आदर्श वागणुकीचे मूर्तीमंत उदाहरण : वासुदेव बळवंत गोगटे !

१ ऑगस्ट २०२४ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात ‘साधेपण’ या सदरामध्ये युरोपमधील नेदरलँडचे १४ वर्षे पंतप्रधान राहिलेले मार्क रुटे यांचे उदाहरण देऊन कौतुक केले आहे. त्याविषयी आपले अभिनंदन ! तसेच उदाहरण आपल्या भारतात आणि पुणे येथेही घडलेले आहे. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे आणि आचारांचे उपासक हॉटसन गोगटे उपाख्य आदरणीय वासुदेव बळवंत गोगटे !

 

वासुदेव बळवंत गोगटे

१. आदरणीय वासुदेव बळवंत गोगटे हे पुण्याच्या महापौरपदी बराच काळ होते. ते ज्या दिवशी महापौर पदावरून निवृत्त झाले, त्याच दिवशी महानगरपालिकेतच त्यांना दिलेली त्या वेळची ‘प्लायमोउथ’ गाडी सोडून ते नेहमीप्रमाणे टांग्याने घरी आले; पण त्यांचे कौतुक कुठेच नाही.

श्री. विद्याधर नारगोलकर

२. ते महापौर असतांना महापौरांचा नियम असतो की, त्यांनी त्यांना मिळालेली महानगरपालिकेची गाडी फक्त महानगरपालिका हद्दीतच वापरायची असते. गोगटे यांनी महानगरपालिकेची गाडी कोणत्याही कामासाठी महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर नेली नाही. त्यांच्या नावावर म्हणजे महापौरपदी असतांना प्रवास खर्च हा त्यांनी फक्त कामासाठी केला आहे. त्यामुळे तो कमीत कमी आहे आणि ते रेकॉर्ड अजून कुणीही मोडलेले नाही.

३. क्रांतीकारकांनीही स्वातंत्र्यसैनिकांचा ताम्रपट स्वीकारला नाही. गोगटे यांच्या कुटुंबियांनी कुठलाही लाभ घेतला नाही. त्यांना त्यांची मुले विचारायची, ‘तुम्ही ताम्रपट का घेत नाही ?’ ‘ताम्रपट मिळाल्यावर शाळेतील शैक्षणिक शुल्कामध्ये आणि इतर प्रवास वगैरे सुविधांमध्ये सूट मिळायची, ती आपणास मिळेल’, असे मुलांना वाटत असे; पण अण्णासाहेब म्हणजे गोगटे आपल्या मुलांना सांगायचे की, तुम्हाला काही कमी आहे का ? मी जे काम केले ते देशासाठी केले आहे. (हे त्यांचे उत्तर आजही त्यांचे चिरंजीव आपल्याला सांगतील.)

अशा देशभक्तीच्या घटना आपल्या देशातही घडतात; पण त्याची प्रसिद्धी किंवा त्याची आठवणही आपल्याला अशा वेळी होत नाही, हे आपले दुर्दैव आहे. असो माझी सर्वांना अशी विनंती आहे की, या गोष्टीही आपण लोकांसमोर ठेवायला हव्यात.

– आपला बंधुवत,

श्री. विद्याधर नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा, पुणे.