‘चर्चा हिन्दु राष्ट्र की।’, या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाच्या जोडणीची सेवा करतांना आलेल्या अडचणी आणि त्या प्रसंगी अनुभवलेली गुरुकृपा !
१.‘चर्चा हिन्दु राष्ट्र की।’ या थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमाच्या दिवशी ‘वाय-फाय’ (Wi-Fi) यंत्रणा अचानक बंद होणे
‘८.७.२०२३ या दिवशी ‘चर्चा हिन्दु राष्ट्र की।’, हा कार्यक्रम देहली येथून ‘ऑनलाईन’ घेण्याचे नियोजन करण्यात आले होते मात्र तिथे भ्रमणभाषला व्यवस्थित ‘रेंज’ (Range) मिळत नव्हती. त्यामुळे मी ‘वाय-फाय’ (टीप) यंत्रणा वापरून सेवा करण्याचे ठरवले. कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची (Live) वेळ रात्री ८ वाजता होती; पण त्या दिवशी ‘वाय-फाय’ (Wi-Fi) यंत्रणा दुपारनंतर अचानक बंद झाली. सर्व प्रकारची उपाययोजना करूनही ‘वाय-फाय’ यंत्रणा चालू होत नव्हती. ही अडचण दूर होण्यासाठी ‘काही आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावे लागतील का ?’ यासाठी मी रामनाथी, गोवा येथील आश्रमात संपर्क केला. काही वेळाने रामनाथी आश्रमातून ‘अडचण सुटेल’, असा निरोप आला.
टीप – ‘वाय-फाय’ – ही एक प्रकारची तांत्रिक सुविधा आहे. यामध्ये आंतरजालाचा (‘इंटरनेट’चा) वापर करून दूरस्थ संगणकांशी संवाद साधता येतो. ही सुविधा बिनतारी संदेशवहन लहरींचा (‘रेडिओ लहरीं’चा) वापर करून काम करते.
२. देवाला शरण जाऊन आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आणि त्यानंतर एका साधिकेच्या भ्रमणभाषवरून जोडणी केल्यानंतर थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम व्यवस्थित पूर्ण होणे
थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम प्रारंभ होण्यास केवळ १० मिनिटे असतांनाही ‘वाय-फाय’ यंत्रणा चालू होत नव्हती. त्या वेळी मी देवाला शरण जाऊन प्रार्थना केली आणि खोलीत सनातन-निर्मित सात्त्विक उदबत्ती लावून प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावली. त्या वेळी देवाने सुचवले, ‘एका साधिकेच्या भ्रमणभाषवरून जोडणी करून पाहूया.’ त्याप्रमाणे मी त्या साधिकेच्या भ्रमणभाषवरून जोडणी करताच आंतरजाल जोडणी (‘इंटरनेट’) एकदम गतीने चालू झाली. त्यानंतर कोणतीही अडचण न येता थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम व्यवस्थित पूर्ण झाला आणि कार्यक्रम संपताक्षणी भ्रमणभाषचे आंतरजाल (‘इंटरनेट’) बंद झाले. त्यानंतर मला समजले की, ज्या साधिकेच्या भ्रमणभाषवरून मी थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमासाठीची जोडणी केली होती, तिला तिची सेवा करण्यासाठी दुपारपासून आंतरजाल (‘इंटरनेट’) मिळत नव्हते.
३. या प्रसंगातून देवाने ‘सेवेचे कर्तृत्व घेणे’, या अहंच्या पैलूची जाणीव करून देणे
सेवा करत असतांना बर्याचदा माझ्या मनात कर्तेपणाचे विचार असतात. या प्रसंगातून देवाने ‘सेवेचे कर्तृत्व घेणे’, या अहंच्या पैलूची मला जाणीव करून दिली. देवाने माझ्या लक्षात आणून दिले की, ‘मी काहीच करू शकत नाही. माझ्याकडून थोडीफार सेवा होत आहे, ती गुरुदेवांच्या कृपेने होत आहे.’ परात्पर गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) माझी चुकीची मानसिकता लक्षात आणून दिल्याबद्दल परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. नरेंद्र सुर्वे, देहली (२४.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |