शेवटच्या श्रावणी सोमवारी दीड लाख भाविकांनी घेतले भीमाशंकराचे दर्शन !
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सपत्नीक पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक !
शिनोली (पुणे) – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या श्रावणी अमावास्येला दीड लाख भाविकांनी ‘हर हर महादेवा’च्या जयघोष करत पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. या वेळी शिवलिंगावर रंगीबेरंगी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सपत्नीक पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक केला. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, तसेच माजी आमदार शरद दादा सोनावणे उपस्थित होते.
खेड पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ वाहनतळे, बसस्थानक, मंदिराचा परिसर, गाभार्यामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ‘श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे, विश्वस्त रत्नाकर कोडिलकर आदींनी मंदिरात थांबून मंदिरातील इतर नियोजन पाहिले आणि भाविकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले.