भेटला मज ऐसा कृपावंत ।
‘भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यावर माझे मन उचंबळून आले. ‘काय करावे ? कृतज्ञता कशी व्यक्त करावी ?’, हे मला कळत नव्हते. तेव्हा भगवंताने पुढील काव्यपुष्प सुचवले. ते गुरुचरणी अर्पितो.’
अमोघ लीला करी भगवंत ।
भेटला मज ऐसा कृपावंत ।। १ ।।
नव्हते स्थैर्य मम चित्ती ।
तडफडे जीव दारा वित्ती ।। २ ।।
बहू यत्न सुख शोधाया प्रपंची ।
परि न मिळे वाट शांतीची ।। ३ ।।
जाणोनी मनोरथ मज पामराचे ।
द्रवले चित्त करुणाकराचे ।। ४ ।।
उभा ठाकला मजपुढती दयाघन ।
हरल्या क्लेश चिंता तत्क्षण ।। ५ ।।
विश्वास न बसे मम नेत्रीं ।
कैसी वर्णू चिद्घन मूर्ती ।। ६ ।।
गगनी मावेना आनंद माझा ।
मनी म्हणे तूच सखा माझा ।। ७ ।।
अनंता घालीतो साद तव चरणी ।
उरावे समाधान अंतःकरणी ।। ८ ।।
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |