रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिका कु. मेघा चव्हाण यांना आजारपणात झालेले त्रास 

१. सर्दी आणि ताप आल्यावर पायासमवेत कंबरेचे दुखणे चालू होणे, अस्थीरोगतज्ञांनी विविध चाचण्या करण्यास सांगणे, त्यामध्ये पायाच्या रक्तवाहिनीचा आकार मोठा झाला असून रक्तवाहिनीमध्ये अडथळे असल्याचे लक्षात येणे 

कु. मेघा चव्हाण

‘वर्ष २०२१ मध्ये मला कंबरदुखी आणि सायटिकाचा (‘कमरेपासून तळपायापर्यंत पसरणार्‍या वेदना’) त्रास चालू झाला. वर्षभर उपचार केल्यानंतर माझा त्रास उणावला. ३०.११.२०२३ या दिवशी मला सर्दी, खोकला आणि ताप आला. तेव्हा पायाच्या समवेत कमरेचे दुखणे पुन्हा चालू झाले. त्यामुळे मी अस्थीरोगतज्ञांना दाखवले. त्यांनी औषधे दिली आणि पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले. औषधांच्या समवेत मी तेलाने मर्दन करण्याचा आयुर्वेदिक उपचारही करत होते. मर्दन करतांना गुडघ्याखाली गाठीसारखा घट्टपणा जाणवला; म्हणून मी अस्थीरोगतज्ञांना दाखवले. त्यांनी ‘अल्ट्रासाऊंड’ चाचणी (शरिराच्या आतील इंद्रियांची तपासणी करणे) करण्यास सांगितले. त्या चाचणीच्या अहवालात ‘माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्यापासून पिंढरीपर्यंत रक्तवाहिनीचा आकार मोठा झाला आहे’, असे निदर्शनास आले. त्यानंतर मला ‘डॉपलर’ चाचणी (या चाचणीमध्ये रक्तप्रवाहाचे मापन केले जाते. ही तपासणी विशेषतः रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे निदान आणि नियंत्रण करण्यासाठी वापरली जाते.) करण्यास सांगितले. त्याच्या अहवालानुसार आधुनिक वैद्यांनी सांगितले की, रक्तवाहिनी मोठी झाली आहे आणि रक्तवाहिनीमध्ये अडथळे दिसत आहेत. हा ‘वेरीकोज व्हेन्स्’ या आजाराचा आरंभ आहे.

२. जोरात शिंका आल्याने कंबरदुखी वाढणे, सद्गुरु गाडगीळकाका यांनी नामजपादी उपाय केल्याने वेदना ५० टक्के उणावणे आणि हालचाल करणे शक्य होणे

२५.१२.२०२३ या दिवशी पहाटे जोरात शिंका आल्याने माझी कंबरदुखी वाढली. मी १ घंटा नेहमीचे नामजपादी उपाय केले; परंतु वेदना अधिक असल्याने मला जागचे हलता येत नव्हते. त्यामुळे मी सद्गुरु गाडगीळकाका यांना यासंदर्भात कळवले. सद्गुरु काकांनी स्वतः माझ्यासाठी २० मिनिटे नामजपादी उपाय केले आणि ‘मला बरे वाटते का’, असे विचारले. त्या वेळी माझ्या वेदना ५० टक्के न्यून झाल्या होत्या आणि मी थोडी हालचाल करू शकत होते. मी उठून चालू लागल्यावर वेदना वाढल्याने मी पुन्हा सद्गुरु काकांना सांगितले. सद्गुरु काकांनी पुन्हा मला बरे वाटेपर्यंत नामजपादी उपाय केले. उपायांमुळे मला हालचाल करणे शक्य झाले; पण कंबर आणि डावा पाय यांमध्ये कमरेपासून तळपायापर्यंत वेदना होत होत्या. आयुर्वेदिक उपचार चालू असल्याने मी वैद्यांना संपर्क केल्यावर त्यांनी वेदनाशामक गोळी घेऊन विश्रांती घेण्यास सांगितले.

३. आश्रमातील आधुनिक वैद्यांना दाखवल्यावर त्यांनी ‘एम्.आर्.आय्.’ चाचणी करण्यास सांगणे, या चाचणीमध्ये ‘डाव्या बाजूची पायाकडे जाणारी नस दबली गेल्याचे लक्षात येणे, हा अहवाल मडगाव येथील ‘न्यूरो आणि स्पायनल सर्जन’ यांना दाखवल्यावर त्यांनी शस्त्रकर्म करावे लागेल, असे सांगणे

त्यानंतर मी आश्रमातील आधुनिक वैद्य पांडुरंग मराठेकाका आणि आधुनिक वैद्या रूपाली भाटकार यांना माझे आजार दाखवले. आधुनिक वैद्या रूपाली भाटकार यांनी माझी तपासणी केली आणि त्याच दिवशी ‘एम्.आर्.आय्.’ (Magnetic Resonance Imaging – हे रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान आहे.) चाचणी करण्यास सांगितले. तसेच कमरेसाठी पट्टा आणि चालतांना ‘वॉकर’ घेण्यास सांगून पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले. त्याच दिवशी मी ‘एम्.आर्.आय्.’चाचणी करून घेतली. या चाचणीत माझ्या कमरेच्या ४ थ्या आणि ५ व्या मणक्यातील चकती (डिस्क) फुटून त्यातील भाग डाव्या बाजूला बाहेर खालपर्यंत आला असल्याने ‘स्पायनल नर्व्ह कॉर्ड’ आणि ‘डाव्या बाजूची पायाकडे जाणारी नस’ दबली गेली आहे’, असे निदान झाले. आधुनिक वैद्यांनी मला दुसर्‍या दिवशी मडगाव येथील ‘न्यूरो आणि स्पायनल सर्जन’ यांना अहवाल दाखवून येण्यास सांगितले. अहवाल पाहून त्यांनी ‘‘शस्त्रकर्म करावे लागेल’’, असे सांगितले. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी ‘अजून एका तज्ञांचे मत घेऊया’, असे सांगितले. त्यानुसार तज्ञ डॉक्टरांना भेटल्यानंतर त्यांनी औषधे बदलून दिली आणि ८ दिवसांत वेदना न्यून झाल्या नाहीत, तर शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगितले.

४. कुटुंबियांच्या मतानुसार कोल्हापूर येथील वैद्यांकडून १ मास आयुर्वेदिक उपचार घेतल्यानंतर पाय आणि कंबर यांमधील वेदना उणावणे 

८ दिवसांत नामजपादी उपाय आणि औषधे यांमुळे दुखण्याची तीव्रता न्यून झाली. त्यामुळे कुटुंबियांच्या मतानुसार ‘कोल्हापूर येथील वैद्यांकडून आयुर्वेदिक उपचार घेऊया’, असे ठरले. १ मास आयुर्वेदिक उपचार घेतल्यानंतर माझा त्रास ५० – ६० टक्के उणावला आणि मला अर्धा घंटा बसता येऊ लागले. त्यानंतर वैद्यांनी १ आठवडा उपचार थांबवून ‘या कालावधीत अजून काय फरक पडतो, त्यानुसार पुढील उपचार करू’, असे सांगितले. या कालावधीत कंबर आणि पाय यांना तेलाने मालीश करणे, शेकणे आणि औषधे चालू होती. त्यामुळे मला १ घंटा बसता येऊ लागले.

५. वेदना वाढल्याने आयुर्वेदिक वैद्यांनी पुन्हा ‘एम्.आर्.आय्.’ चाचणी करण्यास सांगणे, दोन्ही चाचण्यांमधील अहवाल सारखाच असल्याने कोल्हापूर येथील ‘न्यूरो सर्जन’ यांनी शस्त्रकर्म करण्यास सांगणे 

१ मासानंतर मला पुन्हा डावा पाय आणि कंबर यांमध्ये वेदना चालू झाल्या. त्यामुळे वैद्यांनी पुन्हा ‘एम्.आर्.आय्.’ चाचणी करण्यास सांगितले. त्यानुसार पुन्हा ‘एम्.आर्.आय्.’ चाचणी केली. दोन्ही चाचणींतील अहवाल सारखाच होता. त्यामुळे आम्ही कोल्हापूर येथील ‘न्यूरो सर्जन’ यांना अहवाल दाखवला. अहवाल पाहून त्यांनी ‘‘शस्त्रकर्म करावे लागेल’’, असे सांगितले.

६. गोवा येथील रुग्णालयात शस्त्रकर्म व्यवस्थितपणे पार पडणे

आम्ही गोवा येथे शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मला आश्रमात येता आले. गोवा येथील रुग्णालयात माझे शस्त्रकर्म व्यवस्थितपणे पार पडले. शस्त्रकर्म झाल्यावर थोड्या वेळाने मला जोरात शिंका येऊ लागल्या. सलग ७ – ८ वेळा शिंका आल्यावर, ‘नुकतीच शस्त्रक्रिया झाली असल्याने शिंकांमुळे हादरे बसून पुन्हा काही गुंतागुंत व्हायला नको’, यासाठी मी आधुनिक वैद्य आणि सद्गुरु गाडगीळकाका यांना लगेच कळवले. त्यानंतर मला पुन्हा त्रास झाला नाही. दुसर्‍या दिवशी सायंकाळी मला उभे रहाता येते का ? चालता येते का ? ते पाहून रुग्णालयातून सोडण्यात आले.’

– कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.४.२०२४)