रौप्यमहोत्सवानिमित्त सनातन संस्थेची आध्यात्मिक वाटचाल !

या वर्षी सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सनातन संस्थेसाठी हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने ‘सनातन संस्था म्हणजे काय ?’ आणि ‘तिचे कार्य काय ?’, हे कळण्यासाठी सनातन संस्थेच्या आध्यात्मिक कार्याची वाटचाल येथे देत आहे.

(सद्गुरु) नंदकुमार जाधव

१. सनातन संस्था काय आहे ?

या प्रश्नाचे सोप्या भाषेतील उत्तर म्हणजे सनातन संस्था ही अध्यात्मप्रसाराच्या क्षेत्रात कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. आमची समाजसेवा ही आध्यात्मिक स्वरूपाची आहे. लोकांचे जीवन आनंदी बनवणे, तणावमुक्त करणे, व्यसनमुक्त करणे, त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास करणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांची आध्यात्मिक उन्नती करून घेणे, यांसाठी आम्ही योग्य साधना शिकवतो. थोडक्यात समाजाचे आध्यात्मिक कल्याण करणारे कार्य आम्ही करतो; म्हणूनच या कार्याचे उद्देश वाक्य आहे – ‘आनंदी जीवन आणि ईश्वरप्राप्ती यांसाठी सनातन संस्था !’

१ अ. सनातन संस्थेचा २५ वर्षांचा प्रवास कसा होता ? : याविषयी अनेक जण विचारणा करतात म्हणून सांगतो. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी २२ मार्च १९९९ या दिवशी सनातनचे बीज रोवले आणि अवघ्या २५ वर्षांत या बिजाचा वटवृक्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच आज ‘सनातन संस्था ही हिंदु धर्माचा तेजस्वी प्रसार करणारी संस्था’ म्हणून विख्यात आहे. खरे तर सनातन संस्थेची २५ वर्षे, म्हणजे सनातनच्या साधकांच्या आणि आपल्यासम शुभचिंतकांच्या निःस्वार्थ समर्पणाची २५ वर्षे आहेत. हा २५ वर्षांचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता; कारण याच काळात सनातन संस्थेला ‘आतंकवादी संस्था’ ठरवण्याचा दुष्ट प्रयत्न झाला. निरीश्वरवाद्यांच्या हत्यांमध्ये सनातनच्या साधकांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहस्रो साधकांच्या चौकशा करण्यात आल्या. असा संघर्षाचा काळ अनुभवत सनातन संस्थेचा २५ वर्षांचा प्रवास झाला आहे.

२. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

यांच्याविषयी जाणून घेण्याची अनेक जण इच्छा व्यक्त करतात; म्हणून त्यांचा जीवनपरिचय थोडक्यात येथे देत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे स्वतः आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ होते. वर्ष १९७१ ते १९७८ या कालावधीत त्यांनी इंग्लंडमध्ये ‘क्लिनिकल हिप्नोथेरपी’ अर्थात् ‘वैद्यकीय संमोहनउपचार’ या विषयावर विस्तृत संशोधन केले. त्यांनी ‘इओसिनोफिलीया’ हा रक्तांच्या पेशींचा रोग मानसिक कारणांमुळे होतो, याचा शोध लावला. वर्ष १९७८ ते १९८५ या कालावधीत वैद्यकीय उपचार करतांना त्यांना असे दिसून आले की, जवळपास ३० टक्के रुग्ण त्यांच्या वैद्यकीय उपचारांनी बरे न होता साधना केल्यानंतर, त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबळी यांसारखे विधी केल्यानंतर बरे होतात. तेव्हा त्यांच्या मनामध्ये अध्यात्माविषयी जिज्ञासा निर्माण झाली. त्या काळात त्यांनी अध्यात्मातील अधिकारी संतांकडून अध्यात्म आणि हिंदु धर्म यांचा अभ्यास केला अन् स्वतः प्रत्यक्ष साधनेला प्रारंभ केला. पुढे त्यांना इंदूरनिवासी थोर संत प.पू. भक्तराज महाराज गुरु म्हणून लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेही अध्यात्मातील अधिकारी संत झाले. सनातन हिंदु धर्मातील हे अध्यात्म ‘शास्त्र’ स्वरूपात म्हणजे ‘सायन्स’ म्हणून स्थापित व्हावे, यासाठी त्यांनी त्यांचे जीवन समर्पित केले, तसेच सनातन धर्माचा वैज्ञानिक परिभाषेत प्रसार करण्यासाठी सनातन संस्थेची स्थापना केली आणि ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा नवीन साधनामार्ग साधकांना शिकवला.

३. गुरुकृपायोगानुसार साधना

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे शास्त्रज्ञ असल्याने त्यांनी सनातन धर्मातील अध्यात्मशास्त्र आणि साधनापद्धत यांचेही संशोधनात्मक अध्ययन केले.

अ. या अध्ययनातून त्यांनी एक सिद्धांत प्रस्थापित केला तो म्हणजे, ‘शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी सर्वांनी एकसमान साधना न करता ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असल्याने प्रत्येकाने स्वतःच्या प्रकृतीनुसार, म्हणजेच स्वभावानुसार साधना केली पाहिजे’, उदाहरणार्थ ज्याच्या मनात भक्तीभाव आहे, त्याने ध्यानयोगानुसार किंवा ज्ञानयोगानुसार साधना करण्यापेक्षा भक्तीयोगानुसार साधना केली, तर त्याची लवकर उन्नती होऊ शकते.

आ. साधकाची आध्यात्मिक उन्नती शीघ्र व्हावी, यासाठी त्यांनी विविध तत्त्वे सांगितली, उदाहरणार्थ एकाच वेळी अनेक देवतांची उपासना करण्यापेक्षा स्वतःची श्रद्धा असलेल्या एका देवतेची किंवा गुरूंनी सांगितलेली साधना केल्यास त्या देवतेची अनुभूती घेणे सुलभ होते. त्यांनी ‘स्थुलाकडून सूक्ष्माकडे जाणे’, हे तत्त्व सांगितले; कारण देवता, अध्यात्म हे सर्व विषय सूक्ष्म जगताशी संबंधित आहेत. साधना करणार्‍याने स्थुलातून प्रयत्न करतांना सूक्ष्मातील देवतेचे सान्निध्य अनुभवणे महत्त्वाचे असते.

इ. त्यांनी काळानुसार साधना करण्याचे तत्त्व सांगितले आहे, उदा. प्रत्येक युगाची साधना जशी ठरलेली असते, तशी साधना करतांना ‘काळानुसार काय चालू आहे’, याचे भान ठेवून साधना करणे महत्त्वाचे असते. त्यांनी सांगितले, ‘धर्माला ग्लानी आलेली असतांना धर्मसंस्थापनेसाठी साधना करणे, हे सध्याच्या काळात आवश्यक आहे.’ यासाठीच सनातन संस्थेचे साधक वैयक्तिक साधना म्हणून धर्मसंस्थापनेच्या म्हणजे हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या या कार्यात सहभागी झालेले आहेत.

ई. त्यांनी कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग या तिन्ही योगांचा संगम असलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनापद्धतीची निर्मिती केली. याचा उद्देश हाच होता की, एकाच वेळी तिन्ही साधनापद्धतींनी साधना केली, तर साधकाची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होईल.

आज सनातनचे सर्व साधक गुरुकृपायोगानुसार साधना करतात. गुरुकृपायोगानुसार साधना करून आतापर्यंत १२८ जण संतपदी आरूढ झाले आहेत, तर १ सहस्रांहून अधिक साधकांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. ही खरोखर आध्यात्मिक क्रांती आहे.

४. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया

हे गुरुकृपायोगानुसार साधनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये षड्रिपूंपासून दूर रहाण्याचे मार्गदर्शन आहे, तसेच चित्तशुद्धीचे महत्त्व सांगितले आहे. या दोन्ही गोष्टी साध्य करणारी प्रक्रिया म्हणजे ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अध्यात्मातील अधिकारी संत बनण्यापूर्वी जागतिक कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ होते. त्यांनी स्वसंमोहनाद्वारे स्वभावदोष निर्मूलन करणार्‍या स्वयंसूचनेच्या पद्धती शोधल्या. ‘व्यक्तीमत्त्वातील दोष हे मनातील संस्कार असल्याने मनापेक्षा सूक्ष्म असलेल्या बुद्धीच्या उपयोगाद्वारे त्यांवर नियंत्रण मिळवता येते’, हा त्यांच्या शोधकार्याचा निष्कर्ष होता. ईश्वर दोषरहित आणि सर्वगुणसंपन्न असल्याने साधकाला आध्यात्मिक उन्नतीसाठी दोषांचे निर्मूलन अन् गुणांचे संवर्धन करावे लागते, तसेच अहंकारामुळे ‘मी ईश्वरापासून वेगळा आहे’, ही जाणीव दृढ होत असल्याने आध्यात्मिक उन्नती करू इच्छिणार्‍या साधकाला ‘अहं निर्मूलन करणे’ आवश्यक असते. यासाठी गुरुकृपायोगानुसार साधनेमध्ये स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचा समावेश करण्यात आला. आपल्यापैकी अनेकांनी सांगितले आहे की, ‘सनातनच्या साधकांमध्ये नम्रता जाणवते, याचे कारण ते करत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया !’

सनातन संस्था समाजालाही निःशुल्क स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकवते. या अंतर्गत ‘ज्या स्वभावदोषामुळे तणाव उत्पन्न होतो, त्या व्यक्तीमत्त्वाच्या दोषावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःच्या बुद्धीद्वारे मनाला स्वयंसूचना कशी द्यायची’, हे शिकवले जाते. याच पद्धतींचा अवलंब केल्याने केवळ जीवनातील तणावाचेच निर्मूलन होते, असे नाही, तर स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचा आणि पर्यायाने नेतृत्वगुणाचा विकासही होतो. या प्रक्रियेमुळे सहस्रो जणांनी त्यांचा ताण दूर होऊन मन आनंदी झाल्याचे, जीवनाकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचे अनुभवले आहे. सनातनच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी मानसिक तणाव निर्मूलन कार्यशाळा, तसेच व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळा यांचेही निःशुल्क आयोजन केले जाते.

५. अध्यात्मप्रसार

आज प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. हा शाश्वत आनंद साधना केल्यामुळे मिळू शकतो. यासाठी सनातनकडून अनेक गावांमध्ये साधना सत्संग, युवा साधना सत्संग, बालसंस्कारवर्ग, तसेच जीवनात अध्यात्माचे महत्त्व शिकवणारी प्रवचने आयोजित केली जातात. या धर्मकार्यातून तेजस्वी आणि धर्मकार्यासाठी योगदान देणार्‍या समर्पित साधकांची फळी निर्माण होत आहे. अक्षरशः सहस्रो साधक आणि शेकडो कुटुंबे सनातनशी जोडली गेली आहेत. अनेक उच्चविद्याविभूषितांनी स्वेच्छेने नोकरी-व्यवसाय सोडून धर्मकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. हा आजच्या मायाजगतातील एक चमत्कारच म्हणावा लागेल !

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

६. सनातनचे आश्रम

समष्टी साधना म्हणून हिंदु धर्माचे पूर्णवेळ कार्य करण्याची इच्छा असलेल्या साधकांसाठी सनातन आश्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. आज राजकारण्यांनी समाजाला जातीजातींत विभाजित केले आहे. या पार्श्वभूमीवर सनातनच्या आश्रमांतील जातीनिरपेक्षता ठळकपणे दिसणारी आहे. आश्रमातील प्रत्येक जण एकमेकांकडे ‘हा साधकबंधू आहे, गुरुबंधू आहे, धर्मबंधू आहे’, या आध्यात्मिक भावाने पहातो. त्यामुळे सनातन आश्रम हे शेकडो सदस्यांचे एक कुटुंबच बनले आहे. ईश्वरप्राप्तीच्या माध्यमातून एकसंध समाज निर्माण करता येतो आणि रामराज्याची अनुभूती घेता येते, हे सनातनच्या आश्रमातून अनुभवता येते. आज सनातनचे आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राची छोटीशी प्रतिकृतीच बनली आहे. गोव्यातील सनातन धर्माचा हा एकमेव आश्रम असल्याने गोव्यात आल्यावर पुरी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी निश्चलानंद सरस्वती आणि कांची कामकोटी पिठाधीश्वर श्री स्वामी जयेंद्र सरस्वती हे सनातन आश्रमात आले होते. ही आमच्यासाठी कृतज्ञतेची गोष्ट आहे.

