हृदयविकाराचा झटका आल्यावर आणि ‘अँजिओप्लास्टी’ करतांना ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. संतोष जोशी (वय ४९ वर्षे) यांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !
१. छत्रपती संभाजीनगर येथे गेल्यावर आलेला हृदयविकाराचा झटका
१ अ. कुटुंबियांच्या समवेत कोल्हापूर येथून संभाजीनगरला गेल्यावर तेथील ४५ डिग्री तापमानामुळे उष्णतेचा त्रास होऊ लागणे : ‘मी पत्नी (सौ. मेघमाला) आणि मुलगी (कु. राजेश्वरी, वय १२ वर्षे) यांच्यासह उन्हाळ्यात आमच्या गावी छत्रपती संभाजीनगर येथे गेलो होतो. माझ्या वडिलांच्या डोळ्याची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे २५.५.२०२४ या दिवशी शस्त्रक्रिया झाली. दुसरे दिवशी वडिलांना घरी पाठवण्यात येणार होते. तेव्हा तिकडे ४५ डिग्री तापमान होते आणि मला ते सहन होत नव्हते. मला सतत दगदग होत होती आणि झोपही लागत नव्हती.
१ आ. दुचाकी गाडीवरून रुग्णालयात जातांना पुष्कळ अस्वस्थ वाटून ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ हा नामजप चालू होणे, रुग्णालयात पोचल्यावर हात दुखू लागणे आणि गुरुदेवांना प्रार्थना करणे : सकाळी ८.३० वाजता मी घरातून एकटाच दुचाकी गाडी घेऊन रुग्णालयात जाण्यास निघालो. काही अंतर गेल्यावर अकस्मात् माझे दोन्ही हात दुखू लागले आणि मला पुष्कळ अस्वस्थ वाटू लागले. त्या वेळी माझा आपोआप ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ हा नामजप चालू झाला. मी ‘गुरुदेवा, मला काय होत आहे ?, हे मला काहीच कळत नाही’, असा विचार करत रुग्णालयात पोचलो. मी दुचाकी गाडी रुग्णालयाच्या वाहनतळात ठेवून पुढे चालू लागलो; पण अकस्मात् माझी चालण्याची गती न्यून होऊन मला घाम फुटू लागला. माझे हातही पुष्कळ दुखू लागले. मी गुरुदेवांना प्रार्थना करू लागतो, ‘गुरुदेवा, माझे रक्षण करा. माझ्याभोवती तुमचे संरक्षककवच असू दे.’
१ इ. पायर्या चढून पहिल्या माळ्यावरील खोलीत गेल्यावर पुष्कळ धाप लागून अस्वस्थ वाटू लागणे : मी रुग्णालयाच्या मार्गिकेतून चालत होतो; पण मला घाम येतच होता. तेथील उद्वाहन (लिफ्ट) लवकर आले नाही; म्हणून मी १६ पायर्या चढून पहिल्या माळ्यावर जेथे वडिलांना ठेवले होते, तेथे पोचलो. त्या वेळी मला पुष्कळ धाप लागून घाम येण्याचे प्रमाण वाढले होते आणि अतिशय अस्वस्थ वाटत होते.
१ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांना प्रार्थना करून बिंदूदाबनादी उपाय, तसेच ‘विठ्ठल विठ्ठल’, असा नामजप करणे अन् त्यामुळे त्रासाचे प्रमाण उणावणे : मी माझ्या तळहातावरील हृदयासंबंधीच्या सर्व बिंदूंचे दाबन करत होतो. मला गुरुदेवांनी बिंदूदाबनाचे जे ज्ञान दिले होते, ते सर्व मी वापरून पहात होतो. मी गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांना ‘मला हिंदु राष्ट्र पहायचे आहे. तुमची सेवा करायची आहे’, अशी सतत प्रार्थना करत होतो. मी अत्तर आणि कापूर यांचे आध्यात्मिक उपायही केले. मी सतत ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होतो. मी कंबरेवर हात ठेवून मोठ्याने ‘विठ्ठल विठ्ठल’ नामजपही केला. त्यानंतर माझे त्रास न्यून झाले. मला होत असलेले त्रास आणि मी करत असलेले उपाय, हे सर्व माझी धाकटी बहीण (सौ. दीपाली कुलकर्णी) पहात होती. ती मला तेथील आधुनिक वैद्यांकडे जाण्यास सांगू लागली; पण मी म्हटले, ‘‘आता मला चांगले वाटत आहे. प्रथम आपण वडिलांना घरी घेऊन जाऊ. नंतर संध्याकाळी मी डॉक्टरांकडे जाईन.’’
१ उ. आधुनिक वैद्यांनी ‘हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे’, असे सांगून काही चाचण्या करण्यास सांगणे, तेव्हा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनीच सांभाळले आहे’, याची जाणीव होणे : संध्याकाळी आम्ही आधुनिक वैद्यांना भेटून मला झालेल्या त्रासाविषयी सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे.’’ तेव्हा ‘माझ्या गुरुमाऊलींनी मला अक्षरशः फुलाप्रमाणे सांभाळले होते’, याची मला अनुभूती आली. आधुनिक वैद्यांनी माझा ‘हृदयस्पंदन आलेख (ईसीजी)’ काढला. त्यात दोष दिसत होता; म्हणून त्यांनी काही गोळ्या दिल्या आणि काही चाचण्याही करायला सांगितल्या. मी म्हणालो, ‘‘मी कोल्हापूरला परत गेल्यावर या चाचण्या करून घेईन.’’
दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन ‘हृदयस्पंदन आलेख’ काढला. तेव्हा तो ‘नॉर्मल’ आला; पण माझा रक्तदाब अधिक होता.
२. कोल्हापूर येथे केलेली ‘अँजिओप्लास्टी’ !
२ अ. ‘परभणी ते कोल्हापूर’ असा प्रवास एकट्याने करून घरी पोचल्यावर दरदरून घाम फुटून पुष्कळ अस्वस्थ वाटू लागणे : नंतर शनिवारी आम्ही माझ्या सासुरवाडीला, परभणीला गेलो; पण तिथेही तापमान पुष्कळ असल्यामुळे मला सारखा घाम येत होता. माझा डावा हात दुखून मला पुष्कळ अस्वस्थही वाटत होते. त्यामुळे मी कोल्हापूरला घरी जाण्याचे ठरवले आणि ‘ट्रॅव्हल्स’ने एकटाच कोल्हापूरला गेलो. रविवारी सकाळी ७.३० वाजता मी घरी पोचलो आणि घराची स्वच्छता केली. नंतर अंघोळ करून देवपूजा करू लागलो. तेव्हा मला दरदरून घाम फुटला आणि पुष्कळ अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा मी गुरुदेवांना प्रार्थना केली आणि जिल्हासेविका डॉ. शिल्पा कोठावळे, तसेच अन्य साधक यांना भ्रमणभाष केला.
२ आ. ‘अँजिओग्राफी’ आणि ‘अँजिओप्लास्टी’ करतांना गुरुदेवांचा धावा करणे आणि ‘आधुनिक वैद्यांच्या रूपात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरच शस्त्रक्रिया करत आहेत’, अशी अनुभूती येणे : नंतर साधकांनी मला रुग्णालयात नेले आणि २८.५.२०२४ या दिवशी माझी अँजिओग्राफी (टीप १) केली. तेव्हा ‘माझ्या हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीत ८५ टक्के अडथळा आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. त्यामुळे लगेच ‘अँजिओप्लास्टी’ही (टीप २) करावी लागली. तेव्हा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि सद्गुरु स्वाती खाडये यांचा सतत धावा करत होतो. ‘जे करायचे ते तुम्हीच करा गुरुदेवा, माझ्या हृदयात केवळ तुम्हीच आहात’, अशी प्रार्थना करत होतो. तेव्हा आधुनिक वैद्यांच्या रूपात ‘साक्षात् गुरुदेवच माझी शस्त्रक्रिया करत आहेत’, अशी मला अनुभूती आली.
टीप १ – अँजिओग्राफी : ‘क्ष’ किरणांनी केलेली रक्तवाहिन्यांची तपासणी
टीप २ – अँजिओप्लास्टी : हृदयाकडे रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर करण्यासाठी केलेले शस्त्रकर्म
मी पुष्कळ भाग्यवान आहे. काळजी घेणारा साधक-परिवार मला लाभला, तसेच ‘पदोपदी गुरुदेव माझ्यासमवेत असून तेच माझी काळजी घेत आहेत’, असेही मला स्पष्टपणे जाणवले.
२ इ. अतीदक्षता विभागात हात पुष्कळ दुखत असतांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप करणे आणि त्यामुळे हाताचे दुखणे न्यून होणे : ‘अँजिओप्लास्टी’ झाल्यावर मला अतीदक्षता विभागात (आय.सी.यू.मध्ये) ठेवले होते. माझा हात पुष्कळ दुखत होता आणि मला झोप येत नव्हती. त्या वेळी माझ्याकडून आपोआप ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप मोठ्याने चालू झाला. अतीदक्षता विभागातील सर्व रुग्ण माझा नामजप ऐकत होते. त्यानंतर माझ्या हाताचे दुखणे न्यून झाले. इतर वेळी या विभागात बोलण्यास मनाई असते; पण डॉक्टरांच्या सकट सर्वच रुग्ण माझा नामजप ऐकत होते. तिथेही मी गुरुदेवांची कृपा अनुभवली.
‘हृदयविकाराचा झटका येऊन, ४०० – ५०० कि.मी.चा प्रवास एकट्याने करून आणि रक्तदाब १८०/१२० mmHg असूनही ‘मी जिवंत कसा राहिलो ?’, याचे मला आश्चर्य वाटते. (सर्वसाधारण निरोगी व्यक्तीचा रक्तदाब १२०/८० mmHg इतका असतो.) केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे हे शक्य झाले. ते सतत माझ्या समवेत होते. त्यांनी मला अनेक वेळा जीवनदान दिले आहे. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. संतोष जोशी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४९ वर्षे), कोल्हापूर (२३.७.२०२४)
|