‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांची ‘इकोसिस्टीम’ (यंत्रणा) समजून घ्या !

सनातन हिंदु धर्म आणि भारत यांचा विरोध करणार्‍या अर्बन नक्षलवाद्यांचे बुरखे फाडून त्यांचे खरे चेहरे समाजासमोर आणणे आवश्यक !


खरेतर या ‘साम्यवादी इकोसिस्टीम’ने, म्हणजेच अर्बन (शहरी) नक्षलवाद्यांनी कार्यक्रम, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, पुस्तके आणि तथाकथित चळवळी यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे हिंदु संस्थांच्या विरोधात ‘नॅरेटिव्ह सेट’ (खोटे कथानक प्रस्थापित) केले आहेत, अशा बिकट काळात हिंदु संस्थांच्या बाजूने भूमिका प्रस्तुत करणे आणि या साम्यवादी इकोसिस्टीमचा बुरखा फाडणे, हे कठीण कार्य आहे.

गेली २५ वर्षे सनातन संस्था हिंदु धर्माचे प्रचाराचे कार्य अत्यंत तेजस्वीपणे करत आहे. हे वर्ष सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून याच काळात संस्थेला ‘आतंकवादी संस्था’ ठरवण्याचा दुष्ट प्रयत्न झाला. निरीश्वरवाद्यांच्या हत्यांमध्ये सनातनच्या साधकांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहस्रो साधकांच्या चौकशा करण्यात आल्या. असा संघर्षाचा काळ अनुभवत सनातन संस्थेचा २५ वर्षांचा प्रवास झाला आहे. या २५ वर्षांत सनातनचा छळ करणारे दुसरे-तिसरे कुणी नव्हते, तर अर्बन नक्षलवाद्यांची साम्यवादी इकोसिस्टीम होती ! ‘अंधश्रद्धा निर्मूलनवादी संघटनां’च्या नावाने ही साम्यवादी इकोसिस्टीम कार्य करत होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही चळवळ प्रथम कोल्हापूर येथे चालू झाले. त्या वेळी तिचे नाव होते, ‘मानवीय नास्तिक मंच’ ! यातील नास्तिक शब्दाचा अर्थ काय ? नास्तिक म्हणजे देव-धर्म न मानणारे ! ज्यांना देव-धर्म मानायचा नाही, त्यांचा मंच होता तो. पुढे त्याला ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, असे गोंडस नाव ठेवण्यात आले.

अर्बन नक्षलवाद्यांची ‘इकोसिस्टीम’ कशी कार्यरत आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही काळापासून मुंबई, पुणे, कोल्हापूर, देहली, भाग्यनगर, चेन्नई अशा प्रमुख शहरांतून पसरवला जाणारा ‘अर्बन नक्षलवाद’ काय आहे ? साम्यवाद्यांच्या भाषेत या इकोसिस्टीमला ‘लेफ्ट (साम्यवादी) इकोसिस्टीम’ म्हणतात. २५ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध लेखात आपण ‘साम्यवादी इकोसिस्टीम’ काय आहे ? मिडियात बसलेले अर्बन नक्षलवादी नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) बनवतात ही धोक्याची घंटा’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/827913.html

श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

३. साम्यवादी आणि मुसलमान यांनी एकत्र काम करून सनातन धर्माला नष्ट करणे

साम्यवादी पंथियांकडून प्रचार केला जातो की, जगात सर्वाधिक हत्या करणारा हिटलर आहे; मात्र येथे लक्षात घेतले पाहिजे की, जगभरामध्ये यहुदी, सामान्य नागरिक, शेतकरी यांच्या हिंस्र पद्धतीने हत्या करणार्‍यांच्या सूचीत पहिले नाव साम्यवाद्यांचे येते. रशिया, चीन, जर्मनी, फ्रान्स, कंबोडिया अशा अनेक देशांत आतापर्यंत ९ कोटी ४० लाख लोकांच्या हत्या या साम्यवाद्यांनी केलेल्या आहेत; मात्र हेच साम्यवादी आज हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला ‘मानवतावादी’ म्हणवून घेतात.

याच बंगालमध्ये मालदा, मुर्शिदाबाद, संदेशखाली येथील हिंदूंवर जे अत्याचार चालू आहेत, काश्मीरमध्ये सहस्रो हिंदूंचा जो वंशविच्छेद करण्यात आला, त्यांच्याविषयी या साम्यवाद्यांनी कधी आवाज उठवला आहे का ?, आंदोलन केले आहे का ? निखिल वागळे, सागरिका घोष, बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, रवीश कुमार यांच्यासारखी पत्रकारांची टोळी ही याच साम्यवादी इकोसिस्टीमसाठी काम करून अर्बन नक्षलवाद्यांना साहाय्य करत असते. याचे कारण म्हणजे साम्यवादी आणि अर्बन नक्षलवादी या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत.

