केशवराव भोसले नाट्यगृह आग प्रकरणी २२ दिवसांनंतर अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद !
कोल्हापूर, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – कोल्हापूरचे प्राचीन वैभव असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ८ ऑगस्टला आग लागली होती. या आगीत नाट्यगृहाची इमारत जळली होती आणि केवळ दगडी बांधकाम शिल्लक राहिले होते. या आगीत नाट्यगृहाची १६ कोटी रुपयांची हानी झाली होती. या संदर्भात ९ ऑगस्टला महापालिकेकडून केवळ जळीत फिर्याद नोंद करण्यात आली होती. यानंतर विविध नाट्यप्रेमींनी केलेल्या आंदोलनामुळे, तसेच कृती समितीच्या पाठपुराव्यामुळे तब्बल २२ दिवसांनंतर महापालिकेने दिलेल्या दुसर्या तक्रारीवरून अज्ञाताच्या विरोधात केशवराव भोसले नाट्यगृह आग प्रकरणात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आगीत नाट्यगृहाची लाकडी बाल्कनी, लोखंडे पत्रे, सागवानी लाकडाचे काम, लाकडी जिना, आसंदी, खिडक्या, दरवाजे, लाकडी-लोखंडी खांब असे नाट्यगृहाशी संबंधित सर्व साहित्य या आगीत जळले होते. या संदर्भात महापालिकेने नेमलेल्या चौकशी समितीतून आगीचे कारण स्पष्ट झाले नव्हते.