उड्डाणपुलावरून १० सप्टेंबरपूर्वी एकेरी वाहतूक चालू न केल्यास रेल्वेचे कामकाज बंद पाडणार ! – नितीन शिंदे, माजी आमदार
सांगली येथील रेल्वे उड्डाणपुलाचे रखडलेले काम त्वरित होण्यासाठी ‘चाबूक फोड आंदोलन’ !
सांगली, ३० ऑगस्ट (वार्ता.) – येथील चिंतामणीनगरमधील रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करून ‘या पुलावरून एकेरी वाहतूक चालू करावी’, या मागणीसाठी सांगली पंचक्रोशीतील सर्व नागरिक आणि व्यापारी यांच्या वतीने ३० ऑगस्ट या दिवशी येथील रेल्वेस्थानकावर ‘चाबूक फोड आंदोलन’ करण्यात आले. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार नितीन शिंदे यांनी हातात चाबूक घेऊन १० सप्टेंबरपूर्वी उड्डाणपुलावरून ‘एकेरी वाहतूक’ चालू न केल्यास रेल्वे विभागाचे कामकाज बंद पाडण्यात येईल, अशी चेतावणी दिली.
उड्डाणपुलाचे काम करणार्या ठेकेदाराला ३ वेळा मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होत नाही. त्यामुळे ‘चाबूक फोड आंदोलन’ करण्यात आले. या वेळी उड्डाणपुलापासून ते मार्केट यार्ड रेल्वेस्थानकापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
नितीन शिंदे म्हणाले की, व्यापार्यांना दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. एकेरी वाहतूक चालू करण्याविषयी रेल्वे प्रशासनाने लेखी आणि तोंडी शब्द दिला आहे. हा शब्द त्यांनी पूर्ण केला नाही, तर आज माझ्या हातातील चाबूक त्या वेळी तुमच्या पाठीवर ओढल्याविना मी स्वस्थ बसणार नाही.
पुलाच्या बांधकामासाठी अल्प पडलेला निधी सांगलीचे पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांनी उपलब्ध करून द्यावा. या सर्वांनी यामध्ये लक्ष घालावे. हे काम वेळेत पूर्ण न केल्यास झालेली कोट्यवधी रुपयांची हानी वसूल करण्यासाठी ठेकेदार आणि रेल्वे प्रशासन यांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करू.
या वेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पै. पृथ्वीराज पवार, माधवनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप बोथरा, संचालक योगेश देसाई, उमेश विचारे, श्रीरामनिवासी बजाज, रमेश बंग, माधवनगर भाजपाध्यक्ष मनजित पाटील, माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाटील, शिवसेना उबाठा गटाचे सांगली जिल्हा संघटक बजरंग पाटील, सांगली ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र बोळाज, बाळासाहेब कलशेट्टी, गणपति पेठ व्यापारी असोसिएशनचे समीर शहा, भाजपचे मंडल अध्यक्ष नीलेश हिंगमिरे आदि आंदोलनात सहभागी झाले होते.