पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘इ-रूपी’ प्रणाली ठरली फोल !
५ सहस्र विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित
पिंपरी (पुणे) – विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डी.बी.टी.) पैसे दिल्यानंतर पालकांकडून शालेय साहित्य खरेदी करण्यास टाळाटाळ केली जात होती. हे लक्षात आल्यानंतर महापालिकेने ‘इ-रूपी’ प्रणालीचा उपयोग केला; परंतु २ सहस्र ५०० पालकांकडे भ्रमणभाष नसणे आणि २ सहस्त्र ५०० जणांचे भ्रमणभाष क्रमांक अधिकोष खात्यांशी (बँक) जोडलेला नसल्यामुळे ही प्रणाली फोल ठरली आहे.
त्यामुळे महापालिकेच्या शाळांतील ५ सहस्र विद्यार्थी अद्यापही शालेय साहित्यापासून वंचित राहिले आहेत. ‘ई रूपी’ प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय चुकला असल्याची स्वीकृती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली. तसेच पुढील वर्षी थेट अधिकोष खात्यांवर पैसे पाठवण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदा निविदा प्रक्रिया राबवून पुरवठादारांकडून २० कोटी २८ लाख रुपयांचे शालेय साहित्य खरेदी केले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले, ‘‘गतवर्षी पालकांच्या खात्यावर पैसे जमा केले होते. त्यांतील ५० टक्के पालकांनी शालेय साहित्यांची खरेदी केली नव्हती.’’