छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे राजकारण्यांनी स्वार्थासाठी भांडवल करू नये ! – शिवभक्त स्वप्नील घोलप
नवी मुंबई – छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने वाशी येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या घटनेचे राजकारण्यांनी स्वार्थासाठी भांडवल करू नये, असे प्रतिपादन सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि शिवभक्त स्वप्नील घोलप यांनी या वेळी केले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला.
शिवभक्त स्वप्नील घोलप पुढे म्हणाले की,…
१. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही घटना दुर्दैवी आहे; परंतु हा अपमान सहन करण्याची इच्छा नसतांनाही सर्व शिवभक्त आणि मराठा समाज शांत होता; परंतु राजकीय भ्रष्टाचारी सत्ताधारी आणि विरोधी नेते यांनी या घटनेचे स्वार्थासाठी राजकारण चालवले आहे.
२. याच्या निषेधार्थ सर्व शिवभक्त आणि सकल मराठा समाज नवी मुंबई यांनी निष्क्रीय आणि भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या विरोधात निषेध आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत महाराजांचा यथोचित सन्मान होऊन त्या ठिकाणी पूर्णाकृती मूर्ती उभारली जात नाही, तोपर्यंत ही अशी आंदोलने महाराष्ट्रभर सर्व शिवभक्त आणि सकल मराठा समाज करत राहील.
शिवभक्त सागर पावगे यांनी ‘घटनेची उच्चस्तरीय चौकशी होऊन लवकरात लवकर दोषी लोकांवर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली, तसेच शिवरायांचा पुतळा शास्त्रोक्त पद्धतीने आणि उत्तमरित्या बसवण्यात यावा’, असे सांगितले.
या वेळी प्रशांत मिसाळ, अपूर्वा भोसले, प्रज्योत मुळे, सुधीर फापाळे, केशर गाडगे, विजया कद, सुनील धनवडे, उमेश जुनघरे यांनीही तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. हे निषेध आंदोलन यशस्वी करण्यासाठी स्वप्नील घोलप, स्वप्नील धनावडे, सागर पावगे, अशोक काटे, गणेश माने, दत्ता फडतरे, अर्चना झेंडे इत्यादींनी परिश्रम घेतले.