हिंदु जनजागृती समितीच्या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ या उपक्रमाच्या अंतर्गत जोडले गेलेले धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये जाणवलेले पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती !
‘वर्ष २०१९ ते २०२३ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले. त्यांमध्ये अनेक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला, तसेच काही जणांनी साधनेला प्रारंभ केला. या उपक्रमाच्या अंतर्गत जोडले गेलेले धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये जाणवलेले सकारात्मक पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
(भाग १)
१. मुंबई
१ अ. प्रशिक्षणवर्गामध्ये आल्यानंतर साधनेचे महत्त्व लक्षात येऊन साधनेला आरंभ करणे : ‘श्री. आकाश शिंदे हे पूर्वी नास्तिक होते. वडिलांच्या सांगण्यावरून ते प्रात्यक्षिके बघण्यासाठी प्रशिक्षणवर्गात आले होते. प्रशिक्षण आवडल्यानंतर ते शिकण्यासाठी नियमितपणे वर्गाला येऊ लागले. त्यामुळे त्यांच्यात पुष्कळ सकारात्मक पालट झाले. आकाश हे वर्गाला नियमित येऊ लागल्यामुळे त्यांचा नामजप चालू झाला. आता ते नियमितपणे सेवेला येतात आणि साधनाही करत आहेत. ते गुरुपौर्णिमेच्या सेवेतही सहभागी होतात. ‘साधना’ हेच प्राधान्य आहे. अन्य काही नको’, हे आता त्यांच्या लक्षात आले आहे.
२. पुणे
२ अ. सौ. भाग्यश्री बाबर यांच्या वास्तूमध्ये आरंभी तीव्र त्रास जाणवत असे; परंतु नामजपादी उपाय नियमितपणे केल्यामुळे आता त्यांच्या वास्तूतील त्रास उणावले आहेत.
२ अ १. सौ. भाग्यश्री यांच्या साधनेच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या यजमानांमध्ये सकारात्मक पालट होणे आणि त्यांनी सौ. भाग्यश्री यांना साधनेत साहाय्य करणे : आधी सौ. भाग्यश्री यांचे पती काही प्रमाणात नकारात्मक होते; परंतु सौ. भाग्यश्री यांच्या साधनेच्या प्रयत्नांमुळे आता ते सकारात्मक झाले आहेत. सौ. भाग्यश्री यांचे पती मुलांना प्रशिक्षणवर्गाला पाठवतात. ते मुलांना वर्गात सोडायला आणि आणायलाही जातात. पत्नीला सेवा करून घरी येण्यास विलंब होणार असेल, तर ते स्वतः स्वयंपाक करतात. पत्नीला साधनेसाठी सहकार्य करतात. ते पत्नीला म्हणतात, ‘‘तू अधिकाधिक वेळ साधना आणि सेवा यांसाठीच दे.’’ आता ते नियमित नामजप आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला लागले आहेत. त्यांचे साधनेचे प्रयत्न आता भावपूर्ण चालू झाले आहेत.
२ आ. गावातील मुलींना एकत्र करून त्यांच्याकडून नामजप आणि प्रशिक्षणाचा सराव करून घेणारी कु. दिव्या गव्हाणे ! : ‘स्वतःचे रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे’, हे प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून भोर (पुणे) येथील कु. दिव्या गव्हाणे हिला समजले. त्यानंतर तिने प्रतिदिन एका युवतीच्या घरी जाऊन वर्गातील मुलींसाठी सामूहिक नामजप चालू केला. तिने गावातील मुलींना एकत्र करून त्यांच्याकडून प्रशिक्षणातील प्रकारांचा नियमित सराव करून घेण्यास आरंभ केला.
२ इ. घरातील वाईट शक्तींचा त्रास दूर होण्यासाठी सांगितलेले नामजपादी उपाय त्वरित केल्याने त्रास न्यून होणे : तळेगाव (पुणे) येथे प्रशिक्षणवर्ग चालू झाल्यावर आम्ही कु. गौरी धामणकर हिच्या घरी गेलो होतो. तेव्हा तिच्या घरामध्ये तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याचे माझ्या लक्षात आले. गौरी आणि तिची आई यांनीही ‘घरामध्ये वाईट शक्तींचे त्रास कशा प्रकारे होतात ?’, याविषयी काही घटना सांगितल्या. त्रासाच्या निवारणार्थ आम्ही तिला ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करणे, तो नामजप घरात यंत्रावर सतत लावून ठेवणे, नामपट्टी लावणे आणि वास्तूशुद्धी करणे’, इत्यादी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला सांगितले. तिने हे उपाय नियमित करायला आरंभ केला.
काही आठवड्यांनंतर आम्ही पुन्हा त्यांच्या घरी गेलो. तेव्हा तिच्या आईने स्वतःहून सांगितले, ‘‘तुम्ही सांगितलेले नामजपादी उपाय केल्यानंतर आमच्या घरातील त्रास उणावला आहे. घरात वाईट शक्तींचा वावर जाणवायचा. तो न्यून झाला आहे. रात्री झोपेत वाईट स्वप्न पडायचे किंवा ‘कुणीतरी गळा पकडत आहे’, असे गौरीला जाणवायचे. रात्री झोपतांना नामजप लावायला आरंभ केल्यापासून तिचे हे त्रास नाहीसे झाले आहेत.’’ त्यानंतर गौरीने सांगितले, ‘‘मी कधी नामजप लावायला विसरले, तर मला पुन्हा त्रास होतो. त्यामुळे मी आता नियमित नामजप लावूनच झोपते.’’
२ ई. प्रशिक्षणवर्गातील युवतींनी धर्माचरण करण्यास आरंभ केल्याने त्यांच्या पालकांनी त्यांना प्रशिक्षणवर्गात जाण्यास उद्युक्त करणे : कोथरूड भागात ज्या ठिकाणी प्रशिक्षणवर्ग चालू आहे, तेथील ५० पेक्षा अधिक मुली धर्माचरणी झाल्या आहेत. त्यांचे पालकही समितीशी विश्वासाने जोडले गेले आहेत. वर्गातील सर्व मुली नियमितपणे ‘कुंकू लावणे, सात्त्विक वेशभूषा परिधान करणे आणि नामजप करणे’, इत्यादी कृती करत आहेत. युवतींमध्ये धर्माचरणाच्या दृष्टीने झालेले सकारात्मक पालट पाहून पालक अत्यंत आनंदी झाले आहेत. वर्गाला नियमित जाण्यासाठी पालक स्वतःहून मुलींना उद्युक्त करत आहेत.
वर्गातील कु. सानिका मरगळे, कु. सिद्धी डावल आणि कु. सानिका नढे या मुली पूर्वी वर्गाला ‘ट्रॅक पँट’ आणि ‘टी शर्ट’ घालून यायच्या; परंतु गेल्या २ मासांपासून त्या पंजाबी पोषाख घालून वर्गाला येतात. आता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ‘त्या साधिकाच आहेत’, असे वाटते.
३. नाशिक
३ अ. गावातील वातावरण प्रतिकूल असूनही प्रशिक्षणवर्गातील मुलींमध्ये आत्मविश्वास जाणवणे आणि त्यांच्या देवावरील श्रद्धेत वाढ होणे : उगाव (तालुका निफाड, जिल्हा नाशिक) या गावात ७० टक्के धर्मांध असून ‘लव्ह जिहाद’ची एक घटना उघडकीस आली आहे, तरीसुद्धा प्रशिक्षणवर्गात येणार्या मुली डगमगत नाहीत. त्या न घाबरता शिक्षणासाठी तालुक्याला जातात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जाणवतो. त्या अनोळखी ठिकाणी जायलाही घाबरत नाहीत. त्या सतर्क असतात. ‘देव काळजी घेईल’, असे त्या म्हणतात. सर्व मुली संघभावाने कार्य करतात.
४. जळगाव
४ अ. प्रशिक्षणवर्गाला जायला लागल्यापासून भावंडांमध्ये सकारात्मक पालट होणे : ‘जळगाव येथील कु. धनश्री दहिवदकर हिच्या मनात आधी नोकरीचे विचार असायचे. आता ‘साधनाच करायची आहे’, असे विचार तिच्या मनात असतात. कु. धनश्री आणि तिचा भाऊ घनश्याम यांनी साधना चालू केल्यापासून त्यांच्या घरात पुष्कळ चांगले पालट झाले आहेत. त्यांच्या सर्वच कुटुंबियांमध्ये चांगला पालट झाला आहे.
४ आ. प्रशिक्षणवर्गात गेल्यामुळे धर्माचरण करून स्वतःत पालट घडवणारी कु. चैताली गाजरे ! : हिंगोणा (तालुका यावल, जिल्हा जळगाव) येथील कु. चैताली गाजरे हिला ‘जीन्स’ घालण्यासाठी घरातून विरोध होता; म्हणून ती बॅगमध्ये ‘जीन्स’ घेऊन शेजारच्यांकडे कपडे पालटून मग महाविद्यालयात जायची; मात्र प्रशिक्षणवर्गाला जायला लागल्यापासून ती धर्माचरण करायला लागली. आता ती केसांचा भांग पाडते, कपाळाला कुंकू लावते आणि पंजाबी पोषाख घालते. चैतालीने रहाणीमानात पालट केल्यामुळे महाविद्यालयामधील तिच्या मैत्रिणी तिची मस्करी करू लागल्या. ‘तू अशी राहिलीस, तर आम्ही तुझ्या समवेत रहाणार नाही’, असे म्हणून त्यांनी तिच्याशी बोलणे बंद केले; पण तरीही तिने धर्माचरण चालूच ठेवले. साधनेमुळे चैतालीचा स्वभाव शांत आणि स्थिर झाला आहे. आता तिच्या मैत्रिणींमध्येही सकारात्मक पालट झाला आहे. चैताली त्यांनाही धर्माचरणाचे महत्त्व सांगते.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (१६.५.२०२४)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/832366.html
|