President Draupadi Murmu : महिलांकडे वाईट दृष्टीने पाहिले जाणार नाही, असा समाज घडवणे हे प्रत्येकाचे दायित्व ! – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
महाराष्ट्र विधान परिषदेचा शताब्दी समारोह !
मुंबई, ३ सप्टेंबर (वार्ता.) – देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला. काही वर्षांनी शतकोत्सव साजरे करू; परंतु महिलांवरील अत्याचार अल्प झालेले नाहीत. महिलांकडे समाजात वाईट दृष्टीने पाहिले जाते. महिलांचा जेव्हा आदर होईल, तेव्हा खर्या अर्थाने स्वातंत्र्याला अर्थ आहे. महिलांकडे वाईट दृष्टीने पाहिले जाणार नाही, असा समाज घडवणे हे प्रत्येकाचेच दायित्व आहे, असे वक्तव्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. ३ सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे शतकोत्सव वर्ष साजरे करण्यात आले. या सोहळ्यात राष्ट्रपती महोदया बोलत होत्या. या वेळी विधीमंडळाचे वर्ष २०१८ ते २०२४ या ६ वर्षांच्या कालावधीतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ या पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण करण्यात आले.
या वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, ‘‘महिलांच्या सशक्तीकरणासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. महिलांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास होईल, तेव्हाच देशाचा विकास होईल. राजमाता जिजाऊ भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले, असे महिलांनी योगदान द्यावे. भारत हा जगाचा मार्गदर्शक आहे. विदेशातील नागरिक भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करतात. त्यामुळे भारताने चांगल्या संस्कृतीचे जतन करायला हवे. महाराष्ट्र हा देशाचे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आर्थिक प्रतिनिधित्व करत आहे. महाराष्ट्राचा विकास झाला, तर भारताचा विकास होईल.’’
या वेळी व्यासपिठावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन्, विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मान्यवर उपस्थित होते. या वेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन्, डॉ. नीलम गोर्हे, अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनीही भाषणे केली.
विधीमंडळाचा सन्मान वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी योगदान द्यावे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे जीवन संघर्षमय राहिले आहे. त्यांची उपस्थिती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेला लोकमान्य टिळक, गोपाळ आगरकर यांचा येथे चरणस्पर्श झाला आहे. विधीमंडळात लोकहिताची चर्चा करून लोकप्रतिनिधींनी विधीमंडळाचा सन्मान वाढवण्यासाठी योगदान द्यावे.
वैशिष्ट्यपूर्ण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाषणाचा प्रारंभ ‘बहु असोत, सुंदर संपन्न कि महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या गीताच्या ओळींनी केला आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतांच्या ओळींनी भाषणाचा शेवट केला. राष्ट्रपतींनी केलेल्या या उल्लेखाने त्यांनी सभागृहातील सर्वांची मने जिंकली. |