मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ३१ ऑगस्टनंतर आवेदन करणार्यांना ३ सहस्र रुपये मिळणार नाहीत ! – अदिती तटकरे, मंत्री, महिला आणि बालविकास
गडचिरोली – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी ज्या महिलांनी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी केली आहे, त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे. या महिलांना दोन्ही महिन्यांची रक्कम एकत्रित मिळणार आहे; मात्र ३१ ऑगस्टनंतर नोंदणी करणार्या महिलांना ३ सहस्र रुपये मिळणार नाहीत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी २ सप्टेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
मंत्री अदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, आता या पुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे. ३१ ऑगस्ट हा नोंदणीचा शेवटचा दिनांक नसून नाव नोंदणी यापुढेही कायम रहाणार आहे. योजनेला राज्यभरातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २ कोटी ४० लाखांपर्यंत आवेदने आली आहेत. यातील दीड कोटी रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यातील महिलावर्ग योजनेपासून वंचित रहाता कामा नये, अशी सरकारची धारणा आहे.