‘आयटीआय’मधील विद्यार्थिनींना आत्मरक्षण प्रशिक्षण देणार !

कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबई – ‘हर घर दुर्गा’ या अभियानाच्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमधील विद्यार्थिनींना आत्मरक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. शारीरिक प्रशिक्षणाच्या तासिकेप्रमाणे विद्यार्थिनींसाठी आत्मरक्षण प्रशिक्षणाची राखीव तासिका चालू करण्यात येणार आहे. पुढील वर्षभर अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थिनींना देण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. आत्मरक्षण प्रशिक्षणाच्या अंतर्गत कराटे, जुडो आदींच्या माध्यमातून स्वरक्षणाच्या पायभूत प्रशिक्षणासाठी आठवड्यातून न्यूनतम २ तासिका घेण्यात येतील. संकटकाळात युवती स्वत:च्या रक्षणासाठी सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना नियमित सरावासाठी उद्युक्त करण्यात येईल.

राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श घेऊन स्वरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्राची भूमी राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. यांच्यासारख्या असंख्य महिलांनी प्रसंगी दुर्गामातेप्रमाणे शक्तीची उपासना करून राष्ट्रासाठी योगदान दिले आहे. त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील युवतींनी स्वरक्षणासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन या वेळी मंगलप्रभात लोढा यांनी केले.