घरपोच अन्नपदार्थ मागवण्याची सोय म्हणजे समाजात निर्माण झालेले व्यसनच !
‘परत परत केलेली कृती आणि अनुभव यांतून सवयी निर्माण होतात. या सवयी विशिष्ट संकेत निर्माण करून त्याविषयी प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करतात आणि त्यातून काही लाभ किंवा सोय होत असेल, तर ती सवय निर्माण होण्यास अजून बळ प्राप्त होते. काळाच्या बरोबर विशिष्ट संकेत, नेहमीचा व्यवहार आणि होणारा लाभ किंवा सोय यांमुळे आपल्या नेहमीच्या जीवनात ती सवय प्रबळ होते. ‘झोमॅटो’ हे आस्थापन अशी सवय माणसामध्ये निर्माण झाल्याचा लाभ घेऊन ग्राहकांना लक्ष्य करून सूचना पाठवते. (‘झोमॅटो’ हे ग्राहकांना त्यांनी मागणी केलेल्या उपाहारगृहातून अन्नपदार्थ घरपोच पुरवणारे आस्थापन आहे.) ग्राहकांना त्यामध्ये गुंतवून ठेवणे आणि त्यांना मध्यवर्ती ठेवून सेवा देणे, या माध्यमातून पारंपरिक अन्नपदार्थांच्या विक्रीपेक्षा २०० टक्के अधिक दराने अन्नपदार्थांची विक्री करते. यासाठी इ-मेलद्वारे मोहीम राबवणे, सामाजिक माध्यमांचा वापर करणे या विक्री वाढवण्याच्या कौशल्यामुळे त्यांनी या व्यवसायाशी संबंधित मोठे नाव मिळवले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये मागणी देऊन पदार्थ मागवण्याविषयीच्या सवयीला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या व्यसनच निर्माण झाले आहे.
मुंबईतील एका व्यक्तीने एका स्थानिक उपाहारगृहातील देयक दाखवले आणि त्यांच्या अन्नपदार्थांच्या किंमतीची झोमॅटोवरील किंमतींशी तुलना केली. तेव्हा असे दिसले की, उपाहारगृहामध्ये ४० रुपये किंमत असलेली इडली झोमॅटोवर १२० रुपये दराने विकली जात आहे. त्याचप्रमाणे उपाहागृहामध्ये ४० रुपये किंमतीला असलेला साधा उपमा हा झोमॅटोवर १२० रुपये किंमतीने विकला जात आहे, म्हणजे केवळ आपल्या सोयीसाठी झोमॅटो देत असलेल्या पदार्थांच्या किंमती जवळजवळ १५० टक्के अधिक आहेत, हे आश्चर्यजनक आहे. झोमॅटोमुळे ग्राहकांची सोय होते; परंतु त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात किंमत आकारली जात आहे, हे काही योग्य नाही. यावर कुणाचा अंकुश आहे कि नाही ? यावर प्रशासन कोणती कारवाई करणार कि सर्वसामान्य ग्राहकांची होत असलेली लूट सर्रास होऊ देणार ? हा प्रश्न आहे.’
– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा ,गोवा .