संपादकीय – पर्यावरणप्रेम : हिंदुविरोधी अजेंडा !
गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव, दिवाळी, होळी, रंगपंचमी आदी हिंदूंचे सण आले की, ‘पर्यावरणाचे प्रदूषण’ या शब्दांचा इतका भडीमार केला जातो की, जणू सर्व प्रदूषण हिंदूंच्या सण-उत्सवांमुळेच होते. याचा बागुलबुवा इतका केला जातो की, ‘उत्सवांमुळे प्रदूषण होते’, असे चित्र उभे करण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणजे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र सरकारही ‘पर्यावरणपूरक उत्सव’ ही संकल्पना राबवायला लागले आहे. ‘कोणताही उत्सव किंवा सण हा प्रदूषणविरहित असावा’, याविषयी कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे पर्यावरणपूरक उत्सवाला कुणाचा विरोध असण्याचेही कारण नाही; मात्र पर्यावरणपूरक उत्सवाच्या आडून जेव्हा हिंदूंच्या सणांविरोधी, म्हणजेच हिंदु धर्माच्या विरोधात ‘अजेंडा’ राबवला जात असेल, तर त्याविषयी हिंदूंनी सावधानता बाळगायलाच हवी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्राचा महिमा वर्णन करतांना चंद्रभागा नदीचा उल्लेख आवर्जून केला जातो; परंतु या मंदिराच्या मागे गेल्यावर चंद्रभागा नदी पाहिली, तर तिचे गटाराप्रमाणे झालेले स्वरूप पहावत नाही. चंद्रभागा नदीप्रमाणे आळंदी तीर्थक्षेत्री असलेल्या इंद्रायणी नदीची अवस्थाही अशीच आहे. इंद्रायणी काठी तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आहे. केवळ इंद्रायणी, चंद्रभागा नव्हे, तर महाराष्ट्रातील शेकडो नद्या प्रदूषणाने जर्जर झाल्या आहेत. गणेशोत्सवाच्या वेळी जलप्रदूषणाच्या नावाने बोंबा मारणारे पुरो(अधो)गामी जलप्रदूषण होऊ नये; म्हणून ‘श्री गणेशाची मूर्ती दान करा’, असे म्हणणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले यांना कधी या नद्यांच्या प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवतांना पाहिले आहे का ? याचे कारण स्पष्ट आहे की, ‘पर्यावरणप्रेम’ हा केवळ दिखावा आहे, तर ‘हिंदुविरोध’ हाच अजेंडा आहे. हे तर तथाकथित प्राणीप्रेमींसारखे झाले. भटके कुत्रे, मांजर यांना दगड मारल्यावर यांचे प्राणीप्रेम जागृत होते; मात्र प्रतिदिन शेकडोंच्या संख्येने होणार्या गोहत्यांविषयी ही मंडळी मौन बाळगतात. हिंदूंनी पशूबळी दिला की, ही मंडळी टीका करतात; मात्र ईदच्या दिवशी बकरी कापण्याचा यांना आक्षेप वाटत नाही. आठवड्यातील ५ दिवस मटणावर ताव मारून भूतदयेच्या गोष्टी करणारे आणि हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरण प्रदूषणाची बोंब मारणारे ढोंगी यांमध्ये काहीही भेद नाही.
मागील काही वर्षांपासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील काही नट पर्यावरणप्रेमी असल्याचा आव आणून ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन करतात. सरकार, तसेच सर्वच राजकीय पक्षांद्वारे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन करणे, हे तर आता नित्याचेच झाले आहे; मात्र लाखो बोकड कापून ईद साजरी करणार्यांना ‘ईद पर्यावरणपूरक साजरी करा’, याचा सल्ला ही मंडळी देत नाहीत. हिंदूंना फुकाचा सल्ला देण्यासाठी ही मंडळी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची मोठमोठी विज्ञापने प्रसारित करतात; मात्र ईदच्या दिवशी लाखो प्राण्यांच्या शरिराचे शिल्लक अवशेष इतरत्र टाकले जातात, सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांचे गळे चिरले जातात, त्या वेळी या मंडळींच्या तोंडातून शब्द निघत नाहीत. त्यामुळे हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे आवाहन करून स्वत:ची पर्यावरणप्रेमी प्रतिमा निर्माण करण्यापलीकडे या सेलिब्रेटींचा पर्यावरण, प्रदूषण यांच्याशी काही विशेष संबंध नसतो. त्यांना खरोखरच पर्यावरणाविषयी प्रेम असते, तर वर्षभर कारखान्यांतील रसायनयुक्त द्रव्ये, सांडपाणीयुक्त गटाराचे पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येऊ नये, यासाठी आवाज उठवला असता. तेवढेही शक्य नसेल, तर एखाद्या व्यासपिठावरून हे रोखण्याचे आवाहन केले असते आणि हेही शक्य नसेल, तर किमान याविषयी सरकारला एखादे पत्र तरी लिहिले असते. यांतील काही एक करायचे नाही; मात्र हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणप्रेमी असल्याचा बनाव करायचा, हेच या मंडळींचे धंदे आहेत. वर्षभर प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न न करणारी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांसारखी बोगस मंडळी या सेलिब्रेटींचा केवळ स्वत:चा हिंदुविरोधी अजेंडा राबवण्यासाठी उपयोग करून घेत आहेत.
