भारताला आवाहन !
स्वामी विवेकानंद यांची शिकवण
‘भारता, तुझ्या स्त्रियांचा आदर्श सीता, सावित्री आणि दमयंती या आहेत, हे विसरू नकोस. विसरू नकोस की, तुझे उपास्य आहेत सर्वत्यागी उमानाथ शंकर. विसरू नकोस की, तुझा विवाह, तुझे धन आणि तुझे जीवन हे इंद्रियसुखासाठी, केवळ तुझ्या वैयक्तिक सुखासाठी नाहीत. विसरू नकोस की, ‘माते’साठी बली म्हणूनच तू जन्माला आला आहेस. विसरू नकोस की, तुझा समाज म्हणजे त्या विराट महामायेची केवळ छाया आहे. विसरू नकोस की, दलित, अज्ञानी, गरीब, निरक्षर हे सारे तुझे भाऊच आहेत आणि तुझ्याच रक्तामांसाचे आहेत. हे विरा, धीट हो, धैर्य सोडू नकोस, तू भारतवासी आहेस याविषयी गर्व वाटू दे आणि अभिमानाने ललकार, ‘‘मी भारतीय आहे. प्रत्येक भारतवासी माझा बंधू आहे.’’ जगाला गर्जून सांग, ‘‘अज्ञ (अजाण) भारतवासी, गरीब भारतवासी, दुःखी भारतवासी, ब्राह्मण भारतवासी आणि अन्य सर्व भारतवासी सर्वजण माझे बंधू आहेत.’’ तूही कमरेपुरते वस्त्र गुंडाळून गर्वाने गर्जना कर, ‘‘प्रत्येक भारतवासी माझा भाऊ आहे. प्रत्येक भारतवासी माझा प्राण आहे, भारताच्या देवीदेवता माझ्या ईश्वर आहेत, भारतीय समाज हा माझ्या बालपणाचा पाळणा, माझ्या तारुण्याची फुलबाग, माझ्या वार्धक्याची वाराणसी आहे.’’
बंधू ! उच्च स्वराने उद्घोष कर, ‘‘भारताची माती माझा स्वर्ग आहे, भारताच्या कल्याणातच माझे कल्याण आहे.’’ रात्रंदिवस हीच प्रार्थना कर, ‘‘हे गौरीनाथ, हे जगदंबे, मला ‘मनुष्यत्व’ दे. माते, माझी दुर्बलता, भीरुता (भित्रेपणा) दूर कर. मला ‘मनुष्य’ बनव.’’
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)