गुरुकृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ करत असलेल्या सेवांची व्याप्ती
२५ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘विविधांगी सेवा मिळण्याची मुख्य कारणे माझ्यातील ‘जिज्ञासा’ हा गुण आणि प्रामुख्याने ‘गुरुकृपा’ ही आहेत’, असे वाटणे, आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय सांगणे अन् दुसर्यांसाठी नामजपादी उपाय करणे’, यांविषयीचे लिखाण वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
या लेखाचा भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/827946.html
कल्पनातीत आणि अप्रतिम लेख लिहिणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा हा लेख वाचून मला थक्क व्हायला झाले ! यात दिलेले ज्ञान जगात कुणालाच नसेल ! भारतीय संगीतातील मोठमोठ्या संगीततज्ञांनाही हा लेख वाचून आश्चर्यच वाटेल ! ‘सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी हे ज्ञान जगभरातील जिज्ञासू साधकांना शिकवून त्यांच्यासारखे अनेक उपाय करणारे तयार करावेत. त्यामुळे जगभरच्या संगीताने बर्या होणार्या साधकांना उपाय उपलब्ध होतील’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले
४. समष्टी सेवा करत असलेल्या साधकांना आध्यात्मिक त्रासामुळे आलेल्या अडचणी सोडवणे
अध्यात्मप्रसार करणारे साधक वर्षभर विविध समष्टी सेवा करत असतात, उदा. शिबिर आयोजित करणे, सत्संग घेणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेणे, आंदोलन करणे, धर्मजागृतीपर फेरी काढणे, हिंदु राष्ट्र अधिवेशन घेणे इत्यादी. या समष्टी सेवांमुळे समाज मायेकडून अध्यात्माकडे वळतो. त्यामुळे समाजाची सात्त्विकता वाढते. समाज अधिकाधिक सात्त्विक झाला, तर रामराज्यासम असलेले हिंदु राष्ट्र लवकर स्थापन होणार आहे. हे या कलियुगात प्रबळ असणार्या वाईट शक्तींना नको असते. त्यामुळे त्या या समष्टी सेवांमध्ये अडथळे आणतात. सध्या तर वाईट शक्ती समष्टी सेवेच्या प्रत्येक टप्प्यावर अडथळे आणत आहेत.
अ. एखादे शिबिर आयोजित करायचे असल्यास त्या शिबिराची रूपरेषा आखणे, मार्गदर्शन करणारे वक्ते ठरवणे, शिबिरासाठी जिज्ञासूंची नावनोंदणी करणे, जिज्ञासूंनी शिबिरासाठी येणे, प्रत्यक्ष शिबिर भरवणे इत्यादी टप्पे असतात. मी अशा समष्टी सेवेसाठी येणार असलेल्या संभाव्य अडचणी जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी नामजप शोधतो आणि तो आधीच करायला देतो.
आ. सेवेमध्ये प्रत्यक्ष आलेली एखादी अडचण कुणी सांगितल्यास मी ‘वाईट शक्ती कशा प्रकारे आक्रमण करत आहेत ?’, हे जाणून त्यावर योग्य त्या नामजपाद्वारे उपाय करतो. मी उपाय केल्यावर ती अडचण दूर झाल्याची अनुभूती साधकांना येते, उदा. कार्यक्रमामध्ये ध्वनीवर्धक यंत्रणा (माईक सिस्टीम) सर्वकाही योग्य असूनही चालत नसल्यास मी ‘वाईट शक्ती त्या यंत्रणेवर कशा प्रकारे आणि कोणत्या दिशेने आक्रमण करत आहेत’, हे सूक्ष्मातून जाणून त्यासाठी नामजपादी उपाय करतो. त्यामुळे ती अडचण दूर होते.
इ. कधी कधी एखाद्या यंत्रणेमध्ये आलेला एखादा बिघाड वाईट शक्तींनी निर्माण केलेल्या त्रासदायक (काळ्या) आवरणामुळे साधकांच्या लक्षात येत नाही. मी ते आवरण मुद्रा आणि नामजपादी उपायांनी दूर करतो अन् मग सूक्ष्मातून जाणून अमूक ठिकाणी बिघाड असल्याचे लक्षात आणून देतो.
ई. शिबिरात मार्गदर्शन करणार असलेल्या एखाद्या वक्त्याला सर्दी, ताप, खोकला, गरगरणे, मळमळणे इत्यादींपैकी उद्भवलेला विकार दूर होण्यासाठी मी नामजप सांगतो.
उ. काही वेळा कार्यक्रम चालू असलेल्या सभागृहात त्रासदायक शक्ती दाब निर्माण करतात. त्यामुळे अस्वस्थता जाणवते, तसेच चालू असलेल्या मार्गदर्शनाचे उपस्थितांना आकलन होत नाही. तेव्हा तो दाब नामजपादी उपाय करून दूर करावा लागतो.
ऊ. सभा, आंदोलन, धर्मप्रसार फेरी यांसारखा एखादा उघड्यावरील कार्यक्रम असल्यास काही वेळा कार्यक्रमापूर्वी ढगाळ वातावरण निर्माण होणे, जोरात वारा वहाणे, अशी पाऊस येण्याची लक्षणे दिसू लागतात. यावर नामजपाचा उपाय केल्यावर ती लक्षणे दूर होतात. यावरून ‘ती लक्षणे कार्यक्रमात अडथळा आणण्यासाठी वाईट शक्तींनी निर्माण केलेली होती’, असे लक्षात येते.
कार्यक्रमात आलेल्या अशा प्रकारच्या अडचणींवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने, तसेच त्या कार्यक्रमातून साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगल्या प्रकारे होण्यासाठीही नामजपादी उपाय केल्याने लाभ होतो.
४. दुसर्या देशांत किंवा प्रदेशांत जाऊन अध्यात्मप्रसार करणार्या प्रसारसेवकांच्या अडचणी सोडवणे
दुसर्या देशात जाण्यासाठी ‘व्हिसा’ लवकर मिळत नाही. दुसर्या देशात गेल्यावर विमानतळावर ‘एमिग्रेशन’ होण्यामध्ये अडचणी येतात. दुसर्या देशामध्ये सत्संग घेण्यासाठी योग्य असे स्थळ उपलब्ध होत नाही. प्रसारसेवक अचानक आजारी पडतात. अशा प्रकारच्या अडचणी प्रसारसेवकांना येतात. या अडचणी तात्काळ दूर करणे आवश्यक असते. त्यामुळे मला स्वतःला त्यांवर नामजप करून आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावे लागतात.
दुसर्या प्रदेशांत जाऊन अध्यात्मप्रसाराची सेवा करणारे प्रसारसेवक मला त्यांच्या या सेवेला आरंभ होण्यापूर्वीच आध्यात्मिक स्तरावरील उपाय विचारतात. त्यांच्या या सेवेत कुठल्याही अडचणी येऊ नयेत आणि त्यांची ही सेवा गुरुदेवांना अपेक्षित अशी परिपूर्ण व्हावी, यासाठी मी त्यांना नामजप सांगतो.
५. ‘इंटरनेट’द्वारे अध्यात्मप्रसार करण्यात येणार्या अडचणी सोडवणे
आजकाल प्रत्यक्ष अध्यात्मप्रसार करण्याच्या तुलनेत ‘इंटरनेट’द्वारे केलेला अध्यात्मप्रसार जगभर जलद गतीने होतो, तसेच तो एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोचतो. त्यामुळे ‘इंटरनेट’वर संस्थेची माहिती, तिचे वेगवेगळे उपक्रम आणि अध्यात्मातील तात्त्विक अन् प्रायोगिक माहिती सांगणारी ‘वेबसाईट’ असते. या ‘वेबसाईट’द्वारे अध्यात्मप्रसार करण्यामध्ये वाईट शक्ती अडथळे निर्माण करतात. ‘वेबसाईट’वरील माहितीचा एखादा भाग दिसेनासा होणे, लोकांना ‘वेबसाईट’ उघडण्यामध्ये अडचण येणे, ‘इंटरनेट’साठीचा ‘सर्व्हर’ बंद पडणे अशा त्या अडचणी असतात. त्यांवर नामजपाचा उपाय सांगावा लागतो. तसेच काही वेळा ‘फेसबुक’, ‘एक्स’ (पूर्वीचे ‘ट्विटर) अशा सामाजिक माध्यमांद्वारे अध्यात्मप्रसार करू शकत नाहीत. याही अडचणी नामजपादी उपाय करून सोडवाव्या लागतात.
६. ठिकठिकाणी चाललेल्या आश्रमांच्या बांधकामात आध्यात्मिक स्तरावरील उपायांद्वारे साहाय्य करणे
अ. आश्रमासाठी भूमी विकत घेण्यामध्ये येणारे अडथळे दूर करणे
आ. आश्रमासाठीचा आराखडा प्रशासनाकडून मान्य करून घेण्यामधील विलंब दूर करणे
इ. आश्रमाच्या बांधकामांमध्ये येणारे सूक्ष्मातील अडथळे दूर करणे
ई. बांधकाम झाल्यावर ते नियमांप्रमाणे योग्य असल्याचे, तसेच तेथे रहाता येण्यासाठीचे प्रमाणपत्र प्रशासनाकडून लवकर मिळण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे
७. आश्रमाच्या भूमीमध्ये विहीर किंवा कूपनलिका खणण्यासाठी योग्य ती जागा शोधणे
आश्रमाच्या भूमीमध्ये पाणी असलेली जागा शोधण्याची सेवा मला मिळाली. भूमीमध्ये ईशान्य दिशेला (उत्तर आणि पूर्व या दिशांच्या मधल्या जागेमध्ये) पाणी मिळाल्यास ते अधिक चांगले असते. भूमीतील पाणी शोधण्यासाठी मला त्या जागेचा नकाशा देण्यात येतो. प्रथमच जेव्हा मला ही सेवा मिळाली, तेव्हा मी त्या नकाशावरून माझे बोट फिरवून भूमीमधील पाण्याची स्पंदने बघत होतो. अचानक मला एके ठिकाणी बोट नेल्यावर तोंडात लाळ सुटली. तेव्हा ‘त्या ठिकाणी भूमीत पाणी आहे’, असे माझ्या लक्षात आले. मी त्या जागेपासून दुसरीकडे बोट नेल्यावर मला तोंडात लाळ सुटणे बंद झाले आणि पुन्हा त्या ठिकाणी बोट नेल्यावर माझ्या तोंडात लाळ सुटू लागली. मी हा प्रयोग ३ – ४ वेळा केला आणि ‘मला जाणवलेले योग्य आहे ना ?’, हे पडताळले. त्यानंतर भूमीमध्ये पाणी जाणवलेल्या भागात किती परिसरात पाणी आहे आणि त्याचा केंद्रबिंदू कुठे आहे ?’, हेही मी शोधले अन् त्याप्रमाणे नकाशावर ‘पेन्सिल’ने खूण केली. तसेच देवाला विचारून ‘किती ‘मीटर’ खोल गेल्यावर पाणी लागेल ?’, हेही तेथे नमूद केले. ‘आश्रमाच्या जागेमध्ये आणखी कुठे कुठे पाणी आहे ?’, हेही मी शोधले. ‘मी शोधलेल्या ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी विहीर किंवा कूपनलिका खोदायची ?’, हे नंतर ठरवले जाते.
मी शोधलेल्या ठिकाणी आतापर्यंत पाणी लागले आहे आणि ती माझ्यावरील गुरुकृपाच आहे.
८. आश्रमात किंवा घरात साधकाची हरवलेली वस्तू कुठे असेल, हे सांगण्याचा प्रयत्न करणे
काही वेळा साधकांना ‘त्यांची महत्त्वाची वस्तू कुठे ठेवली आहे ?’, हे आठवत नाही. ते आश्रमात (किंवा घरात) सगळीकडे शोधतात; पण त्यांना ती महत्त्वाची वस्तू सापडत नाही. ते मला याविषयी सांगून ‘साधारण कोणत्या खोलीत ती वस्तू ठेवली होती’, हे सांगतात. मी त्याविषयी सूक्ष्मातून जाणून घेतो आणि त्यांना वस्तू शोधायचे स्थान सांगतो, उदा. ‘त्या खोलीच्या दारातून आत प्रवेश केल्यावर समोरच्या बाजूला एखादे कपाट असल्यास त्याच्या वरच्या खणात ती वस्तू शोधा’, असे सांगतो. बहुतेक वेळा माझे उत्तर योग्य आलेले असते.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.४.२०२४)
|
या लेखाचा भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/832315.html