प्रशासनाचा हिंदुविरोधी काँग्रेसी अजेंडा !
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रतिवर्षी गणेशोत्सव आणि दिवाळी या सणांच्या वेळी राज्यातील विविध भागांमध्ये ध्वनीचे मोजमाप करते. प्रतिवर्षीच्या वार्षिक कार्य अहवालामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ ध्वनीप्रदूषणाची ही आकडेवारी प्रसिद्ध करते. मागील अनेक वर्षांपासून राज्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे हे उद्योग चालू आहेत; मात्र इतक्या वर्षांत मशिदींवरील भोंग्यांच्या ध्वनीचे मोजमाप करण्याचे धारिष्ट्य या मंडळाने कधीही दाखवलेले नाही. मुंबई उच्च न्यायालयात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात कितीतरी याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक याचिकेच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने वेळोवेळी पोलिसांना फटकारले आहे. हिंदूंच्या उत्सवाच्या वेळी स्वयंस्फूर्तीने ध्वनीचे मोजमाप करणारे हे मंडळ उच्च न्यायालयाने कितीदा फटकारूनही मशिदींवरील भोंग्यांचे प्रत्यक्ष ध्वनीचे मोजमाप करत नाही आणि त्याविषयी अहवालामध्येही नमूद करत नाही. हा आहे प्रशासनामधून चालवला जाणारा हिंदुविरोधी काँग्रेसी अजेंडा ! दुर्दैवाने ‘राज्यात हिंदुत्वनिष्ठ म्हणणार्यांची सत्ता आल्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच ध्वनीचे मोजमाप का करते ?’, असा प्रश्न त्यांना विचारला गेलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे हिंदूंच्या सणांना प्रदूषणकारी दाखवण्याचा अजेंडा अद्यापही चालूच आहे. सध्या चालू असलेला पर्यावरणपूरक उत्सवाचा अजेंडा, हाही त्याचाच एक भाग आहे.
याचा अर्थ असा नव्हे की, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन करू नये किंवा त्याला हिंदूंनी विरोध करावा. उलट हिंदूंचे सर्वच उत्सव पर्यावरणपूरकच आहेत; परंतु जे हिंदू सण-उत्सवांच्या माध्यमातून पर्यावरणाचा र्हास करत असतील, तर त्यांच्यावर शासन आणि प्रशासन म्हणून कारवाई व्हायलाच हवी; परंतु ‘हिंदूंच्या सणांच्या वेळीच प्रदूषण होते’, असे चित्र उभे करून ज्या प्रकारे हिंदूंची अपकीर्ती करण्याचा उद्योग चालू आहे, तो आम्हाला मान्य नाही, म्हणजे वर्षभर होणार्या ९८ टक्के प्रदूषणाविषयी ना सरकारने कारवाई करायची, ना प्रशासनाने कारवाई करायची ! त्या प्रदूषणाविषयी जनजागृती करायची नाही. सेलिब्रेटींनी दुर्लक्ष करायचे आणि स्वत:ला विवेकी, बुद्धीजीवी समजणार्या अंनिस अन् अन्य पुरोगामी यांच्याविषयी तर काय बोलायची सोयच नाही; मात्र हिंदूंचे सण आले की, ‘पावसाळ्यात बाहेर पडून ‘डराव डराव’ करणार्या बेडकांप्रमाणे हिंदूंच्या सणांना प्रदूषणकारी ठरवावे’, हा काँग्रेसी खोट्या कथानकरूपी अजेंडा हिंदुत्वनिष्ठ पक्ष आणि हिदूंनी मोडीत काढावा अन् खर्या अर्थाने जे प्रदूषण करतात, त्यांना वठणीवर आणावे.
कारखान्यांमुळे होणार्या प्रदूषणाविषयी काही न बोलणारे केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांविषयी दिंडोरा पिटतात, हा ढोंगीपणा लक्षात घ्या ! |