थोडक्यात महत्त्वाचे : हार्बर रेल्वे विस्कळीत ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड….आज गायमुख येथील चौपाटीच्या दुसर्या टप्प्याचे लोकार्पण !
हार्बर रेल्वे विस्कळीत
ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड
वाशी – वाशी रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वे सेवेवर परिणाम झाला. हार्बर रेल्वेवरील वाहतूक २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत होती. सकाळी कामावर जाण्याच्या वेळीच हा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला.
आज गायमुख येथील चौपाटीच्या दुसर्या टप्प्याचे लोकार्पण !
ठाणे – घोडबंदरमधील गायमुख भागातील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटीच्या दुसर्या टप्प्याचे लोकार्पण १ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार, ठाणे महापालिका, ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नागला बंदर खाडीलगत सर्वांत मोठी अशी सुमारे ८०० मीटरची लांबी असलेली चौपाटी विकसित केली जात आहे.
२ दलालांच्या हत्येचा उलगडा; ५ जण अटकेत !
नवी मुंबई – रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळलेल्या २ दलालांच्या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. भूमीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे अन्वेषणात समोर आले असून यातील एक मृत दलाल सुमित जैन यानेच हा कट रचल्याचे समोर आले आहे. दुसर्या दलालाच्या हत्येनंतर सुपारीच्या पैशांवरून वाद झाल्याने जैन याचीही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
बेकायदेशीर जमावाचे प्रकरण
मुंबई – वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे केलेल्या आंदोलनात बेकायदेशीर जमाव केल्यामुळे बीकेसी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाच्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकवून आंदोलन केले होते. मुंबई काँग्रेसच्या पदाधिकार्यांसह १४ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार !
कल्याण – टिटवाळ्याजवळील दहागावमध्ये एका नराधमाने २ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ३० ऑगस्ट या दिवशी घडली. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
संपादकीय भूमिका : विकृत मनोवृत्तीच्या वासनांधांना कारागृहातच डांबायला हवे !