‘ऑनलाईन साधना सत्संगा’त सहभागी होणार्‍या पुणे आणि सातारा या जिल्ह्यांतील जिज्ञासूंना स्वतःत जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती !

कोरोना महामारीच्या कालावधीत सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन साधना सत्संग’ चालू करण्यात आला होता. अजूनही त्या सत्संगाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सत्संगामुळे जिज्ञासूंच्या साधनेला आरंभ झाला. जिज्ञासू स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबवत आहेत, तसेच ते सेवेतही सहभागी होत आहेत. या सत्संगात सहभागी होणार्‍या पुणे आणि सातारा या जिल्ह्यांतील काही जिज्ञासूंना स्वतःत जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. श्रीमती सीमा परांजपे (वय ६५ वर्षे), कोथरुड, पुणे.

१ अ. साधनेचे प्रयत्न केल्याने समाधान वाटणे : ‘मी १ ते दीड वर्षापासून साधना सत्संगात सहभागी होत आहे. सत्संगातून मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व कळले. आता मला स्वयंसूचना देता येतात. सेवा करतांना, तसेच अन्य वेळीही माझी भावजागृती होते. मला ‘सतत नामजप करावा’, असे वाटते. एकंदरीत साधनेचे हे प्रयत्न केल्याने मला समाधान वाटते.’

२. सौ. तृप्ती प्रमोद उणेचा, सातारा रस्ता, पुणे.

२ अ. मनाचा आढावा घेतल्याने शांत वाटणे : ‘आरंभी मी प्रत्येकाच्या कामात लक्ष घालायचे. प्रत्येकाला विनाकारण सांगत रहायचे. ‘मी म्हणेल, तसेच घडले पाहिजे’, असा माझा अट्टाहास असायचा. मी माझ्या मनाचा आढावा घ्यायला आरंभ केल्यापासून मला शांत वाटत आहे.

२ आ. माझ्यातील ‘इतरांचा द्वेष करणे’, हा स्वभावदोष न्यून झाला आहे.

२ इ. मी सतत नामजप करण्याचा प्रयत्न करत आहे.

‘गुरुदेवांच्या सामर्थ्याची ऊर्जा सत्संगरूपाने कायम मिळावी’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !’

३. सौ. मेघा घन, सातारा रस्ता, पुणे.

३ अ. सत्संगामुळे दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्याचे प्रमाण उणावणे : ‘मी सत्संगात येण्यापूर्वी दूरचित्रवाणीवर ४ – ५ घंटे कार्यक्रम बघायचे. त्यामुळे माझे डोके सुन्न व्हायचे. सत्संगामुळे माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन हळूहळू माझे दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्याचे प्रमाण न्यून झाले.

३ आ. आम्ही साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू केल्यावर आमच्या घरात चैतन्य जाणवू लागले.

३ इ. मी साधनेला आरंभ केल्यावर सेवाही करू लागले. माझे पती अधूनमधून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतात.

३ ई. धर्माचरण करणे : ‘ईश्वराचे चैतन्य मिळावे’, यासाठी मी ‘केसांचा अंबाडा घालणे, कुंकू लावणे, साडी नेसणे’, अशा सात्त्विक कृती करायला आरंभ केला आहे.

३ उ. अनुभूती

१. आम्हाला पुष्कळ दिवसांपासून त्रिपिंडी श्राद्ध करायचे होते; मात्र त्यामध्ये अडचणी येत होत्या. मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप केल्यानंतर आम्हाला त्रिपिंडी श्राद्ध करता आले.

२. मी कागदावर प्रार्थना लिहून तो कागद भिंतीवर लावला आहे. त्यामुळे प्रार्थनेमध्ये वाढ होऊन माझ्या आकलनक्षमतेतही वाढ झाली.’

४. सौ. स्वाती सोमनाथ शिंदे, शिरवळ, जिल्हा सातारा.

अ. ‘सत्संगात सांगितलेले प्रयत्न केल्याने कुटुंबियांना माझ्या स्वभावात पालट जाणवला. ते मला ‘तू इतकी शांत कशी असतेस ?’, असे विचारतात.

आ. ‘साधनेच्या प्रयत्नांत जे समाधान आहे, ते अन्य कशात नाही’, याचा अनुभव मी प्रतिदिन घेत आहे.

‘हे सर्वकाही भगवान श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्यामुळे शक्य झाले आहे’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

(सर्व लिखाणाचा दिनांक : २२.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक