उत्तरप्रदेश : मिरगपूर गावात गेल्या ४०० वर्षांत एकही बलात्कार नाही कि कुणी मांसाहारी नाही !
१७ व्या शतकात एका संतांनी तपश्चर्या केल्यानंतर गावकर्यांकडून घेतले होते वचन
सहारनपूर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील मिरगपूर या गावाचे नाव ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवण्यात आले आहे. सहारनपूर गावापासून अवघ्या ८ किलोमीटरवर हे गाव असून येथे पिढ्यान्पिढ्या कुणीही मद्यपान केलेले नाही. या गावात मद्यविक्रीचे एकही दुकान नाही. विशेष म्हणजे गेल्या ४०० वर्षांत येथे बलात्कार तर नाहीच, विनयभंगाची घटनाही घडलेली नाही. येथे सर्वजण शाकाहारी आहेत. यामुळेच काली नदीच्या काठावर वसलेले मिरगपूर गाव हे देशातील सर्वांत पवित्र मानले जाते.
After the penance of a Saint 400 years ago, the problems in the village were solved !https://t.co/N6GSjW6SRG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 3, 2024
१. या गावाची लोकवस्ती १० सहस्र आहे. येथे कांदा-लसूण खाण्यावरही बंदी असून एकूणच २६ प्रकारचे तामसिक पदार्थ पूर्णपणे निषिद्ध आहेत.
२. सहारनपूर जिल्हा प्रशासनानेही या गावाला ‘नशामुक्त गाव’ घोषित केले आहे.
३. विशेष असे की, या गावातील मुली विवाह करून दुसर्या गावी गेल्या, तर त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचण येऊ नये; म्हणून त्यांना गावातील प्रतिज्ञेतून मुक्त केले जाते. असे असले, तरी गावी येणारा जावई या व्रताला बांधील असतो आणि त्याला मांसाहार कायमचा सोडून द्यावा लागतो.
गुरु-शिष्य परंपरेशी एकनिष्ठ असलेले गावकरी !
गुरु-शिष्य परंपरा, हे मिरगपूर गावाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. गावातील प्रत्येक व्यक्ती त्याचे पालन करते. गावकरी सांगतात की, ‘आपण आपले जीवन गुरूंच्या चरणी समर्पित केले पाहिजे’, असा भाव गावातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतो.
४०० वर्षांपूर्वी एका संतांच्या तपश्चर्येनंतर गावातील समस्या सुटल्या !मिरगपूरच्या वेशीवर बाबा फकीरदास यांचे मंदिर आहे. मंदिराचे महंत कालुदास सांगतात की, १७ व्या शतकात राजस्थानमधील पुष्कर येथील सिद्धपुरुष बाबा फकीरदास यांनी गावात येऊन तपश्चर्या केली होती. त्यांनी गावकर्यांचे त्रास त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याने दूर केले. येथून निघतांना त्यांनी गावकर्यांकडून नशा आणि मांसाहार न करण्याचे वचन घेतले. तेव्हापासून ती परंपरा पाळली जात आहे. |
संपादकीय भूमिकाआध्यात्मिक सामर्थ्य काय असते ?, हे या उदाहरणावरून लक्षात येते. शारीरिक आणि मानसिक स्तरावर प्रयत्न करण्यासह आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न झाले, म्हणजे जनतेने साधना चालू केली, तर राष्ट्रासमोरील सर्व समस्या कायमच्या सुटतील ! |