हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्तरेषांचे (तळहातांवरील रेषांचे) केलेले विश्लेषण !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा आज भाद्रपद शुक्ल प्रतिपदा म्हणजेच ४ सप्टेंबर २०२४ या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने ऋषिकेश, उत्तराखंड येथील हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण येथे देत आहोत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त साधकांकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या डाव्या तळहातावरील रेषांचे विश्लेषण

‘व्यक्तीच्या डाव्या हातावरील रेषांवरून तिच्या मागील जन्माविषयी बोध होतो. मागील जन्मात व्यक्तीचा स्वभाव, क्षमता, कौशल्य, कार्यक्षेत्र, प्रारब्ध, साधना इत्यादींच्या संदर्भात माहिती मिळते. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या डाव्या हाताचे (मागील जन्माविषयीचे) विश्लेषण पुढे दिले आहे.

१ अ. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांची मागील जन्मातील गुणवैशिष्ट्ये : सद्गुरु डॉ. गाडगीळ हे मागील जन्मी अतिशय सुसंस्कृत, शिस्तबद्ध, व्यावहारिक आणि सृजनशील (रचनात्मक, नवनिर्मिती करणारा, creative) होते. त्यांच्यात उत्तम बौद्धिक क्षमता, विचारांमध्ये सुस्पष्टता, प्रबळ इच्छाशक्ती आणि कृतीशीलता होती. त्यांना गतजन्मी मोठा लोकसंग्रह लाभला होता. त्यांची साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी होती. समाजात त्यांचा नावलौकिक होता. ते इतरांसाठी स्वतःचे धन व्यय करत असत. त्यांनी प्रसिद्धीपराङ्मुख राहून मानवजातीसाठी कार्य केले.

१ आ. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्या गतजन्मीच्या साधनाप्रवासात आलेले अडथळे

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला

१ आ १. प्रारब्ध आणि स्वभावदोष यांमुळे साधनाप्रवासात बाधा निर्माण होणे : गेल्या काही जन्मांपासून त्यांचा आध्यात्मिक प्रवास चालू होता. ते त्यासाठी कठोर परिश्रम घेत होते; परंतु काही अडथळ्यांमुळे तो प्रवास खंडित झाला होता. याला प्रारब्धही कारणीभूत होते. आक्रमकता, हट्टीपणा इत्यादी दोष त्यांना साधनेत बाधक ठरत होते. त्यांच्या डाव्या तळहातावरील मंगळ ग्रहाचा उंचवटा खोलगट असल्यामुळे त्यांना थोडा न्यूनगंडही होता (बरोबर – सद्गुरु डॉ. गाडगीळ). ते अलिप्त रहाण्याचा प्रयत्न करत होते आणि बर्‍याच कामनांपासून ते अलिप्तही झाले होते; परंतु वैवाहिक जीवन आणि त्यातील उत्तरदायित्वांमध्ये ते अडकले होते. हा कर्मफलन्याय या जन्मातही त्यांच्या जीवनात आहे.

१ आ २. बौद्धिकता आणि तार्किकता यांच्यामुळे कुंडलिनी जागृत होण्यास अडथळा निर्माण होणे : मनाने केलेला दृढनिश्चय ते समर्पणाने आणि जिद्दीने पूर्ण करत; परंतु निर्णय घेतांना त्यांची मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष होत असे (हो, माझ्यात आत्मविश्वास कमी होता. – सद्गुरु डॉ. गाडगीळ). मन आणि बुद्धी यांच्यातील द्विधा मनस्थितीमुळे ते सुषुम्ना नाडी आणि सप्तचक्रे यांना सक्षम करू शकले नाहीत. प्रेम, करुणा आणि समभाव यांच्यापेक्षा बौद्धिक अन् तार्किक गोष्टींत त्यांना अधिक रस असल्यामुळे त्यांची कुंडलिनी जागृत होण्यास अडथळा निर्माण झाला होता. ते ‘योग्य अन् अयोग्य काय ?’, यात अडकले होते. त्यांच्या डाव्या तळहातावरील मस्तक-रेषा (बुद्धीशी संबंधित रेषा) तीक्ष्ण आणि अखंड असली, तरी त्यांची हृदय-रेषा (मनाशी संबंधित रेषा) तितक्या प्रमाणात तीक्ष्ण नसल्यामुळे ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोचू शकत नव्हते; त्यामुळे ते निराश होते. त्यांना त्याविषयी संतापही होता (बरोबर – सद्गुरु डॉ. गाडगीळ); परंतु ते शिवभक्त असल्यामुळे शिवाच्या कृपेमुळे त्यांचा साधनाप्रवास होत होता.

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या उजव्या तळहातावरील रेषांचे विश्लेषण

व्यक्तीच्या उजव्या तळहातावरील रेषांवरून तिच्या वर्तमान (चालू) जन्माविषयी बोध होतो. ‘व्यक्ती तिची क्षमता कशा प्रकारे वापरते ?, तिच्यातील कमतरतांवर काय उपाय योजते ?, तिचा साधनाप्रवास कसा चालू आहे ?, साधनेत कोणते अडथळे आहेत ?’ इत्यादींच्या संदर्भात माहिती मिळते. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या उजव्या हाताचे (वर्तमान जन्माविषयीचे) विश्लेषण पुढे दिले आहे.

२ अ. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांची चालू जन्मातील वैशिष्ट्ये : सद्गुरु डॉ. गाडगीळ यांचा स्वभाव नम्र, इतरांच्या वेदनांप्रती संवेदनशील असणारा, दयाळू, सेवाभावी, भावनाशील, समंजस, कुणाविषयी पूर्वग्रह न ठेवणारा, दृढ निश्चयी आणि प्रबळ इच्छाशक्ती असलेला आहे.

२ आ. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्या चालू जन्मातील साधनाप्रवासात असलेले अडथळे

२ आ १. ‘योग्य आणि अयोग्य काय ?’ यात अडकणे : ते अद्याप गतजन्मीप्रमाणे ‘योग्य आणि अयोग्य काय ?’ यात अडकले आहेत; परंतु आधीच्या तुलनेत ते प्रमाण आता पुष्कळ अल्प झाले आहे. त्यांनी त्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले आहेत; परंतु उजव्या तळहातावरील संबंधित रेषा पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत (बरोबर – सद्गुरु डॉ. गाडगीळ). ते सिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत; परंतु हा साधनामार्गातील एक अडथळा आहे आणि त्यामुळे अनिष्ट शक्ती काही प्रमाणात हस्तक्षेप करत असाव्यात.

२ आ २. आध्यात्मिक त्रास किंवा शाप असणे : कर्मफलन्यायानुसार त्यांना आध्यात्मिक त्रास किंवा शाप असू शकतो; कारण त्यांच्या मधल्या (शनीच्या) बोटावर एक डाग दिसतो (हो. वर्ष २०१४ मध्ये मला शनि महाराजांची पूजा करायला सांगितली होती. ती मी ६ मास केली. – सद्गुरु डॉ. गाडगीळ). हा एक आध्यात्मिक अडथळा असू शकतो.

२ आ ३. ‘आपल्याला महत्त्व मिळावे’, अशी काही प्रमाणात इच्छा असणे : त्यांच्यातील प्रबळ इच्छाशक्ती, पूर्वजन्मांतील साधना आणि ईश्वराशी एकरूप होण्याची तळमळ यांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने झाली; परंतु त्यांनी अनाहत चक्राची शुद्धी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ‘आपल्याला महत्त्व मिळावे’, अशी त्यांची काही प्रमाणात इच्छा असून हा त्यांच्या आध्यात्मिक प्रवासातील अडथळा आहे (बरोबर – सद्गुरु डॉ. गाडगीळ).

२ इ. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्या जीवनात नजिकच्या काळात मोठे परिवर्तन येऊन त्यांना पुष्कळ कीर्ती लाभणार असणे : या जन्मात त्यांनी साधनेला उशिरा प्रारंभ केला असला, तरी पूर्वजन्मी असलेली साधनेची तळमळ या जन्मातही असल्यामुळे ते संतपद गाठू शकले. वयाच्या २५, ३५ आणि ५० या वर्षांमध्ये त्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन झाले असावे (२५ व्या वर्षी ‘पी.एच्.डी.’ (विद्यावाचस्पती) पदवीसाठी प्रवेश मिळाला, ३५ व्या वर्षी साधनेस आरंभ झाला आणि ५० व्या वर्षी साधनेत काही प्रमाणात अधोगती झाली. – सद्गुरु डॉ. गाडगीळ). आणखी एक मोठे परिवर्तन त्यांच्या जीवनात नजिकच्या काळात येणार आहे. त्याचे स्वरूप बाह्य किंवा आंतरिक असेल किंवा साधनेसाठी चालना देणारा एखादा आशीर्वाद असेल. या परिवर्तनात त्यांना त्यांच्या आराध्यदेवतेच्या आशीर्वादाने पुष्कळ कीर्ती लाभणार आहे. ही संधी चुकल्यास पुन्हा साधनेत उच्च स्थितीला जाणे कठीण होईल.

२ ई. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्यात शिवतत्त्व असून शिव त्यांचे मार्गदर्शक असणे : त्यांचे मुख्य मार्गदर्शक भगवान शिव होते; म्हणून त्यांच्यात शिवतत्त्व अधिक आहे. ध्यान, सेवा, त्याग आणि तंत्रविद्या हा त्यांचा साधनामार्ग असावा. जीवनात शिवतत्त्व असल्यामुळे मोक्ष हा त्यांचा जीवनाचा उद्देश आहे. एकंदर त्यांना करण्यासारखे कार्य पुष्कळ अल्प आहे. त्यांनी सर्वकाही शिवाच्या चरणी अर्पण करून त्याच्याकडे केवळ मोक्ष मागायचा आहे. (मान्य – सद्गुरु डॉ. गाडगीळ). हा त्यांचा शेवटचा जन्म असावा’.

– हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला, ऋषिकेश, उत्तराखंड. (२३.४.२०२४)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.