सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी राबवण्यात येणार्या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !
वाचक, हितचिंतक आणि राष्ट्रप्रेमी हिंदू यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !
‘७.९.२०२४ या दिवशी श्री गणेशचतुर्थी आहे. श्री गणेशचतुर्थीला, तसेच गणेशोत्सवाच्या दिवसांत पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटींनी गणेशतत्त्व कार्यरत असते. त्यामुळे अनेक गणेशभक्त या कालावधीत अधिकाधिक सेवा करून सुखकर्ता, दुःखहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या गणेशाची कृपा संपादण्याचा प्रयत्न करतात.
गणेशभक्तांनी गणेशोत्सव धर्मशास्त्रानुसार योग्य पद्धतीने साजरा केल्यास त्याचा त्यांना खर्या अर्थाने लाभ होतो. या उत्सवामधून हिंदूंचे प्रभावी संघटन आणि समाजामध्ये जागृती होण्याकरता उत्सवात होणारे अपप्रकार दूर करणे आवश्यक आहे. धर्मशिक्षण देऊन हिंदु बांधवांमध्ये जागृती करणारी हिंदु जनजागृती समिती याच उद्देशाने संघटनासाठी प्रयत्नशील आहे.
यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शाडू मातीच्या सात्त्विक श्री गणेशमूर्तीचा आध्यात्मिक आणि पर्यावरणीय लाभ यांविषयी समिती समाजाचे प्रबोधन करत आहे. असात्त्विक मूर्तीपेक्षा शाडू मातीच्या मूर्तीतून अनेक पटींनी गणेशतत्त्व प्रक्षेपित होत असल्याने गणेशभक्ताला अधिक लाभ होतो. या संदर्भात इतरांचे प्रबोधन करून गणेशभक्त सात्त्विक श्री गणेशमूर्तीचा प्रसार करू शकतात.
‘गणेशोत्सवातील अपप्रकार दूर करून आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आदर्श मिरवणूक कशी काढावी ? मूर्तीदान का करू नये ? कृत्रिम तलावाऐवजी वहात्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन का करावे ?’, या संदर्भात समितीचे कार्यकर्ते सर्वत्र प्रबोधनात्मक मोहीम राबवत आहेत. या अंतर्गत विविध गणेशोत्सव मंडळांना संपर्क करणे; राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या संदर्भातील प्रवचनाचे नियोजन करणे; ‘गणेशोत्सव वास्तव अन् आदर्श’ ही ध्वनीचित्र-चकती दाखवणे; अन्य वृत्तपत्रांत गणपतीविषयीची लेखमाला प्रसिद्धीसाठी देणे; क्रांतीकारकांचे कार्य आणि धर्मशिक्षण यांविषयीचे ‘फ्लेक्स’ प्रदर्शन आयोजित करणे, असे धर्मरक्षणाचे प्रयत्न केले जात आहेत.