बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाने कुराण जाळले !
३ बहिणींवरील अत्याचाराने होता त्रस्त
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील एका मुसलमान तरुणाचा व्हिडिओ प्रसारित झाला असून, त्यात तो कुराण जाळतांना दिसत आहे. व्हिडिओ बनवतांना त्या तरुणाने इस्लामविषयी अपशब्दही वापरले आहेत. तरुणाने व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याच्या तिन्ही बहिणींना तिहेरी तलाक आणि नंतर निकाह हलालासारख्या घाणेरड्या कृत्याला सामोरे जावे लागले. (देशात तिहेरी तलाकवर बंदी असतांनाही मुसलमान महिलांवर अत्याचार करणारी ही क्रूर प्रथा मुसलमान समाजामध्ये चालूच आहे, हेच यातून दिसून येते ! – संपादक) यानंतर त्याच्या एका बहिणीने एका मुलाला जन्म दिला. तिला हे मूल कोणाचे आहे याची कल्पना नाही; कारण सासरे आणि मेहुणे यांनी बहिणीसोबत हलाला केला होता. पहिल्या पतीने तलाक दिल्यावर परत त्याच्याशीच विवाह करायचा असेल, तर महिलेने अन्य कुणाशी तरी विवाह करून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवून नंतर त्याने तलाक दिल्यावर परत पहिल्या पतीशी विवाह करण्याच्या प्रथेला निकाह हलाला म्हटले जाते.
इम्रान नावाच्या तरुणाने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, त्याला इस्लाम सोडून हिंदु धर्मात प्रवेश करायचा आहे. हा व्हिडिओ पाहून मुसलमान समाजातील लोक संतप्त झाले. त्यांनी घाईघाईने पोलीस ठाणे गाठून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. पोलिसांना तक्रार मिळताच गुन्हा नोंदवून त्यांनी इम्रानला अटक केली. बुलंदशहरच्या शिकारपूरचे नगरसेवक शाहिद यांनी इम्रान याच्या विरोधात कोतवाली शिकारपूरमध्ये तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.