राजकोट येथील घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार

मालवण – राजकोट किल्ला येथे शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल. यासह शिवरायांच्या नावाला साजेसे स्मारक येथे उभारण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. उपमुख्यमंत्री पवार आणि शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी ३० ऑगस्टला राजकोट येथे स्वतंत्रपणे भेट देऊन पहाणी केली.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी पवार म्हणाले, ‘‘राजकोट किल्ल्याच्या परिसराचा विकास करण्यासाठी खासगी भूमी घेण्याचा विचार चालू आहे. राजकोट किल्ल्यात उत्तम प्रतीचा पुतळा उभारला जाणार आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकही घेतली आहे. अत्यंत गांभीर्याने या विषयाकडे लक्ष देण्यात आले आहे.’’

राजकोट येथील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू आहे ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना (ठाकरे गट)

संजय राऊत

मालवण – राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकारने जनतेची क्षमा मागितली आहे; परंतु क्षमा मागून प्रश्‍न सुटत नाहीत. हे प्रकरण सरकारच्या गळ्याशी आले आहे. सरकार या प्रकरणात पूर्णपणे अडकले असून सरकारला तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

राजकोट येथे पहाणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार राऊत बोलत होते. या वेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार नितेश राणे आणि जयदीप आपटे यांच्यातील हितसंबंधांची चौकशी करण्याची मागणी

कणकवली – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि आमदार नितेश राणे यांचे जुने संबंध आहेत. त्यातूनच आपटे याला राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचे काम मिळाले असण्याची शक्यता आहे. शिवरायांच्या या पुतळ्याविषयी राणे अक्षरश: गप्प आहेत. त्यांचे मौन संशयाला जागा निर्माण करून देणारे आहे. आमदार राणे यांनी आपटे याच्याशी असलेल्या हितसंबंधाविषयी जाहीर खुलासा करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे अन् आपटे यांच्या हितसंबंधांची सखोल चौकशी करावी आणि आपटे याला काम मिळण्यात या दोघांतील हितसंबंध कारणीभूत असल्याचे समोर आल्यास राणे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे.

फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने केली राजकोट किल्ल्याची पहाणी

मालवण – राजकोट येथे शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या ठिकाणी २९ ऑगस्टला कोल्हापूर येथील फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने भेट देऊन पहाणी केली. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने राज्य राखीव पालीस दलाचे पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकात १०० पोलीस, १० अधिकारी आणि १ पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे. यासह मालवण शहरातही विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.