‘प्रो-बायोटिक’, ‘गट हेल्थ’ आणि अग्नी विचार !
(टिप : अ. ‘प्रो-बायोटिक’ म्हणजे ज्यामध्ये पोटाला हितकारी असे ‘बॅक्टेरिया’ (जीवाणू) असतात. आ. ‘गट हेल्थ’ म्हणजे पचनशक्ती ज्यावर अवलंबून आहे ते चांगले सूक्ष्मजंतू.)
‘‘प्रो-बायोटिक’ पदार्थ घेणे महत्त्वाचे असल्याने किमान आठवड्यात ३ दिवस काही ना काही आंबवलेले खावे’, असे ‘रिल’ (माहितीपर छोटी ध्वनीचित्रफीत) पाहिली. बर्याचदा यावर विविध अर्धवट माहिती ऐकून किंवा वाचून आपण ते करायला प्रारंभ करतो. मुळात ‘प्रो-बायोटिक’ म्हणजे काय ? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ‘प्रो-बायोटिक’, म्हणजे ज्यामध्ये पोटाला हितकारी असे बॅक्टेरिया असतात. बरेचसे आंबवलेले पदार्थ, दही, ताक, लोणचे करून टिकवलेल्या भाज्या यामध्ये येतात.
१. आंबट किंवा आंबवलेले पदार्थ सतत खाणे हे त्रासदायक !
‘समानाने समानाची वृद्धी’, या कागदावरील हिशोबात ‘बॅक्टेरिया’ आहे, तर बॅक्टेरिया वाढवणार’, हे सोपे समीकरण दिसत असले, तरीही भारतातील उष्ण आणि अम्लतापूर्ण वातावरणाला असे आंबट किंवा आंबवलेले पदार्थ सतत वा नियमित अधिक काळ खाल्ले असता त्यामुळे लाभ होण्यापेक्षा ते त्रास वाढवतात. पचनाच्या विकारांचा विस्तार (स्पेक्ट्रम) पुष्कळ मोठा आहे, त्या सगळ्या लक्षणांना ‘प्रो-बायोटिक’ पदार्थ कसा चालेल ? बर्याचदा यामुळे आम्लपित्त, पोट फुगणे, डोके दुखणे, अंगावर गांध्या असे परिणाम करतांना दिसतात, तसेच हे त्रास असतांना हे पदार्थ पूर्ण बंद करायला आम्ही सांगत असतोच.
२. आयुर्वेदात प्रकृती, अग्नी आणि माणसाची दिनचर्या यांनुसार ‘प्रो-बायोटिक’
आपल्या आहारात आपसूक नियमित असणारे ‘प्रो-बायोटिक’, म्हणजे दही आणि ताक, हेही दोन पदार्थ सर्वांना चालत नाहीत. दह्याविषयी बरेच नियम आहेत आणि काही आजारांमध्ये तर ‘अजिबात खाऊ नका’, असे आम्ही सांगतो. ताक हे पचनाला आवश्यक आहे आणि ‘प्रो-बायोटिक’ काम करते; म्हणून प्रत्येक व्यक्तीला ते चालेल, असे नाही. पुष्कळ किडकिडीत (बारीक) माणसाला अधिक कोरडी, ‘प्रो-बायोटिक’युक्त आणि व्यायामपूर्ण दिनचर्या चालणार नाही अन् ना जळजळ होणार्या व्यक्तीला ताक ! आयुर्वेदात या सगळ्यांतून मार्ग काढायला प्रकृती, अग्नी आणि त्या माणसाची दिनचर्या यांचे वर्णन केले आहे. व्यायाम करणार्या आणि त्यातून अग्नी उत्तम झालेल्या लोकांमध्ये अशा अतिरेकी गोष्टी केल्या, तरी तितकासा त्रास लगेच होत नाही, हेही दिसते, म्हणजे व्यायाम हा थेट ‘प्रो-बायोटिक’ आहे का ? तर नाही; पण तो पचन सुधारायला साहाय्य करतो का ? तर हो.
३. आयुर्वेदानुसार आहार विहार करणे महत्त्वाचे !
आयुर्वेदातील अग्नीचा विचार करून आहार विहार केला असता सर्वांगीण आणि दूरगामी लाभ दिसतात. अग्नी चांगला ठेवण्यासाठी वेळच्या वेळी खाणे; भूक लागली, तरच खाणे, आजारावर समूळ उपचार करणे, व्यायाम करणे, वेळेवर झोपणे असे उपाय सगळ्यांना ठाऊक असतात; पण बर्याचदा ते कुणी करतांना दिसत नाही. अग्नी चांगला ठेवण्याचा प्रयत्न करतांना त्या उपायांनी व्यक्तीला त्रास न होता चांगले ‘बॅक्टेरिया’ आपसूकच वाढणार आहेत आणि वाईट हळूहळू न्यून होत जाणार आहे; पण ‘चांगले ‘बॅक्टेरिया’ वाढवू’, अशा विचारांनी बाकी दिनचर्या नीट न करता त्याची भरपाई म्हणून प्रतिदिन कुणी किमची (मसालेदार लोणचेयुक्त कोबीचा कोरियन पदार्थ) किंवा पुष्कळ ताक वा व्हिनेगर हे खायला-प्यायला लागले, तर त्याचा लाभ होण्यापेक्षा तोटा अधिक लवकर आणि लांबपर्यंत टिकणारा होणार हे नक्की !
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (३१.८.२०२४)
(साभार : वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये यांचे फेसबुक)
‘चिकुन गुनिया’ हा झालेला असो किंवा नसो, त्या लक्षणांचे किंवा ताप १-२ दिवस येऊन गेल्यावर सांधेदुखी चालू झालेले रुग्ण सध्या अधिक आहेत. ताप हे मूळ कारण लक्षात घेऊन तापासह सांधे / स्नायूदुखी असणार्या किंवा ताप गेल्यावर सांधेदुखी पुष्कळ दिवस टिकलेल्या लोकांना उपयोगी असे विशिष्ट काढे, गोळ्या-औषधे घेतांना पुढील काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत.
१. घराभोवती पाणी साचत नाही ना, याकडे लक्ष ठेवणे. २. दारे, खिडक्या यांच्या जाळ्या लावणे. घरात रुग्ण असतील, तर डासांविषयी अधिक जागरूक असणे, त्यापासून पूर्ण सुरक्षा करणे. ३. ढगाळ आणि पावसाळा ऋतू असतांना नैसर्गिकपणे सांध्यांच्या वेदना अधिक दिवस टिकत असल्याने शक्यतो या दिवसात आवर्जून कोमट किंवा आटवलेले पाणीच पिणे. ४. सांध्यांच्या ठिकाणी तेल लावून जिरवणे टाळणे. कोरडा शेक (पाण्याच्या बालदीत पाय टाकून बसणे नाही) आणि रात्रीचे लवकर अन् हलके जेवण या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. – वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये |