्रालयाकडून नामांतरास मान्यता !
अहिल्यानगर – अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केली होती. यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा ठराव महापालिकेत मांडण्यात आला. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला संमती देण्यात आली होती. महापालिकेनंतर आता जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला असून हे नाव देण्यास विभागाची कोणतीही हरकत नसल्याचे पत्र दिल्याने जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची मागणी झाल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने ‘अहिल्यानगर’, असे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.