श्री तुळजाभवानी मंदिर आणि परिसर यांच्या विकासासाठी ५४ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर आणि परिसर यांच्या विकासासाठी ५४ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने या कामांची निविदा प्रसिद्ध केली आहे. श्री तुळजाभवानी मंदिराचे जतन आणि दुरुस्ती यांसाठी विविध कामे करण्यात येणार आहेत; मात्र मंदिराचे पुरातन रूप कायम ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्या पुढाकाराने मंदिर परिसरातील ही विकासकामे अन् आराखडा संमत करण्यात आला आहे.
मंदिरातील जतन आणि दुरुस्ती यांच्या कामांचे ६ टप्पे करण्यात आले आहेत. त्यात पहिल्या भागात भुयारी मार्ग, यज्ञ, मंडप, सभा मंडप आणि भवानी शंकर मंदिर यांचे जतन आणि दुरुस्ती यांचे ११ कोटी ३६ लाख रुपयांचे काम आहे. मंदिरातील ६ भागांतील १,२,३ आणि ५ यांतील नमूद समाविष्ट कामाची निविदा पुरातत्व विभागाने काढली आहे. ती भरल्यावर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. ही सर्व कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी सांगितले. या कामांमुळे मंदिर आणि शहर यांच्या वैभवात भर पडणार असून पर्यटनाला चालना मिळणार आहे.