सनातन चे ग्रंथ

 

७. आध्यात्मिक ग्रंथसंपदा

सनातनच्या  आध्यात्मिक  कार्याचा  एक  महत्त्वाचा   पैलू,  म्हणजे अध्यात्माचे ज्ञान देणार्‍या, म्हणजेच सनातन धर्माचे शिक्षण देणार्‍या अमूल्य ग्रंथसंपदेची निर्मिती ! या ग्रंथांचे वैशिष्ट्य, म्हणजे ग्रंथांमध्ये आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत सनातन धर्मातील अध्यात्माची शिकवण आहे.  जुलै २०२४ पर्यंत १३ भारतीय भाषांमध्ये ३६६ ग्रंथांच्या ९७ लाख २९ सहस्र प्रती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. अजूनही ५ सहस्र ग्रंथ प्रकाशित होतील, एवढ्या लिखाणाचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संग्रह करून ठेवला आहे. एवढ्या ज्ञानाचा मोठा संग्रह आणि एखाद्या आध्यात्मिक संस्थेच्या ग्रंथांच्या जवळपास १ कोटीपर्यंत प्रती मुद्रित होणे, ही गुरुकृपा आहे. या ग्रंथांमुळे अनेक हिंदूंच्या साधनेचा पाया भक्कम झाला. समाजाची आध्यात्मिक चेतना जागृत करण्यात या चैतन्यदायी ज्ञानपरंपरेचाही वाटा आहे.

८. आध्यात्मिक हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य

आज सर्वत्र हिंदु राष्ट्राची चर्चा होत आहे; पण जेव्हा ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द उच्चारणेही गुन्हा वाटावा, अशी स्थिती होती, तेव्हा म्हणजे वर्ष १९९८ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा ग्रंथ संकलित करून हिंदु राष्ट्राचा विचार मांडला. त्यात समाजाला सत्त्वगुणी बनवणे, अध्यात्मकेंद्रित राज्यव्यवस्था स्थापन करणे आणि त्यायोगे विश्वकल्याण साध्य करणे, अशी मांडणी केली होती. आज त्यांचे हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयीचे ५ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सनातन संस्थेद्वारे धर्मसभा, व्याख्याने, दूरचित्रवाहिन्या आणि पत्रकार परिषदा यांद्वारे हिंदु राष्ट्राच्या समर्थनार्थ वैचारिक भूमिका प्रस्तुत केली जाते.

८ अ. यज्ञयाग : हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सनातन संस्थेचा सहभाग मुख्यतः आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी सनातनच्या आश्रमात आतापर्यंत ४५० हून अधिक यज्ञयाग आणि धार्मिक विधी करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने साग्निचित् अश्वमेध महासोमयाग, उच्छिष्ट गणपति यज्ञ, चंडीयाग, धन्वन्तरि याग, संजीवनी होम, पंचमहाभूते याग इत्यादी यज्ञांचा समावेश आहे.

८ आ. हिंदूंच्या सांप्रदायिक ऐक्यासाठी प्रयत्न : प्रतिवर्षी सनातन संस्थेच्या वतीने मे मासात हिंदु एकता यात्रांचे आयोजन केले जाते. यात विविध धार्मिक संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था एकत्रित येऊन हिंदूंच्या सांप्रदायिक ऐक्यासाठी प्रयत्न करतात.

९. सनातन संस्थेला मिळालेला पुरस्कार

सनातन संस्थेने भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या जागतिक प्रसारासाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल नुकतेच, म्हणजे ५ जून २०२४ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना फ्रान्सच्या संसदेमध्ये ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. खरे तर उच्च पातळीचे संत हे पुरस्कार आणि मानसन्मान यांच्या पलीकडे गेलेले असले, तरी त्यांचा झालेला हा सन्मान, म्हणजे त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ केलेल्या दिव्य अध्यात्मकार्याचा सन्मान आहे. हा सन्मान म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्राविषयी केलेले अलौकिक संशोधनकार्य आणि ग्रंथलेखन, तसेच अखिल मानवजातीला शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दिलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग यांचाच आज एक प्रकारे गौरव झाला आहे, असे आम्ही मानतो.’

– (सद्गुरु) नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.