BNP’s Mirza Islam Alamgir : (म्‍हणे) ‘हिंदूंवरील आक्रमणांचे अहवाल चुकीचे !’ – बांगलादेशातील विरोधी पक्ष

भारताने शेख हसीना यांना बांगलादेशाच्‍या कह्यात दिले नाही, तर द्विपक्षीय संबंध बिघडतील, असेही वक्‍तव्‍य !

बांगलादेश नॅशनलिस्‍ट पक्षाचे सरचिटणीस मिर्जा फखरुल इस्‍लाम आलमगीर

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांकांची सुरक्षा हा बांगलादेशाचा अंतर्गत विषय आहे. हिंदूंवरील आक्रमणांचे अहवाल चुकीचे आहेत; कारण बहुतांश घटना या राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असे धादांत खोटे वक्‍तव्‍य बांगलादेश नॅशनलिस्‍ट पक्षाचे सरचिटणीस मिर्जा फखरुल इस्‍लाम आलमगीर यांनी केले. ते पुढे म्‍हणाले की, भारत-बांगलादेश संबंधात नवीन अध्‍याय चालू करण्‍यासाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रत्‍यर्पण आवश्‍यक आहे. असे झाल्‍यास बांगलादेशातील जनतेच्‍या भावनांचा सम्‍मान होईल. (हिंदूंच्‍या धार्मिक भावनांचे काय, याविषयी आलमगीर काहीच का बोलत नाहीत ? – संपादक) हसीना भारतात राहिल्‍या, तर दोन्‍ही देशांचे द्विपक्षीय संबंध बिघडू शकतात.

१. आलमगीर यांनी दावा केला की, आमचा पक्ष सत्तेवर आल्‍यानंतर अवामी लीग सरकारच्‍या काळातील वादग्रस्‍त अदानी वीज कराराची चौकशी केली जाईल; कारण यामुळे बांगलादेशाच्‍या लोकांची हानी होत आहे.

२. ते म्‍हणाले की, आमचा पक्ष भूतकाळातील मतभेद विसरून सहकार्य करण्‍यास सिद्ध आहे. बांगलादेशाच्‍या भूमीवरून भारताच्‍या सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशा कुठल्‍याही गोष्‍टीला आम्‍ही अनुमती देणार नाही.

संपादकीय भूमिका

मुसलमान देश असलेल्‍या बांगलादेशाकडून अशा प्रकारे डोळ्‍यांत धूळफेक केली जाणे, यात काय आश्‍चर्य ! काहीही झाले, तरी बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण हे भारतासाठी प्रथम प्राधान्‍य असावे, असेच भारतीय हिंदूंना वाटते !