दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सानपाडा आणि तुर्भे येथे अनधिकृत पान टपर्यांवर कारवाई !; तुर्भे वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !…
सानपाडा आणि तुर्भे येथे अनधिकृत पान टपर्यांवर कारवाई !
नवी मुंबई – सानपाडा आणि तुर्भे येथील अनधिकृत पान टपर्यांवर कारवाईची मोहीम राबवण्यास प्रारंभ झाला आहे. अद्यापपर्यंत सातहून अधिक टपर्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सानपाडा, तुर्भे, एपीएमसी, तुर्भे एम्.आय.डी.सी. येथे १०० हून अधिक अनधिकृत पानटपर्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापुढेही मोहीम अधिक प्रभावीपणे चालू रहाणार असल्याचे समजते.
तुर्भे वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !
नवी मुंबई – विद्यार्थ्यांनी आत्मअनुशासन, सेवा या गुणांचा स्वतःत विकास करून वाहतूक नियमांचे पालन करत इतरांना त्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी येथे केले. ते गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालय येथे ‘आर्.एस्.पी.’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. (विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचा प्रचार आणि प्रसार करून रस्ते अपघाताचे प्रमाण न्यून करण्यासाठी ‘आर्.एस्.पी.’ हा विषय घेण्यात येतो.)
नवी मुंबई ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ हे घोषवाक्य घेऊन वाटचाल केल्यास रस्ते अपघातामध्ये होणारे प्राणांकित अपघात अल्प करता येतील, असा विश्वास धरणे यांनी व्यक्त केला.
रिक्शाचालकाकडून शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग !
मुंबई – बोरिवलीमध्य १५ वर्षीय मुलीला एका रिक्शाचालकाने अयोग्य स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मुलगी शाळेत जातांना हा प्रकार घडला. मुलीने आरडाओरडा केल्यावर लोक तेथे जमले; पण तोपर्यंत रिक्शाचालक पळून गेला होता. या प्रकरणी अज्ञाताविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका : वाढती वासनांधता धोकादायक !
शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग !
गोंदिया – येथील एका गावात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी आरोपी उमेश मेश्राम (वय ५० वर्षे) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिक्षकाने तिच्या घरी येऊन तिच्यासमवेत अश्लील कृत्य केले आणि तिला अश्लील संदेश पाठवला. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी ठोठावली असून भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
बारामती (पुणे) येथे ११ ‘डीजे’ मालक आणि चालक यांवर गुन्हे नोंद !
बारामती (जिल्हा पुणे) – ‘डीजे’ला (अत्याधुनिक ध्वनीक्षेपण यंत्रणा) बंदी असतांनाही दहीहंडीदिनी ‘डीजे’लावून आवाजाची मर्यादा ओलांडल्याने ११ ‘डीजे’ चालक आणि मालक यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई राहुल वाघ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘डीजे’चा आवाज अल्प करण्यासाठी पोलिसांनी तोंडी सूचना देऊनही आवाज अल्प केला नाही. आवाजाची पातळी ओलांडली म्हणून गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.