‘भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ईश्वर लीला करतो’, याविषयी साधिकेला आलेली अनुभूती !
१. वृंदावन येथे गेल्यावर बांके बिहारी भगवान यांचे चरणदर्शन घेण्याऐवजी मथुरेला सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांचे दर्शन घेण्याचे ठरवणे
‘२.५.२०२४ या दिवशी मी वृंदावन (उत्तरप्रदेश) येथे गेले होते. तिथे ७ दिवस ‘भक्तमाल कथा’ होती आणि ९.५.२०२४ या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आम्हाला बांके बिहारी भगवान यांचे चरणदर्शन होणार होते. तिथे पुष्कळ गर्दी असल्याने चरणदर्शनासाठी बराच वेळ लागणार होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मथुरा येथे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांच्या चरणांचे दर्शन घेऊया. सद्गुरु आणि भगवान यांच्यात काहीच भेद नाही.’
टीप – ‘भक्तमाल’ हा हिंदी भाषेतील एक ऐतिहासिक ग्रंथ आहे. श्री नाभादासजी यांनी त्याची रचना केली. या ग्रंथात २०० हून अधिक भक्तांच्या कथा आहेत.
२. मथुरेला जात असतांना नातेवाइकांनी वरील निर्णयाचा विरोध करणे
ज्या वेळी मी वृंदावनहून मथुरेला येत होते, त्या वेळी सगळे नातेवाईक मला म्हणत होते, ‘‘लोक दूरवरून वृंदावन येथे दर्शनासाठी येतात आणि तू इतकी चांगली संधी सोडून जात आहेस. तू वेडी आहेस का ? असे कुणीही करत नाही. तू बांके बिहारी भगवान यांचे दर्शन घेऊनच गेले पाहिजेस.’’
३. मथुरेला गेल्यावर सद्गुरु पिंगळेकाका देहलीला गेले असल्याचे समजणे आणि गुरुकृपेने त्याच दिवशी रात्री ते मथुरेला आल्याने त्यांचे दर्शन घेता येणे
मी मथुरेला पोचल्यानंतर तिथल्या साधकांना ‘सद्गुरु पिंगळेकाका आहेत का ?’, असे विचारले. तेव्हा ते देहलीला गेले असून २ दिवसांनी मथुरेला येणार असल्याचे मला कळले. ‘ईश्वराचे दर्शन २ दिवसांनी घेऊ’, असा विचार करून मी शांत राहिले. ‘सद्गुरु पिंगळेकाका त्याच दिवशी येत आहेत’, असे मला संध्याकाळी समजले. त्या वेळी माझे मन कृतज्ञतेने भरून आले. मला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रात्री ११ वाजता सद्गुरु काकांचे दर्शन घेता आले.
सकाळी सद्गुरु काकांनी मला सांगितले, ‘‘मला देहलीत आणखी २ – ३ ठिकाणी जायचे होते; परंतु अकस्मात् माझ्या मनात विचार आला, ‘आपण आता मथुरेला गेले पाहिजे’ आणि मी लगेचच मथुरेचे तिकीट काढले.’’ त्या वेळी मला वाटले, ‘सद्गुरु काका माझ्यासाठीच मथुरेला आले आहेत.’
‘भक्तांसाठी ईश्वर कशी लीला करतो ?’, हे अनुभवण्यास दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु पिंगळेकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. बबिता खत्री (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४७ वर्षे), उज्जैन, मध्यप्रदेश. (५.५.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |