पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरांतील २६ व्यावसायिक मालमत्ता सील !
अग्नीप्रतिबंधात्मक यंत्रणा न बसवल्याने कारवाई !
पिंपरी (पुणे) – शहरांतील औद्योगिक आणि व्यावसायिक मालमत्तांना आग लागल्याने जीवित आणि वित्तहानीच्या घटना घडल्या. त्याठिकाणी अग्नीप्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्यामुळे या घटना घडल्या. अशा आस्थापनांना २ वेळा नोटीस देऊनही अग्नीप्रतिबंधक यंत्रणा नसल्याने वीज, पाणीपुरवठा बंद करून चिखली, कुदळवाडी, तळवडे भागांतील २६ व्यावसायिक मालमत्ता लाखबंद (सील) करण्यात आल्या आहेत. यापुढेही अशी कारवाई चालूच राहील, असे महापालिका प्रशासनाने कळवले आहे. (अग्नीशमन यंत्रणा नसतांना या इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र कसे दिले ? – संपादक) भविष्यात अशा स्वरूपाच्या दुर्घटना होऊ नयेत, यासाठी शहरांतील औद्योगिक, व्यावसायिक मालमत्तांचे अग्नीप्रतिबंधात्मक सर्वेक्षण महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने केले. सर्वेक्षणातील धोकादायक मालमत्ताधारकांना अग्नीशामक यंत्रणांची उपलब्धता, ये-जा करण्याचा सुरक्षित मार्ग, धोकादायक पदार्थांचा साठा, निवासी वास्तव्याचा विचार करता अग्नीशामक यंत्रणा बसवण्याची पहिली नोटीस दिली होती. त्यानंतर काही मालमत्ताधारकांनी यंत्रणा बसवली.