आत्महत्येचा प्रयत्न आता गुन्हा नाही !
‘१ जुलै २०२४ पासून चालू झालेल्या देशपातळीवरील ३ फौजदारी कायद्यांमध्ये जुन्या ‘भारतीय दंड विधाना’च्या (‘इंडियन पिनल कोड’च्या) जागी ‘भारतीय न्याय संहिता’ आलेले आहे. भारतीय दंड विधान, म्हणजे गुन्हे आणि त्याची शिक्षा यांचे ‘विवरणपत्र’ आहे. कोणत्या शिक्षा आहेत ?, कोणकोणत्या कृत्याला गुन्हा असे म्हणतात ?, जामीन म्हणजे काय ? तो कोणकोणत्या गुन्ह्यांना दिला जातो ? त्यामागे काय उद्दिष्टे असतात ? दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय ? आणि कोणकोणत्या गुन्ह्यांना दखलपात्र म्हणता येईल ? या सर्वांचा ऊहापोह ‘भारतीय न्याय संहिता २०२३’मध्ये केलेला आहे. भारतीय दंड विधानाचा प्रवास ‘भारतीय न्याय संहिता’ येथे येऊन संपला.
१. भारतीय न्याय संहितेममध्ये करण्यात आलेले पालट
भारतीय न्याय संहिता ही भारतीय दंड विधानाची सुधारित आवृत्ती आहे. यात अनेक सुधारणा केलेल्या आहेत. यामध्ये काही कालबाह्य गुन्हे रहित करण्यात आलेले आहेत. काहींमध्ये सुधारणा केलेली आहे, तर काही नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ‘सेडिशन’ म्हणजे ‘राजद्रोह’. हा गुन्हा भारतीय न्याय संहितेमधून काढलेला आहे. त्याऐवजी ‘राष्ट्रद्रोह’ हा गुन्हा समाविष्ट केलेला आहे. यामध्ये राष्ट्रविरोधी कारवाया समाविष्ट होतील. आतंकवादी कारवाया, आक्रमणे, आतंकवादाला साहाय्य, कटकारस्थान आणि अशी कोणतीही कृती जे देशाच्या सार्वभौमत्वाच्या आड येते. याला ‘आतंकवादी गुन्हे’, असे संबोधले आहे. त्यामुळे हा आता गुन्हा ठरवण्यात आलेला आहे आणि नवीन कायद्यामध्ये याची फिर्याद कोणताही पोलीस उपनिरीक्षकही घेऊ शकतो. ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) कायदा ही आहेच. त्यामुळे यातही सुधारणा केलेली आहे.
२. आत्महत्येच्या प्रयत्नाला गुन्हा मानणे आणि तो गुन्हा न म्हणण्यामागील कारणमीमांसा
दुसरा गुन्हा जो खरेतर तांत्रिकदृष्ट्या कधीच गुन्हा नव्हता तो, म्हणजे ‘आत्महत्येचा प्रयत्न’ ! हा आता गुन्हा नसून भारतीय कायद्याप्रमाणे याचीही वर्गवारी केलेली आहे. कोणतीही व्यक्ती जेव्हा परिस्थितीशी शरण जाऊन ‘मृत्यू’ जवळ करण्याचा प्रयत्न करते आणि तोही आत्महत्येच्या माध्यमातून तेव्हा हा प्रकार पुष्कळच गंभीर आहे, तर त्याला कायद्याच्या चष्म्यातून न पहाता माणुसकीच्या माध्यमातून बघणे आवश्यक आहे. भारतीय दंड विधानातील कलम ३०९ हे ‘आत्महत्येच्या प्रयत्नाला गुन्हा असे म्हणावे’, असे सांगते; परंतु यात थोडेसे वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
एखाद्याने स्वतःचे आयुष्य वैयक्तिक कारण, वैफल्यग्रस्तता, नैराश्य, भीती यांमुळे संपवण्याचा निर्णय घेतला आणि प्रयत्न केला, तर तो गुन्हा ठरू शकत नाही. आत्महत्येचा प्रयत्न आणि प्रत्यक्ष आत्महत्या वेगवेगळी आहे. नवीन कायद्याप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने सरकारी कार्यालयामध्ये जाऊन सरकारी अधिकार्यावर दबाव आणण्यासाठी जर आत्महत्येचा प्रयत्न केला, तर तो गुन्हा समजण्यात येईल. केवळ दबावतंत्र म्हणून जर या गोष्टीचा वापर केला, तर तो गुन्हा आहे. समजा एखाद्या व्यक्तीने असा प्रयत्न केला, तर यावर अन्वेषण होते. एखाद्याच्या आत्महत्येच्या कारणासाठी जर त्याने असे लिहून ठेवले की, ‘अमूक अमूक व्यक्तीमुळे त्याच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला’, तर त्यावर कारवाई होते; परंतु ती एक कायदेशीर प्रक्रिया आहे. यात नक्की अडकण्याचा भाग होऊ शकतो. याला ‘अटेंम्पट टू सुसाईड’ (आत्महत्येचा प्रयत्न) या कलमाखाली कारवाई होऊ शकते. उदाहरणार्थ एका सूनेने सासू -सासरे यांच्या छळवणुकीमुळे जर असा प्रयत्न केला आणि तिने असे लिहून ठेवले की, ‘जर माझ्या जीवाला काही बरे-वाईट झाले, तर संबंधितांना अटक करा’ आणि असे झाले, तर त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. तेव्हा सर्वांनी सावध रहाणे आवश्यक आहे.
स्वतःच्या जीवाचे बरे वाईट हा काही ‘ब्लॅकमेलींग’चा प्रकार होऊ नये, यासाठी ही कायदेमंडळाने दक्षता घेतली आहे. नाही तर कुणीही कोणत्याही सूडापोटी कुणालाही अडकवू शकतो. कधी कधी एखादा आत्महत्येचा प्रयत्न ही खरे तर हत्याही असू शकते. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर ती व्यक्ती जर ‘अनकॉन्शस’ (बेशुद्ध) झाली, तर मग खरे खोटे करणे पुष्कळ अवघड जाते; कारण सत्य काय आहे, हे ती व्यक्तीच सांगू शकते.
३. भारतीय न्याय संहितेत सुचवण्यात आलेला उपाय
तूर्तास असे समजू की, नैसर्गिकरित्या कुणी प्रयत्न केला आणि ती व्यक्ती वाचली अन् तिने नंतर सांगितले की, याला कुणीही उत्तरदायी नाही, तर मग हा गुन्हा होत नाही. या प्रकाराला गुन्हेगारीच्या दृष्टीकोनातून पुष्कळ कंगोरे आहेत. नाही तर जी व्यक्ती स्वतःचे जीवन संपवणार होती आणि ती आधीच त्रासात आहे अन् त्यातच तिला आणखी शिक्षा देऊन तिच्या जीवाला आणखी त्रास देणे, हे माणुसकीला धरून नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचे योग्य ते समुपदेशक, तसेच मानसिक उपचार हा उपाय सांगण्यात आलेला आहे.’
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.