४. विद्यापिठे आणि अर्बन नक्षलवादी यांची इकोसिस्टीम

विद्यापिठांतील अर्बन नक्षलवाद्यांची इकोसिस्टीम समजून घेण्यासाठी देहलीतील ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठ’ (जे.एन.यु.) या राष्ट्रीय विद्यापिठातील घटना आठवा. तेथे उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतातील बुद्धीमान युवकांच्या मेंदूमध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घोषणा काही अभ्यासक्रमातून शिरलेल्या नाहीत, तर त्यासाठी कुणीतरी षड्यंत्र करून त्यांच्या डोक्यात हे विष भरलेले आहे. ज्या युवकांवर भविष्यातील भारताचे दायित्व आहे, तेच जर भारत तोडण्याच्या घोषणा करू लागले, तर काय करणार ? आपल्याच भारतीय नागरिकांमध्ये देशद्रोही विचार भरून त्यांनाच भारताच्या विरोधात उभे करून अंतर्गत युद्धाकडे देशाला नेणे, हे अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र आहे. त्यासाठी त्यांनी शहरी भागांमध्ये विशेष करून महाविद्यालये, विद्यापिठे, आय.आय.टी. यांसारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांना लक्ष्य करून त्यातून अर्बन नक्षलवाद वाढवण्याचे कार्य चालू आहे.

आज ‘जे.एन.यु.’मध्ये केवळ ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घाेषणा दिल्या जात नसून स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी भारतीय सैनिकांची हत्या केल्यावर विद्यापिठात मिठाई वाटण्यात आली, महिषासुर जयंती साजरी करून दुर्गादेवीला ‘वेश्या’ म्हटले गेले. सनातन धर्माच्या विरोधातील हा प्रचार आता ‘जे.एन्.यु.’पुरता मर्यादित राहिला नसून तो मुंबई, देहली, पुणे, चेन्नई, भाग्यनगर, कोलकाता अशा अनेक मुख्य शहरांतील विद्यापिठांमध्ये पोचला आहे. या शिक्षण संस्थांमधून सध्या जातीपातींचे राजकारण, समलैंगिकतेला प्रोत्साहन, ‘बीफ फेस्टिव्हल (गोमांसाविषयीचा महोत्सव)’, ‘किसिंग’ (चुंबन घेणे) फेस्टिव्हल, महिषासुर जयंती यांसारख्या विकृतींना प्रोत्साहन देऊन त्यातून विद्यार्थ्यांच्या मनात सनातन धर्म, हिंदु संस्कृती, परंपरा यांच्या विरोधात भावना निर्माण केली जात आहे.

दुर्दैवाने म्हणावे लागते की, आज पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणजे दुसरी ‘जे.एन्.यु.’ होऊ पहात आहे. तेथे ‘ललित कला मंच’कडून प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांचे विडंबन करणारी नाटिका सादर करण्यात आली. मागे पुण्यातीलच ‘कबीर कला मंच’ नावाच्या संघटनेतील युवक नक्षलवादी कारवायांत पकडण्यात आले. यात सहभागी विद्यार्थी भारतीयच आहेत; मात्र वैचारिक अजेंडा अर्बन नक्षलवाद्यांचा आहे.

पुणे विद्यापिठाच्या अंतर्गत येणारे ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’च्या कुलगुरुपदी अशा व्यक्तीची निवड झाली आहे की, ज्याला एकही दिवस शिकवण्याचा अनुभव नाही. अर्बन नक्षलवादी विचारांच्या मंडळींची कुलगुरुपदी निवड झाल्याचे आरोप झाले. हे आरोप झाल्यानंतरही मिडिया या बातम्या छापत नाही; कारण मिडियातही अर्बन नक्षलवादी त्या बातम्या उजेडात आणू देत नाहीत.

५. कोरेगाव-भीमा प्रकरणातील अर्बन नक्षलवाद्यांचा सहभाग आणि न्यायव्यवस्थेचे त्यांना साहाय्य

काही वर्षांपूर्वी कोरेगाव भीमामध्ये जी दंगल झाली आणि त्यातून एल्गार परिषदेचे षड्यंत्र उघड झाले. त्यात सहभागी असणार्‍यांना अटक केल्यावर त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले. त्यात अटक केलेले गौतम नवलखा, वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा ही सर्व मंडळी साम्यवादी विचारांची ‘व्हाईट कॉलर’वाली (कथित प्रतिष्ठित), उच्चविद्याविभूषित होती. एवढा गंभीर कट रचूनही त्यांना अटक होताच त्यांची साम्यवादी इकोसिस्टीम कार्यरत झाली. सरकारने अटक करून त्यांच्यावर कसा अन्याय केला आहे, याच्या चर्चा चालू झाल्या. लगेच दुसर्‍या दिवशी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली गेली आणि न्यायालयातही त्वरित सुनावणी होऊन अटक झालेली मंडळी प्रतिष्ठित असल्याने त्यांना पोलीस कोठडी न देता, त्यांच्याच घरात ‘हाऊस अरेस्ट’ (घरात नजरकैद) करण्याचे आदेश दिले. भारतातील कोणत्याही कायद्यात ‘हाऊस अरेस्ट’चा उल्लेख नसतांनाही त्यांना ही विशेष सुविधा का दिली गेली ? हे एखाद्या हिंदुत्वनिष्ठांच्या संदर्भात घडले असते का ? यातून ही इकोसिस्टीम आणि तिचा प्रभाव आपल्याला लक्षात येईल.

त्यामुळे या अर्बन नक्षलवाद्यांनी आज मानवतावाद्याचा, कुणी पर्यावरणवाद्याचा, कुणी सामाजिक कार्यकर्त्याचा, तर कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचा मुखवटा घातलेला आहे; परंतु सगळ्यांचा अजेंडा (कार्यसूची) एकच आहे, तो म्हणजे सनातन हिंदु धर्म आणि भारत यांचा विरोध ! अशांचे बुरखे फाडून त्यांचा खरा चेहरा समोर आणण्याची आज आवश्यकता निर्माण झालेली आहे.
(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (२०.८.२०२४)

या लेखाच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/832312.html