५१ टक्के आध्यात्मिक पातळीची इचलकरंजी, कोल्हापूर कु. प्रार्थना डाके (वय १५ वर्षे) हिने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना पाठवलेले भावपूर्ण पत्र !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नमस्कार परम पूज्य डॉक्टर,

मी प्रार्थना ! मी तुम्हाला मागील वेळीही पत्र लिहिले होते. मागील २ पत्रांमध्ये मी तुम्हाला मला पडलेले प्रश्नच विचारत राहिले आणि मी माझ्याविषयी सर्व सांगत बसले. तुम्ही माझे पत्र वाचल्याबद्दल कृतज्ञता ! खरंतर आज मी हे पत्र तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लिहित आहे. मला आजपर्यंत तुम्ही सर्वकाही दिले आणि माझ्या पाठीशी राहिलात, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे स्वतःवर लक्ष आहे’, याची जाणीव होऊन भाव जागृत होणे 

कु. प्रार्थना डाके

मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते की, मला तुमच्यासारखे गुरु लाभले. तुम्ही माझी पुष्कळ काळजी घेता. मी जरी तुम्हाला विसरले, तरी तुमचे कृपाशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतात. तुमचे लक्ष सतत माझ्यावर असते. मागील आठवड्यात शरण्याताईंचा (साधिका सौ. शरण्या पोयेकर यांचा) भ्रमणभाष आला होता. त्या म्हणाल्या, ‘‘रामनाथी आश्रमातून निरोप आला आहे, ‘सर्व बालसाधकांचा वर्षभरातील साधनेचा आढावा पाठवायचा आहे आणि सोबत छायाचित्रही पाठवायचे आहे.’’ त्या वेळी मला असे जाणवले, ‘तुमचे माझ्यावर लक्ष आहे. मी जरी साधनेत न्यून पडत असले, तरी तुम्ही मला विसरला नाहीत.’ या विचाराने माझी भावजागृती झाली. ‘मी साधनेत न्यून पडते’, याची मला खंत वाटते; पण मी आता अधिकाधिक साधना करण्याचा प्रयत्न करीन.

२. ब्रह्मोत्सव सोहळ्याला येता न आल्याने वाईट वाटणे आणि ‘एकदा तरी गुरुदर्शन व्हावे’, अशी ओढ वाटणे 

वर्ष २०२३ मध्ये ब्रह्मोत्सव सोहळा झाला. त्या सोहळ्यात तुम्ही सनातनच्या अनेक साधकांना दर्शन दिले; पण त्या वेळी माझी प्रकृती ठीक नसल्याने मला त्या सोहळ्याला येता आले नाही. ‘तुम्हाला भेटायला मिळणार नाही; म्हणून मला पुष्कळ रडू आले. माझी तुम्हाला भेटण्याची पुष्कळ इच्छा आहे. मला माझ्या गुरूंचे एकदा तरी दर्शन घ्यायचे आहे.

३. घरातील सर्वांना रामनाथी (गोवा) येथील आश्रमात घेऊन जाण्याची इच्छा गुरुमाऊलीने पूर्ण केल्याने पुष्कळ आनंद होणे

मी मागच्या पत्रात म्हणाले होते, ‘एकदा मला माझ्या घरातील सर्वांना घेऊन रामनाथी (गोवा) येथील आश्रमात यायचे आहे. त्या वेळी मला असे वाटले होते, ‘घरातील कुणी येणार नाही, तर मला आणि आईला तरी आश्रमात बोलवा’; पण घरातील सर्वांना आश्रम बघायला बोलावले आणि माझी इच्छा पूर्ण केली. ‘घरातील सर्वजण आश्रम बघण्यासाठी येतील’, असे मला वाटले नव्हते. ते आल्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला.

४. आश्रमात पुष्कळ सात्त्विकता आणि चैतन्य अनुभवायला मिळणे अन् साधकांनी सर्वांचे आदरातिथ्यही छान करणे

‘माझी प्रकृती बरी नसल्याने आश्रम बघतांना त्रास होईल’, असे मला वाटत होते; पण साधिकेने आश्रम दाखवण्यास आरंभ केला आणि मी माझा त्रास विसरूनच गेले. तेथे मला पुष्कळ सात्त्विकता आणि चैतन्य अनुभवायला मिळाले. साधकांनी आम्हा सर्वांचे आदरातिथ्यही छान केले. घरातल्या सर्वांना आश्रम बघून छान वाटले. तुमच्या कृपेने आम्हाला महाप्रसादही मिळाला. परम पूज्य डॉक्टर, तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

५. अनुभूती 

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या छायाचित्रात त्यांच्या कंठावर ‘ॐ’ चा आकार उमटणे : आम्ही गोव्याहून घरी इचलकरंजीला परत आलो. त्या वेळी देवघरात असलेल्या तुमच्या छायाचित्राकडे घरच्यांचे लक्ष गेले, तर छायाचित्रातील तुमच्या कंठावर ‘ॐ’ सारखा आकार उमटला होता. या अनुभूतीमुळे घरच्यांनाही छान वाटले.

परम पूज्य डॉक्टर, तुमच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

– कु. प्रार्थना अजित डाके (वय १५ वर्षे), इचलकरंजी, कोल्हापूर. (२५.७.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक