श्री. देवदत्त कुलकर्णी (वय ८२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेला भाव आणि श्रद्धा
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करणारे श्री. देवदत्त कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांचा आज श्रावण कृष्ण त्रयोदशी (३१.८.२०२४) या दिवशी ८२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी कु. तृप्ती कुलकर्णी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. देवदत्त कुलकर्णी यांना ८२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
एकदा प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘‘बाबांना सांग, ‘तुझी काळजी करू नका. त्यांची कौतुकाची गोष्ट म्हणजे तुला लहानपणापासून तीव्र शारीरिक त्रास आणि गेली २० वर्षे तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. असे असूनही त्यांनी मला कधीही एका शब्दानेही ‘तृप्तीचे कसे होणार ?’, असे विचारले नाही. त्यांची चांगली आध्यात्मिक प्रगती होत आहे. ते पुढे चालले आहेत.’’
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.८.२०२४) |
१. परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून नोकरी सोडणे आणि पूर्णवेळ साधना करू लागणे
‘बाबांनी (श्री. देवदत्त कुलकर्णी यांनी) साधनेला आरंभ केल्यावर पूर्णवेळ साधना आणि सेवा करता येण्यासाठी वर्ष २००० मध्ये नोकरी सोडली. तेव्हा माझे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते. मी साधना करत नव्हते. तेव्हा मी बाबांना काळजीच्या सुरात विचारले, ‘‘बाबा, तुम्ही नोकरी सोडली. आता आपले कसे होणार ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तू काही काळजी करू नकोस. प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) आपल्या पाठीशी आहेत. ते आपल्याला काही न्यून पडू देणार नाहीत.’’ खरेतर त्या काळात संस्थेचे कार्य चालू होऊन काही वर्षेच झाली होती. त्यामुळे कार्याचा विस्तार झाला नव्हता. बाबा प.पू. डॉक्टरांकडे मानसशास्त्रीय उपचारांसाठी जात असल्याने त्या दोघांमध्ये ‘आधुनिक वैद्य आणि रुग्ण’, (पेशंट) असे नाते होते. त्यामुळे बाबांचा प.पू. डॉक्टरांकडे ‘संत’ म्हणून बघण्याचा तेवढा दृष्टीकोनही नव्हता आणि ‘संतांशी कसे वागावे ? कसे बोलावे ?’, हेही त्यांना ज्ञात नव्हते. अशी एकंदर परिस्थिती असूनही बाबांनी केवळ प.पू. डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून नोकरी सोडली आणि ते पूर्णवेळ साधना करू लागले.
२. ‘गुरु, हेच देव आहेत’, असा भाव असणे
एकदा प.पू. डॉक्टरांनी बाबांना विचारले, ‘‘तुमच्यानंतर तृप्तीचे कसे होणार ?’, याची तुम्हाला काळजी नाही ना वाटत ?’’ तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, ‘‘काळजी वाटत नाही; कारण आपण तिचे रक्षण करणारे आहात आणि ‘देव तारी त्याला कोण मारी ?’, हे माझ्या लक्षात आले आहे.’’ त्यानंतर १ – २ दिवसांनी बाबा मला म्हणाले, ‘‘मी त्या दिवशी बोलण्यात चूक केली. ‘देव तारी..’ याऐवजी ‘गुरु तारी त्याला कोण मारी ?’, असे म्हणायला हवे होते.’’
श्री. देवदत्त कुलकर्णी यांच्यात जाणवलेले पालट
१. स्थुलातील पालट
अ. बाबांचा स्वभाव अतिशय शांत झाला आहे. त्यांच्या सहवासात आनंद जाणवतो.
आ. बाबांची ऐकण्याची, स्वीकारण्याची आणि इतरांना समजून घेण्याची वृत्ती वाढली आहे.
इ. या वयातही ते व्यष्टी साधनेचे प्रयत्न चिकाटीने आणि नियमितपणे करतात अन् त्यांचा प्रतिदिन आढावासेविकेला आढावाही देतात.
ई. या वयातही ते स्वतःची कामे स्वतःच करतात.
उ. बाबांनी त्यांच्या मृत्यूनंतर मी करायची अधिकोषाची कामे, मी कसे वागायचे ? इत्यादींविषयी अतिशय स्थिर राहून मला सांगितले आहे. त्यात कुठेही भावनेचा लवलेश नव्हता.
ऊ. बाबा सगळ्यांमध्ये मिळून-मिसळून रहातात. त्यांचे साधकांप्रती प्रेम वाढले आहे. त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतूनही ते व्यक्त होते.
२. आध्यात्मिक पालट
अ. बाबांची त्वचा मऊ झाली आहे.
आ. बाबांच्या त्वचेचा रंग उजळला आहे.
इ. बाबांच्या चेहर्यावर तेज आले आहे.
ई. बाबांच्या डोळ्यांत शक्ती जाणवते.
उ. बाबांच्या वाणीला सुगंध येत असल्याचे एकदा प.पू. डॉक्टरांनी सांगितले होते.
ऊ. बाबांच्या कृतज्ञताभावात वाढ झाली आहे.
प.पू. डॉक्टर, बाबांचा मनोरुग्ण ते ६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठेपर्यंतचा साधनाप्रवास होण्यात त्यांचे क्रियमाण काहीच नसून तुमची प्रीती, कृपा आणि संकल्प यांचे १०० टक्के योगदान आहे. दगडातून मूर्ती घडवणारे तुम्ही आध्यात्मिक शिल्पकार आहात. तुमच्या कृपविना बाबांचा हा प्रवास घडणे स्वप्नातही अशक्यच होते. इथूनपुढची त्यांची आध्यात्मिक प्रगती तुमच्याच कृपेने वेगाने होत राहो’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना !’
– कु. तृप्ती कुलकर्णी (श्री. देवदत्त कुलकर्णी यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.८.२०२४)
अनासक्त आणि सेवेची तळमळ असलेले श्री. देवदत्त कुलकर्णी !
१. ‘श्री. देवदत्त कुलकर्णीकाका यांचे राहणीमान आणि सेवा यांमध्ये पुष्कळ व्यवस्थितपणा अन् नीटनेटकेपणा असतो.
२. वेळेचे पालन करणे
काका वेळच्या वेळी स्वयंसूचनांची सत्रे करतात, तसेच ते नामजपादी उपाय नियमितपणे करतात. ते २५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करतात. काका औषधे नियमित घेतात. त्यांना कशाचीच आठवण करून द्यावी लागत नाही.
३. विचारण्याची वृत्ती
काका नेहमी विचारून सेवा करतात. त्यांच्या वैयक्तिक अडचणीही ते इतरांना किंवा मुलगी कु. तृप्ती हिला विचारून सोडवतात आणि त्यांनी सांगितलेले सहजतेने स्वीकारतात.
४. प्रसाद भांडारामध्ये ‘प्रसादाच्या पाकिटांमध्ये खाऊ भरणे, त्यांचे ‘सीलिंग’ करणे’, हे सर्व काका एकाग्रतेने आणि अचूक करतात.
५. सेवा न झाल्यास त्याविषयी खंत वाटणे
काकांना कधीतरी बरे वाटत नसल्याने त्यांच्याकडून सेवा झाली नाही, तर त्याविषयी त्यांना पुष्कळ खंत वाटते. ज्या दिवशी त्यांची प्रकृती ठीक नसेल, त्या दिवशी काका आम्हाला म्हणतात, ‘‘मला सांभाळून घ्या. मी सेवा करू शकत नाही. मला क्षमा करा.’’
६. इतरांचा विचार करणे
काका स्वतःची काळजी स्वतः घेतात. ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, तसेच इतरांचा वेळ वाया जाऊ नये’, याविषयी ते नेहमी दक्ष असतात.
७. मायेविषयी आसक्ती नसणे
काका त्यांच्या नातेवाइकांविषयी कधीच अनावश्यक बोलत नाहीत. त्यांच्याशी काकांचा आवश्यक तेवढाच संपर्क असतो. काका नातेवाइकांविषयी बोलतांना म्हणतात, ‘‘देवाने मला मायेतून किती अलगदपणे बाहेर काढले आहे !’’ त्यांच्या या बोलण्यातून त्यांचा कृतज्ञताभाव व्यक्त होतो.
८. श्रद्धा
अनेकदा काका म्हणतात, ‘‘सनातनच्या आश्रमात असल्यामुळे मला माझी आणि माझ्या मुलीची काळजी वाटत नाही.’’
‘प.पू. गुरुदेवा, ‘काकांप्रमाणे आम्हालाही आश्रमजीवनाशी एकरूप होता येऊ देत. आम्हाला आनंदी आणि कृतज्ञताभावात रहाता येऊ देत’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. अनुराधा निकम (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६५ वर्षे), फोंडा, गोवा. (२५.८.२०२४)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |