मनाचा मळ नाहीसा करणे हेच सर्वोत्तम स्नान !
आज ३१ ऑगस्ट या दिवशी स्वामी वरदानंद भारती यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
प्रश्न : स्नानं च किं परं प्रोक्तम् ?
अर्थ : सगळ्यांत उत्तम स्नान कोणते ?
उत्तर : स्नानं मनोमलत्यागः।
अर्थ : मनाचा मळ नाहीसा करणे, हेच सर्वोत्तम स्नान होय.
स्वतंत्र-प्रशस्त-सुंदर स्नानगृह, थंड आणि उष्ण पाण्याचे नळ, वरून पाण्याचे कारंजे सोडणारी तोटी, स्वच्छ चकचकीत मोठे अवगाहन पात्र (टब), सुगंधी साबण, पुष्कळ पाणी, अशी सर्व सोय, म्हणजे चांगले स्नान होते, असे उत्तर आपण देऊ.
१. मनोमळ त्याग हेच श्रेष्ठ स्नान !
काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर, असे रजोगुण-तमोगुणातून उत्पन्न होणारे जे दोष त्यांनाच आपल्या शास्त्रात ‘मनाचे दोष’ म्हटले आहे. या दोषामुळे मलिन झालेले मन अस्वास्थ्याने पीडित आणि दु:खी होते. त्यामुळे माणसाचे जीवन कष्टी होते. कामक्रोधादींना ‘मळ’ म्हटले आहे, यावरून ते बाहेरून येऊन मनाला चिकटले आहेत. ‘ते असणे, हे मनाचे स्वरूप नाही, तो मनाचा स्वभाव नाही’, हे लक्षात घेतले पाहिजे. शरिराला लागलेला मळ काढणे, हे त्या मानाने सोपे आहे. मनाला लागलेला मळ नाहीसा करणे, हे अवघड असल्याने त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न अधिक दक्षतेने करावे लागतात. म्हणून स्नानाचे सामान्य प्रयोजन लक्षात घेऊन मनोमळ त्यागाला श्रेष्ठ स्नान म्हटले आहे.
२. बुद्धीवाद्यांनी केलेला अपप्रचार
अलीकडच्या बुद्धीवादाने; मात्र ‘कामक्रोधादी हे आमचे शत्रू नसून मित्र आहेत. त्यांचा मळ म्हणून त्याग करणे, हे सर्वस्वी चुकीचे आहे. कामाने आमचे वंशसातत्य राखले आहे. क्रोधाने दुष्टांच्या मनात धाक निर्माण केला आहे. लोभाने आमचे ऐश्वर्य वाढवले आहे. मोहाने आम्हाला काम करण्याचा उत्साह दिला आहे. मदाने आमचा स्वाभिमान टिकवला आहे. मत्सराने आमची महत्त्वाकांक्षा जागृत केली आहे’, इत्यादी म्हटले आहे. पाठ्यपुस्तकात त्याचा समावेशही एकेकाळी केलेला होता. यामुळे आपल्या परंपरेला दोष देण्याचे एक साधन सुधारक म्हणवणार्यांना सापडले. जे स्वतःला इहवादी म्हणवतात, त्यांच्या हातात संस्कृतीवर आघात करण्यासाठी या विचारांचे मोठे हत्यारच सापडल्यासारखे झाले आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ‘यक्षप्रश्न’ या ग्रंथातून)