बाहेरचे खाणे !
एका आधुनिक वैद्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले, ‘‘समाजातील पुष्कळ लोक आमचा व्यवसाय आणि उत्पन्न वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावत आहेत, तसेच अनेक ‘फूड चॅनेल’ने (आहारसंबंधित वाहिन्या) आमचा धंदा वाढवण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. ‘फूड चॅनेल’मधील अर्ध्याहून अधिक ‘रिल्स’मध्ये वेगवेगळ्या पदार्थांच्या ज्या पाककृती दाखवल्या जातात, त्यांमध्ये वापरायचे पदार्थ मात्र माणसाच्या शरिराला हानीकारक असेच असतात; ज्यामध्ये मैदा, पामतेल, चीज, हरभरा-बेसन पीठ यांसारखे शरिराला घातक असलेले किंवा आंबवलेले पदार्थ वापरले जातात. सध्या तर प्रत्येक शहर आणि गावातही ‘खाऊगल्ली’ (खाद्यपदार्थांची दुकाने असलेली गल्ली) निर्माण झाली आहे. लोक तिथे झुंबड करतात. अनेकदा हे पदार्थ घातक असतात. मोठ्या संख्येने काही वेळा विषारी पदार्थही रस्त्यावर उभे राहून आवडीने खात असलेले पाहून आम्हाला त्यांची कीव येते. हे लोक घाणेरड्या तेलात तळलेले पदार्थ खाऊन आजारी पडतात आणि त्या पदार्थांच्या सहस्रो पट अधिक पैसे देऊन वेगवेगळ्या आधुनिक वैद्यांकडून चाचण्या करून अनेक प्रकारचे औषधोपचार करून घेतात. एकदा अधू झालेले शरीर पूर्ण तंदुरुस्त होईल, याची खात्री त्यांना आणि आम्हालाही नसते. अशा लोकांच्या पैशांतून आम्ही नवनवीन गाड्या घेतो, मोठमोठे बंगले बांधतो. त्यातून सुख आणि आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो; पण नैतिक मनाला हे सुख आत कुठेतरी बोचत असते. या लोकांना कसे समजवायचे ? आणि समजावले, तरी ते ऐकतील का ? हा प्रश्न मला भेडसावत असतो.’’
सध्याच्या काळात विभक्त कुटुंबपद्धत असते. पति-पत्नी नोकरी करतात. प्रतिदिनच्या धावपळीत पोळी, भाजी, भात आणि आमटीचा स्वयंपाक करायला वेळ कुठे उरतो ? महिलाही दमून जातात. मग पर्यायी नियोजन केले जाते. न्याहारी चहा-पाव खाऊन भागवली जाते. मुलांच्या डब्यात ब्रेडला चीज, जाम लावून दिले जाते. कार्यालयाला जातांना किंवा घरी येतांना रस्त्यात कुठल्या तरी हातगाडीवर वडा-पाव किंवा इतर कुठला तरी घातक पदार्थ भूक भागवण्यासाठी घाईघाईने पोटात ढकलला जातो. दुपारच्या जेवणात काही वेळा उपाहारगृहामधूनच पदार्थ मागवले जातात. संध्याकाळी घरी यायला विलंब होणे, ताण, धावपळ, थकलेले शरीर आदींमुळे कित्येकदा बाहेरून काहीतरी मागवून भूक भागवली जाते. त्या असात्त्विक अन्नामध्ये शरिराला पोषक द्रव्यांचा अभाव आणि हानीकारक द्रव्ये अधिक असतात. वरचेवर बाहेरचे अन्न ग्रहण केल्यामुळे पोट बिघडते. वेगवेगळे आजार होतात. त्यावर उपाय करण्यासाठी पुन्हा वेगळा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे प्रेमाचा ओलावा असणारे, घरी बनवलेले सात्त्विक अन्नच वेळ, पैसा, आरोग्य, शरीर सार्यांनाच वाचवेल, हे लक्षात घ्या !
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.