दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : फलाट आणि रूळ यांमध्ये अडकलेली महिला बचावली !; रस्त्याच्या कडेला बसलेल्या ३ जणांना चारचाकीची धडक !…
फलाट आणि रूळ यांमध्ये अडकलेली महिला बचावली !
डोंबिवली – कल्याणहून सी.एस्.एम्.टी.कडे निघालेली सकाळी ८.५० वाजताची १५ डब्यांची अतीजलद लोकल डोंबिवली रेल्वेस्थानकात आली. गर्दीच्या वेळेत गाडीत चढतांना मानसी किर (वय २४ वर्षे) यांचा लोकल दरवाजामधील आधारदांडा हातामधून सटकला आणि त्या पाय घसरल्याने फलाटावरून मधल्या पोकळीतून थेट रुळाच्या दिशेने पडल्या. त्यामुळे तात्काळ प्रवाशांनी आरडाओरडा करून मोटरमनला लोकल थांबवून ठेवण्याची विनंती केली. गोंधळ पाहून रेल्वे कर्मचारी, सुरक्षा जवान, लोहमार्ग पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी प्रवाशांच्या साहाय्याने महिलेला सुरक्षित बाहेर काढले.
रस्त्याच्या कडेला बसलेल्या ३ जणांना चारचाकीची धडक !
गोंदिया (नागपूर) – गोंदियातील पॉलिटेक्निक महाविद्यालयासमोर भरधाव चारचाकीने रस्त्याच्या कडेला बसलेले २ ट्रकचालक आणि एक सायकलस्वार यांना उडवले. या अपघातात तिघेही घायाळ झाले. अतीवेगाने खोमेश उरकुडे (वय २४ वर्षे) याचे चारचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. अपघात सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला आहे.
गुन्हेगाराचा पोलिसांवर तलवारीने वार !
बुलढाणा – एका परिवाराला बेदम मारहाण होत असल्याच्या माहितीवरून कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर कुख्यात गुन्हेगार मनोजसिंह टाक याने आधी दगडफेक आणि नंतर धारधार तलवारीने वार केला. या वेळी पोलिसांनी स्वरक्षणासाठी ३ गोळ्या झाडल्या. या चकमकीत अंधाराचा लाभ घेत मनोजसिंह टाक पसार झाला. यात ३ पोलीस किरकोळ घायाळ झाले आहेत.
संपादकीय भूमिका : कायद्याचा धाक नसलेले गुन्हेगार !